विक्रीची कौशल्ये

Parent Category: मराठी पुस्तके Category: शंकरराव किर्लोस्कर - पुस्तक

विक्री व्यवस्थापक श्री. गुर्जर फिरतीवर गेले की ऑफिसचे सर्व काम शंकरभाऊंनाच करावे लागे, पण समाजाचे प्रेम व कलेची दृष्टी या दोन गोष्टी कुठल्याही कामाला लावल्या की यश मिळायचेच हे ठरलेले. त्या सुमारास परदेशी मालावर बहिष्काराची लाट बाहेरच्या जगात उठली होती. एके दिवशी कपडे चढवून शंकरभाऊ बाहेर पडणार तोच दोन कामगार भेटण्यासाठी हॉलमध्ये उभे राहिलेले त्यांना दिसले. ते म्हणाले, '' आम्हाला तुमची हॅट पाहिजे!'' ''कशाला?'' त्यांनी चकित होऊन विचारलं. त्यांनो उद्दामपणे उत्तर दिले, ''विलायती कपड्यांच्या होळीत टाकायला! तुमच्यासाठी आम्ही एक गांधी टोपी आणली आहे.''

शंकरभाऊंचे मन म्हणाले गांधी टोपी हे नुसते डोक्याचे आच्छादन नव्हते. ते एका संप्रदायाचे चिन्ह होते. शंकरभाऊ कुठल्याही संप्रदायापासून अलिप्त राहणारे स्वतंत्रमार्गी. ''ठीक आहे. उद्या परेडच्या वेळेला घालतो.'' असे सांगितल्यावर ते. बरे म्हणाले. दुसऱ्या दिवशी ड्रील संपल्यावर शंकरभाऊ म्हणाले, '' अजून थोडे काम आपल्याला उरकायचे आहे. आपल्या देशभक्तीबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करून शाबासकी देणार आहे. आपण सारे देशभक्त मागे १९१७ साली लोकमान्य
टिळकांनी आदेश दिल्यावर, जीवाची तमा न बाळगता देशाच्या संरक्षणासाठी सैन्यात गेलो हे तुम्हाला माहित आहेच. महात्मा गांधीसारखे थोर नेते आपल्याला लाभले आहेत. त्यांच्या सत्य, अहिंसा, खादी या मार्गाने आपण चाललो आहोत; पण देशभक्ती ही कपड्यात नसते. ती अंत:करणात असते. ''अस्पृश्यता पाळता कामा नये.'' हा महात्माजींचा उपदेश आपण लक्षात घेत नाही. तुमच्यासारखी मी गांधी टोपी घालणार तर माझ्याप्रमाणे तुम्हीही अस्पृश्यता सोडली पाहिजे.'' एवढे बोलून त्यांनी दिलेली टोपी एका हाताने डोक्यावर घालून जवळ उभ्या असलेल्या गुंडामहाराच्या हातातील पाण्याचा पेला सर्वांसमक्ष पिऊन टाकला.

विलायतेहून परत आल्यावर कारखान्याच्या मालाचा प्रसार व विक्री यांच्या निमित्ताने शंकरभाऊंचा शेतकरी ग्राहकांशी नेहमी संबंध येई. त्यांच्याशी अत्यंत सौजन्याने, आदराने व कळकळीने वागायचे अशी त्यांची पद्धत होती. त्यांचे इतके अगत्य पाहून शेतकरी जरा भांबावून जात. कारण शिक्षित पांढरपेशा माणसांशी त्यांचा संबंध यायचा तो मामलेदार, फौजदार, स्टेशनमास्तर अशा व्यक्तींशी. ही माणसे त्यांच्यावर सारखी अरेरावी करीत. शंकरभाऊ त्यांना ' अहो-जाहो' म्हणून आदबगीने त्यांच्याशी बोलू लागले किंवा त्यांना बसायला खुर्ची देऊ लागले तरी तिच्यावर न बसता जमिनीवर ते आसन ठोकीत. तथापी त्यांचा संकोच दूर होऊन एकदा त्यांच्याशी स्नेह जमला, म्हणजे त्यांनी माल खरेदी करावा यासाठी वेगळे श्रम करावे लागत नसत.

भारतामधला शेतकरीवर्ग फार मागासलेला, जुनी चाकोरी सोडून जाण्याचे त्याला धैर्य नाही आणि त्यातून आर्थिक स्थिती खालावलेली. तेव्हा नवनवे प्रयोग करण्यास त्यांना धीर व्हावा तरी कसा? सुधारलेल्या औतांचे फायदे त्याला नुसत्या शब्दांनी पटवून देणे फार अवघड. त्याला जेव्हा दिसेल की त्याचा कोणी शेजारी वा नातलग एखादे नवे साधन वापरीत आहे, तेव्हाच ते घेण्याचा तो विचार करणार. थोडक्यात. सांगायचे, तर शेतकऱ्यांचा बहुतेक व्यवहार विश्वासाच्या आधारावर चालल्याचे दिसते.

या संबंधात आलेला एक अनुभव येथे सांगण्यासारखा आहे. उसाचा रस गाळण्यासाठी कारखान्याने तीन लाटीचा एक नवा चरक बनवला. 'कमाल चरक' असे त्याचे नाव ठेवले. शेतकरी वापरत असलेल्या परांपरागत चरकापेक्षा त्याची कार्यक्षमता खूपच अधिक होती; पण गिऱ्हाईकांना हे पटवून देणे हो वेगळीच समस्या होती. एके दिवशी औंधच्या रस्त्यावरील एक म्हातारा शेतकरी ऑफिसात चरक घ्यायला आला. सुधारलेल्या कमाल चरकाचे फायदे शंकरभाऊ त्याला तऱ्हातऱ्हांनी समजावून सांगत होते; पण ते त्याला पटत नव्हते. शेवटी त्याच्या इच्छेप्रमाणे जुन्या पद्धतीचा नं. ५ चा चरक त्याने घेतला व पैसे देऊन बैलगाडीत चरक घालून तो निघून गेला. तेव्हा इतका वेळ डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहात शंकरभाऊंचा सेल्स टॉक ऐकणारे काका म्हणाले, '' काय शंकरभाऊ! तुझं सगळं प्रवचन वाया गेलं!'' पण शंकरभाऊ खट्टू न होता म्हणाले, ''या जगात चांगल्या हेतूने बोललेला शब्द कधी फुकट जात नाही. त्याचा लगेच नाही, तरी सावकाशीने परिणाम झाल्याशिवाय राहत नाही.'' त्या संवादांत इतरही मंडळी थोडावेळ सामील झाली. अशात अर्धा तास लोटला नसेल, इतक्यात तो म्हातारा गाडी घेऊन पुन्हा दारात आला, ते पाहून सर्वांचे कुतूहल जागृत झाले. तो पुढे येऊन शंकरभाऊंना म्हणाला, ''रस्त्याला लागलो खरं पण पुना म्हटलं तुम्ही इतकं सांगताय तर नव्या चरकाची परिचिती घेऊन पहावी. म्हणून बदलून न्यायला आलोय.'' शंकरभाऊंना साहजिकच अवसान आले आणि त्याचा चरक बदलून देऊन नव्या चरकाथी पावती तर करविलीच; पण दुसऱ्या दिवस त्याच्या गावी कारखान्याचा फिटर पाठवून, चरक जोडून, कामास सुरुवात करून देण्याची व्यवस्था केली. नव्या कमाल चरकाचं काम पाहायला तेथे जमलेल्या अनेक शेतकऱ्यांनी अधिक रस काढणाऱ्या चरकाची कार्यक्षमता पाहिली. त्यांनाही मग नवे चरक घेण्याची इच्छा झाल्यास नवल कसले? या कामामुळे त्या मंडळींचा शंकरभाऊंवर जो विश्वास बसला त्याचा परिणाम फारच बोध देणारा आहे. काही दिवसांनी म्हातारा मृत्यू पावला, मरताना त्याने मुलाना सांगितले होते, ''शंकरभाऊंची साक्ष घेऊन शेताची वाटणी करा.*'

१९२५ च्या मे महिन्यात शंकरभाऊ इंग्लंडहून परत आले. आपल्या परदेशातील वास्तव्यात त्यांच्या शोधक दृष्टीने तेथील विविध प्रकारची नियतकालिके त्यांनी समक्ष पारखली होती. त्यामधून संपादनामागील ध्येयदृष्टी आणि व्यावसायिक समतील याबद्दलचे त्यांचे विचार संस्कारित झाले होते. ब्रिटिश पत्रसृष्टीचे शिल्पकार लॉर्ड नॉर्थक्लिफ यांच्या धोरणाप्रमाणे राष्ट्राच्या उन्नतीला पोषक असे सामाजिक, शास्त्रीय, औद्योगिक विषय पण सोप्या भाषेत सामान्य माणसापर्यंत पोचविण्याच्या अनेक कल्पना त्यांच्या मनात उड्या मारीत होत्या. तथापि ती दोन वर्षे जागतिक मंदी आणि अवर्षण यामुळे थोडी सबुरीची दृष्टी त्याना ठेवावी लागली होती.

Hits: 290
X

Right Click

No right click