कृष्णा-सागर भेट

Parent Category: मराठी पुस्तके Category: सय कवितासंग्रह

सांगली नगरीचे भाग्य उजळे
साहित्यनगरी नाव हे मिळे
फारा दिसांनी संमेलन हे
मायमराठी भक्त जमले . . . १

कृष्णेच्या काठी माणिकमोती
ऎकुनी तयांची दिगंत कीर्ती
सागर येई तियेच्या भेटी
आनंद मावेना कृष्णेच्या पोटी . . . २

महिला राष्ट्रपती मुख्य अतिथी
स्वागता सजली सारी नगरी ती
कामांच्या राशी येती पुढती
सारे मिळुनी पार पाडीती . . . ३

कृष्णामाईच्या संथ प्रवाही
सागरलाटांची उसळे गर्दी
सागरभरती जणू पुनवेच्या राती
रसिकांच्या आनंदा उधाण अती . . . ४

हळद सोनेरी वांगी हिरवी
भरीत-भाकरी जोडी मिरवी
कृष्णेच्या हाताला गोडी ये नवी
सागर सप्रेमे सकलाते दावी . . . ५

येईन तुझ्या मी भेटी प्रत्यही
सागर देतसे तिजप्रती ग्वाही
ऎकूनि दिव्य ती सागरवाणी
तृप्त होई ती कृष्णाई मनी . . . ६

सागरभेटीचा सोहळा भारी
स्वर्गातूनि सारा सुरगण पाही
कृष्णातीरी ती सुमवृष्टी होई
अनुपम लावण्य प्रत्यया येई . . . ७

Hits: 505
X

Right Click

No right click