काव्यदीप - प्रस्तावना

Parent Category: मराठी पुस्तके Category: काव्यदीप पुस्तक परिचय

॥श्री॥॥
पसायदान

प्रिय सौ. शुभांगीताई
विश्रामबाग, सांगली.

स. न.
तुम्ही अत्यंत अगत्याने व विश्‍वासाने तुमच्या कविता मला वाचण्यासाठी दिल्यात या तुमच्या आपुलकी व जिव्हाळ्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. कवितांसंबंधी माझ्या मनात आलेले काही विचारतरंग आपल्यापुढे ठेवीत आहे.

तुमची साधीसुधी, भावनोत्कट कविता मला मनापासून आवडली. साऱ्याच फुलांना गुलाब, रातराणी किंवा निशिगंध-कुंद-बकुळीच्या फुलांसारखा वास असतोचं असे नाही. पण प्रत्येक फुलाला ('सदाफुली' सारखे काही अपवाद वगळता ) त्याचा म्हणून एक मनमोहक, गोड वास असतो. लेखकाच्या लेखनाचेही तसेच असते ना? तुमची कविता अगदी सहजस्फूर्त आहे. म्हणून तिच्यातले अनेक विषय (आई, मुरली, चैत्रगौर, बाग, ईश्‍वर, मुले इ.) सुपरिचित व दैनंदिन असले तरीही त्यांच्यात एक ताजेपणा, टवटवीतपणा आहे. स्त्रीचे (विशेषत: भारतातल्या) जग अनुभवाच्या दृष्टीने अजून फार विस्तृत झालेले नसल्याने तिच्या कवितांचे विषय तिचा संसार, घर, परिसर यांच्याशीच निगडित राहणार यात अस्वाभाविक असे काही नाही.

मला तुमच्या कवितातून एक अतिशय कृतज्ञ, सश्रद्ध, सुसंस्कृत शालीन, विनीत अशा आणि भक्तिभावपूरित, नाजूक, हळुवार मन असलेल्या प्रेमळ स्त्रीचे जे दर्शन झाले त्यामुळे मला एक गुणी मैत्रीण मिळाल्याचा आनंद वाटला. ही कवयित्री मैत्रीण लहान मुलांतही विशेष रमते ('आज्जी ग आजी', 'ड्रायव्हर', 'खिरापत' इ.). ते स्वाभाविक वाटते कारण लेखिकेचे मनही निरागसच राहिले आहे. ते तसे ठेवणे ही संसारातली फार अवघड गोष्ट आहे. काव्यदीप चार परमेश्‍वर, कुटुंबातली वडीलधारी मंडळी यांच्याबद्दलची तिची आदराची भावना अतिशय प्रांजल व आज दुर्मिळ असल्याने त्या कविता एक वेगळेच शांत समाधान देतात.

'वेलीबरची फुले', 'राऊळ' (फार छान), 'याद' (साधी पण मनाला भिडणारी), 'तुळस' (घरच्या कष्टाळू आतिथ्यप्रिय गृहिणीला दिलेली सुरेख उपमा), 'सोनुला' (वात्सल्याचे हृदयंगम चित्र), 'बाग' (चांगले वर्णन), 'तीच' (छोटीशी पण बोलकी), 'तिळगूळ' (कल्पना नवीन), 'स्मृतिसुमने', 'काव्यदीप' (आईजवळ झोपण्याची भावना डोळ्यांना पाणी आणते), 'मराठी माऊली' (चांगली कल्पना), 'पुसू नको', आणि 'पूर्तता' (काव्यनिर्मितीची प्रक्रिया. हा विषय अनेक कवींचा आवडता. कारण ती भावस्थिती अवर्णनीयच असते.) अशा अनेक कविता मला भावल्या. 'फटका' हा काव्यप्रकार स्त्रियांनी फारसा हाताळलेला दिसत नाही. तथापि तुमच्या 'नक्को नक्को ' या कवितेत अशा “फटका' या काव्यप्रकाराच्या लिखाणात तुम्ही चांगले यश मिळवलेले दिसते. त्यातून व्यावहारिक शिकवणही मिळते.

कल्पनाविलासात एक आगळेच सौंदर्य असते. अलंकारांनी स्त्री जशी अधिक सुस्वरूप दिसते तशीच कविताही अलंकारांनी दिसते. तुमच्या कवितेत अलंकारांचा सर्रास वापर दिसला नाही. अर्थात मुद्दाम ते घालण्याचे कारणही नाही. बालकवींची कविता 'फुलराणी', 'निर्झरास', 'अरूण' इ. त्यातल्या कल्पनाविलासामुळेच सुदीर्घकाळ मनात रेंगाळतात. तुमच्या कवितेतील भावनांचे सच्चेपण आणि सहजस्फुरणाची शक्ति हाच गुणविशेष अधिक महत्वाचा आहे.

असाच हात सदैव लिहिता ठेवावा. जुन्या कर्वींच्या काव्यसंग्रहाप्रमाणेच नवनवे काव्यसंग्रह पण वाचत रहावे.

आपली
मालतीबाई शं. किर्लोस्कर

Hits: 500
X

Right Click

No right click