जीवन

Parent Category: मराठी पुस्तके Category: सय कवितासंग्रह

सखि, जीवन हा काचेचा जणू पेला
ठाऊक हे सकलजनाला - - -

किती सुंदरसा देवाने घडवीला
प्रत्येकासाठी निराळा - - -

सुखदुःखांच्या घटनांनी हा पेला
शिगोशीग की भरला - - -

अति नाजुक याची काच
नक्षी त्यावरती खास
सुमफलभारे लवती घोस - - -

परि सांभाळी जीवनरस तो भरला
निसटू नको दे त्याला - - - १

सखि, जीवन हा जणू बिलोरी आरसा
अजबसा जादुच्या सरसा - - -

गतकालाते उकलुनी दावी जैसा
आगामी पाही तैसा - - -

जशी नजर असे दिसे त्यास तो तैसा
सुंदरसा वा फुटका जरासा - - -

चैतन्ये रसरसलेला
उत्साहे सळसळलेला
कधि निरर्थ भासे सगळा - - -

परि सांभाळी निखळू नको दे सहसा
पुन्हा न मिळणे ऎसा - - - २

Hits: 310
X

Right Click

No right click