किर्लोस्कर खबर - ३

Parent Category: मराठी पुस्तके Category: शंकरराव किर्लोस्कर - पुस्तक

कवितांच्या संदर्भात 'बहु असोत सुंदर संपन्न को महा प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा! ' हे महाराष्ट्रगीत फार चांगले उतरले होते. ते सुरावर म्हणण्याची सोय व्हावी म्हणून श्री. गेसरे यांनी दिलेल्या नोटेशनसह ते दिवाळी अंकात प्रसिद्ध झाले. लोकमान्य टिळकांच्या निधनवार्तेबरोबर किर्लोस्कर कारखान्यास आलेल्या टिळकांच्या हस्तक्षरतील पत्रांचा ठसा देऊन 'हिंदी उद्योगधंद्याचा कैवारी गेला' असा शोकलेखही लिहिला होता. सायंकाळी गणपतराव विजापुरे, फोटोग्राफर देसाई आणि शंकरभाऊ असे मिळून फिरायला गेले म्हणजे नवे लेख-सदरे कोणती द्यायची त्याची चर्चा होत असे. जुलै १९२२ मध्ये अंकाची पाने १२ ची १६ झाली आणि वर्गणी सव्वा रुपया झाली. या वर्षात १९१ चखि, पाच गोष्टी, अठ्ठावीस कविता आणि ४५ निबंध असा ३४० पानांचा मजकुर मासिकाने दिला, असा आढावाही घेण्यात आला. त्यावर एक वाचक कळवितात को, 'तुमच्या मासिकात उपयोगाच्या मानाने तुमची वर्गणी फार थोडीआहे. ती पाच रुपये असण्यास हरकत नाही.' वाचकांच्या प्रतिसादावरून दर २-४ महिन्यानी मासिकाची पाने वाढवायला लागली. या मासिकात काल्पनिक गोष्टी न देण्याचे धोरण ठेवूनही वाचक त्याकडे आकर्षित झाले, याचे कारण शंकरभाऊंनी पुढीलप्रमाणे नमूद केले आहे.

'" आमच्या राष्ट्राला घेरलेल्या कुंभकर्णी झोपेतून त्याला जागे करावयाचे काम किती प्रचंड! त्याला खबरसारख्या चिमुकल्या मासिकाचे अल्प प्रयत्न कितीसे पुरे पडणार? तथापि खबरमुळे समाजामध्ये एक नवचैतन्य हळुहळू निर्माण होत आहे. त्याचा प्रभाव शेकडो वाचकांच्या आयुष्यक्रमात दिसू लागला आहे.''

खबरच्या लोकप्रियतेमुळे यशवंत, काव्यशेखर, दि. धों कर्वे, श्री. गोसावी ही मंडळी आपण होऊन लेख/कथा, कविता मासिकाकडे पाठवू लागली. मासिकाला मिळालेला सरकारी नोंदणी क्रमांक १४७५ अंकावर छापला जाऊ लागला. १९२१ च्या दिवाळी अंकावर कोल्हापूरमध्ये करून घेतलेले दोन रंगी चित्र प्रथमच प्रसिद्ध झाले. त्या अंकात के. सी. ठाकरे यांचा 'पावनखिंडीचा संदेश' हा लेख, जपानमधील दिवाळी असे माहितीपर लेख आणि 'अपशकुनांचा सावळागोंधळ' असे लोकभ्रम दूर करणारे लेखही वाचकांना आवडले.

हा काळ गुरुवर्य अण्णासाहेब कर्वे यांच्या अनाथ महिलाश्रमाच्या विकासाचा होता. त्या संस्थेविषयी समाजात माहिती देणे, निधी जमविणे या कामात गुंतलेल्या पार्वतीबाई आठवले, वेणूताई नामजोशी, सीताबाई अण्णेगिरी अशा कार्यकर्त्याविषयी खबरमध्ये माहिती देण्यात आली.

१९२० मध्ये खबर सुरू झाली तेव्हा शंकरभाऊंच्या संपादकीय कार्याशी असलेला नवखेपण! त्यांना वरचेवर बिचकवी; पण सदिच्छेने आणि निश्चयाने केलेले कार्य यशस्वी झालेच पाहिजे असे त्यांना वाटत असे. एकेक पाऊल पुढे टाकल्यावर खबर अधिक लोकांच्या पसंतीस पडू लागली आणि ३०० अंकांनी सुरू केलेल्या खबरचे १९२४ मध्ये ७ हजार वर्णगीदार झालें. तीन माणसांनी सुरू केलेल्या किर्लोस्कर प्रेसमध्ये ३५ माणसे काम करू लागली.

संपादक शंकरभाऊ सांगतात, ''खबरच्या लोकप्रियतेचे कारण मराठीत निघणाऱ्या इतर मासिकांहून आमचा उद्देश भिन्न होता. केवळ मनोरंजन करणाऱ्या गोष्टी न देता उद्योग, उत्साह, आत्मोन्नती हे आमचे ब्रीदवाक्य पटून आणि खबरच्या ठसकेबाज भाषेची चमक वाचकांस पसंत पडून भराभर आश्रय मिळत गेला आणि चांगल्या लेखक व कवींच्या सहकार्याने तो लवकरच दृढ झाला.''

Hits: 349
X

Right Click

No right click