पुरोगामी विचाराकडे - १

Parent Category: मराठी पुस्तके Category: शंकरराव किर्लोस्कर - पुस्तक

युरोपातील औद्योगिक जगाच्या प्रत्यक्ष दर्शनाने सत्ता व संपत्ती ही दैवायत्त असण्याचे कारण नाही, तर माणसाच्या कर्तृत्वाने ती मिळविता येते, त्यासाठी व्यक्‍तीच्या सर्वागोण विकासाला मात्र संधी मिळाली पाहिजे हे पायाभूत तत्त्व त्यांच्या मनात पक्के रुजलं होते. युरोप-इंग्लंडमधील समाजजीवनातील मोकळेपण, बौद्धिक चर्चेची पातळो, स्त्री-पुरुष संवादिता या गोष्टी म्हणजे नवी विचारजागृती (रिनायसान्स) बुद्धिप्रामाण्य, जातीनिर्मुलन, शिक्षण प्रसार आणि कार्यक्षमता विकास या स्वरुपाचे सुधारकांचे विचार आचारात उमटले पाहिजेत हे त्यांना जाणवलं

''अमर्याद संतती'' हा डॉ. र. धों. कर्वे यांचा लेख ऑगस्ट २५ च्या खबरमध्ये प्रसिद्ध झाला. देशाची लोकसंख्या वाढते पण जमीन वाढत नाही. संपत्तीच्या मानाने फाजील संतती होते. त्यांचे हाल ''लेकुरे उदंड जाहली, तीते लक्ष्मी निघोनी गेली'' अशा रामदासांच्या वाणीने सांगितले. आपत्तीचे मूळ जे दारिद्र्य ते दूर करण्याचा हाच मुख्य उपाय आहे. महात्मा गांधींच्या फक्त संततीसाठीच समागम करावा व एरवी ब्रह्मचर्य पाळावे हे मत अनैसर्गिक आहे अशी टीकाही कर्वे यांनी केली होती. या लेखातील विचाराबद्दल मुंबईतल्या बड्या धेंडांनी मासिकाविरुद्ध उठाव केला. जणू मधमाशांचे पोळेच उठले. ''पुरुषार्थ'' मासिकातून सातवळेकर यांनी सडकून टीका केली. त्यामुळे औंधच्या राजेसाहेबांचे मत कलुषित होऊन शंकरभाऊंना जाब विचारण्यात आला. त्यावेळी ''या लेखापासून समाजाचे अहित होण्याचा संभव नसून, अशा माहितीचा प्रसार होणे हे एक आवश्यक समाजकार्य आहे, असे माझे मत आहे.'' असेे माझे मत आहे.'' असे उत्तर शंकरभाऊंनी दिले होते.

जुलै २६ पासून खबरमध्ये ''स्त्रियांचे पान'' हे सदर सौ. गंगाबाई जांभेकर लिहू लागल्या. त्यामध्ये विवाह जुळविण्याची पद्धत बदलणे, स्वदेशीचा प्रसार, स्त्रियांची आत्मरक्षणाची तयारी असे विषय येऊ लागले. मे १९२७ मध्ये 'शिवजयंतीउत्सव' अंकात शिवरायांचे कार्य याविषयी बाळासाहेब पंत प्रतिनिधी, रियासतकार सरदेसाई, पंडित सातवळेकर यांचे लेख, त्यासाठी शिवाजीच्या जीवनावरील चित्रपटातील छायाचित्रे घालून अंक अतिशय आकर्षक बनवला होता. यावर्षी अंकाचा आकार वाढविण्यात आला व तो मासिकांच्या जगात प्रमाणित झाला. 'किर्लोस्कर' आकाराची पाने असे प्रमाण नियताकालिकांच्या माध्यमात कायम झाले. आकार बदलाबरोबर मांडणीमध्ये विविधता व चित्तवेधकता आली. धाडसी सर्कसवाले पाटील यांचा परिचय, मजूरवर्गाच्या साक्षरतेचा प्रश्र हा लेख, ना. ह. आपटे यांची 'ऐरणीवरील हिरा' ही कादंबरी व 'गृहसौख्य' ही लेखमाला.

किर्लोस्कर खबरमधून येणाऱ्या व्यक्तींच्या परिचयाने व लेखामुळे निरनिराळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्यांना नवे अवसान कसे चढले आणि त्यांनी स्वत:चा उत्कर्ष कसा करून घेतला, याबद्दल अनेकांची पत्रे येत. ती वाचून शंकरभाऊंना फार समाधान व आनंद होत असे. आशाबादी विचारांचा पाठपुरावा करणारी 'आत्मप्रभाव' ही लेखमालाही सुरू झाली. मासिकाच्या वाढत्या व्यापात असतानाही कारखान्याच्या कामाकडे शंकरभाऊंचे दुर्लक्ष कधी झाले नाही. उद्योगधंद्याच्या प्रचारासाठी चित्रपट तयार करण्याची कल्पना तोपर्यंत कोणाला नव्हती; पण आपल्या कारखान्यात तयार होणाऱ्या औतांचे काम कसे चालते याचे चलत्चित्र (फिल्म) तयार करता यावे म्हणून काकांना विचारून ३५ एमएमचा जर्मन कॅमेरा त्यांनी मागवला. त्याच्या साह्याने शंकरभाऊंनी तयार केलेली फिल्म चांगली निघाली. तिच्या डेव्हलपींग प्रिटोंगची सोय कोल्हापूरात छान झाली. अशा रीतीने १९२५ मध्ये किर्लोस्कर कारखान्याचा पहिलाच चित्रपट महाराष्ट्रात तयार झाला.

या चित्रपटाचा किती मोलाचा उपयोग होतो याचा पुरावा लवकरच मिळाला. पुण्याच्या आर्यन थिएटरात चित्रपट दाखविण्यात आला. पुणेकरांनी उत्साहाने त्याचे स्वागत केले. पुढे २६ डिसेंबरला बेंगलोर येथे मोठे औद्योगिक प्रदर्शन भरले, त्यावेळीही शंकरभाऊंनी त्या चित्रपटाचा उपयोग केला. म्हैसूर संस्थानचे दिवाण सर मिर्झा इस्माईल यांनी किर्लोस्कर कंपनीच्या स्टॉलला भेट दिली तेव्हा ते आणि त्यांच्या बरोबरची अधिकारी मंडळी यांना तो चित्रपट पाहण्याची विनंती केली. चित्रपट बिनबोलका होता, म्हणून तो सुरू करण्यापूर्वी शंकरभाऊनी प्रेक्षकांपुढे थोडे निवेदन केले. म्हैसूर संस्थानशी आपला कसबाचा संबंध व भद्रावतीच्या बिडाचा नांगर-चरकासाठी होणारा उपयोग याचा उल्लेख करण्यास शंकरभाऊ विसरले नाहीत. दुसऱ्या दिवशी दिवाण साहेबांनी निरोप पाठवून शंकरभाऊंना बंगल्यावर बोलावून घेतले व असे कारखाने आमच्या संस्थानातही असावेत अशी इच्छा प्रदर्शित केली. पुढच्या काळात बेंगलोरात किर्लोस्करांचा इलेक्ट्रिकल मोटर्सचा व हरिहर येथे मशिनटूल्सचा असे कारखाने म्हैसूर संस्थानातच निघाले.

Hits: 281
X

Right Click

No right click