रंगीत शंकरपाळी

Parent Category: मराठी संस्कृती Category: खाद्यपदार्थ Written by सौ. शुभांगी रानडे
साहित्य :-
दोन वाट्या मैदा, दीड वाटी चण्याच्या डाळीचे पीठ, थोडासा सोडा, तिखट, मीठ, जिरे, तूप, खाण्याचा गुलाबी व फिक्का हिरवा रंग, ओवा, ओल्या मिरच्या, लसूण, मिरे, दोन चमचे दही.

कृती :

मैद्यात चवीपुरते मीठ, चिमूटभर सोडा व चार-पाच चमचे गरम केलेले तेल अथवा तूप घालून सर्व सारखे करावे. त्यात मैद्याचे दोन भाग करावेत. एका भागात गुलाबी रंग व दुसऱ्या भागात फिका हिरवा रंग घालून हे दोन्ही भाग निरनिराळे घट्ट भिजवावेत. नंतर डाळीच्या पिठात गरम तुपाचे दोन चमचे मोहन व दही घालावे. व चवीप्रमाणे तिखट, मीठ, हिंग व जिऱ्याची पूड घालावी. शिवाय हवे असल्यास ओवा अगर लसूण अगर आले अगर मिरी यांपैकी आवडत असेल ते वाटून घालावे. नंतर ते पीठ पाणी घालून घट्ट भिजवावे व ते पीठ व मैद्याचे दोन्ही भाग निरनिराळे चांगले मळावेत. मैद्याच्या प्रत्येक भागाच्या चार ते सहा गोळया कराव्या. तितक्यात गोळया मळलेल्या चण्याच्या पिठाच्याही कराव्यात. नंतर गुलाबी रंगाची एक गोळी व हिरव्या रंगाची एक गोळी घेऊन व पिठाची एक गोळी घेऊन त्याच्या पापड्या लाटाव्या व दोन्ही रंगाच्या पापड्यांमध्ये पिठाची पापडी ठेवून गुळाची पोळी करतो त्याप्रमाणे पोळी लाटावी. पोळी फार पातळ लाटू नये. नंतर आपल्याला हवे त्या प्रकाराचे तुकडे कापून तुपात तळून काढावेत. तेलात तळू नयेत.
ह्या शंकरपाळयांना बाहेरील बाजूने दोन रंग व मधल्या पिठाचा निराळा रंग असे तिहेरी रंग दिसतात व त्यामुळे ती आकर्षक दिसतात. मैद्याच्या दोन भागांत दोन निरनिराळे रंग घालावे असे वर दिले आहे. त्याऐवजी एकाच भागात दोन्हींपैकी कोणताही एक रंग घालावा व दुसरा भाग तसाच पांढरा ठेवावा. त्यामुळे शंकरपाळयाच्या एका बाजूला गुलाबी अगर हिरवा रंग व एका बाजूला सफेद रंग दिसेल.

Hits: 582
X

Right Click

No right click