३. विद्यार्थिदशा आणि मनाची घडण - ३

अखेर शिक्षणाची संधी लाभली

नागपूर सोडायचे ठरले. चुलतभावाचा एक मित्र रेल्वेत नोकरीला होता. त्याच्या मदतीने श्रीधर मुंबईस त्यांच्या नात्यातल्या आत्माराम लेले यांच्याकडे आला. त्याचे शिक्षण श्रीधरच्या वडिलांनी केले होते. त्याला श्रीधरचे शिक्षण करणे फारसे कठीण नव्हते. पण तो ते करायला तयार नव्हता. तेवढ्यात त्याचे सासरे पुण्याहून आले. ते श्रीधरला म्हणाले, 'माझ्याबरोबर पुण्याला चल, श्रीधर त्यांच्याबरोबर पुण्याला आला. त्यांनी श्रीधरचे वार लावून दिले. श्रीधरच्या थोरल्या भावाला हे मान्य नव्हते. त्याने खटपट
करून त्यांच्याच चुलत घराण्यातल्या गोविंदराव जोशींकडे आश्रित विद्याथी म्हणून श्रीधरची सोय केली. त्या वेळी आश्रित मुलांना वरची कामे करावी लागत. कंदिलाच्या काचा पुसून त्या लखलखीत ठेवणे, जेवणाच्या वेळी पाटपाणी करणे, गोठ्यातल्या म्हशीची धार कापता गडी आला को म्हशीचे आंबोण नेऊन ठेवणे, विहिरीचे पाणी काढणे, भांडी विसळणे ही सारी कामे श्रीधर करीत असे. आणखी एक काम त्याला करावे लागे. त्या घरातली लंगडी मुलगी द्वारका कुबड्या घेऊन हुजूरपागेत जात असे. श्रीधर तिला तिच्या शाळेत पोचवून तेथून त्याच्या शाळेत न्यू इंग्लिश स्कूलमध्ये, रमण बागेत जाई. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जुन्नरच्या जुन्या शाळेच्या दाखल्यावर त्याला इंग्रजी पहिलीत प्रवेश मिळाला. तिमाहीत तो पहिला आला. पण फी कोढून भरणार?

वर्गशिक्षकांनी सांगितले, 'तू फ्री स्टुडंटशिपसाठी अर्ज कर.' श्रीधर तसाच उठला आणि शाळेचे सुपरिटेन्डेन्ट एस्‌. आर्‌. कानिटकर यांच्याकडे गेला आणि म्हणाला, सर, मी आश्रित म्हणून राहतो. फो कोठून देणार ? नागपुरला मी त्याला तीन महिन्याची फी दिली नाही म्हणून मला शाळा सोडावी लागली. तुम्ही मला फ्री स्टुडंटशिप दिली तरच माझं शिक्षण चालू राहील!' कानिटकरांना या हुशार विद्यार्थ्यासाठी काहीतरी करावे असे वाटले. असि. सुपरिटेन्डेन्ट चिपळूणकर पलीकडच्या खोलीत बसले होते. कानिटकरांनी बसल्या जागेवरून मोठ्याने विचारले, 'चिपळूणकर, आपल्याकडे एखादी फ्री स्टुडंटशिप शिल्लक आहे का?' चिपळूणकरांनी त्यांच्या खोलीतूनच उत्तर दिले, आहे. पण ब्राह्मणांसाठी नाही.' कानिटकरांनी श्रीधरला सोमवारी यायला सांगितले. शिक्षण थांबणार की काय, या काळजीने श्रीधर अस्वस्थ होता. सोमवारी भीतभीतच तो कानिटकरांच्या ऑफिसमध्ये गेला. कानिटकर कठोर शिस्तीचे, नियमांचे काटेकोर पालन करणारे. पण तिमाहीत पहिल्या येणाऱ्या या तरतरीत हुशार मुलाला संधी द्यायचे त्यांनी ठरविले. ते गंभीरपणे म्हणाले, 'उत्तम अभ्यास कर, तुला फ्री स्टुडंटशिप दिलीय. जा आता वर्गात. श्रीधरच्या मनावरचे ओझे उतरले. आता आपले शिक्षण चालू राहणार, हे समजल्यावर घरच्या कामाचेही काही वाटेनासे झाले. घरातल्या गंगूवहिनी श्रीधरवर लक्ष ठेवीत. त्याचा प्रामाणिकपणा, कष्टाळूपणा आणि हुशारी लक्षात आल्यावर गंगूवहिनी त्याच्यावर माया करायला लागल्या. गंधर्वाचे नाटक लागले तेव्हा पाहुण्यांसह सगळे नाटकाला गेले. श्रीधर अर्थात घरीच होता. गंगूवहिनी नाटकाला जाऊन आल्यावर म्हणाल्या, 'आता पुढच्या नाटकाला मी तुला पाठवीन.' श्रीधर आजारी पडला की गंगृवहिनी मायेने त्याची शुश्रूषा करीत. श्रीधरला चटके बसत होतेच, पण असा मायेचा ओलावाही मिळत होता.

श्रीधरला शाळेत जिवलग मित्र मिळाले. श्रीधर आणि गोपीनाथ तळवलकर पहिलीपासून मॅट्रिकपर्यंत एका वर्गात होते. चौथीत असतना शिखरे, तारकुंडे हे हुशार विद्यार्थी वर्गात आले. गोरे, खाडिलकर, शिरुभाऊ लिमये, गं. भा. निरंतर हेही श्रीधरचे वर्गमित्र. शिक्षक खूप मेहनत घेऊन शिकवत. शिक्षकांमध्ये काहीजण मवाळ मताचे होते, तर. काही जहाल मताचे होते. चहा न पिणे हे त्या वेळी देशभक्तीचे लक्षण मानले जाई. म्हणुन श्रीधरच्या मित्रांनी फळ्यावर लिहिले, 'बाबांनो, चहा पिऊ नका.' मवाळ मताच्या चिपळूणकरांना राग आला आणि निरंतर या श्रीधरच्या मित्राला चार छड्या खाव्या लागल्या. श्रीधरने एकदा फळ्यावर देशभक्तिपर वाक्य लिहिले. आपटे सर जहाल मताचे. त्यांनी ते वाक्य वाचले आणि म्हणाले, 'बोर्डावर लिहिताय ठीक आहे. पण देशभक्ती सोपी नाही, हे लक्षात ठेवा.' शिक्षकांशी हे विद्यार्थी वादही घालीत आणि
तरीही शिक्षक त्यांना उत्तेजन देत. श्रीधर आणि त्याच्या मित्रांनी हस्तलिखित मासिक काढले. त्या मासिकाचे नाव होत्ते 'वसंत'. त्यात श्रीधरने 'शिवनेरीचा प्रवास' हा लेख लिहिला होता. त्यांनी ते मासिक नेहमी खादी वापरणाऱ्या धारप मास्तरांना दिले. ते वाचल्यावर त्यांना ते फार आवडले. त्यांनी त्या मासिकात एक रुपया घालून मुलांना ते परत दिले. आणि ते म्हणाले, 'हे असेच पुढे चालले पाहिजे.' पाठीवर अशी शाबासकीची थाप पडल्यामुळे विद्यार्थ्याच्या मनाचा हुरूप वाढला. श्रीधर हा अभ्यासू विद्यार्थी होता. क्रिकेट आणि विटीदांडू हे खेळ त्याच्या आवडीचे होते. तो वर्गात खट्याळपणाही खूप करी. शं. के. कानेटकर - कवी गिरीश या शिक्षकांचा तो आवडता विद्यार्थी होता. ते एकदा श्रीधरला म्हणाले, 'You are a clever boy, but there is a lot of jackal in you. '

न्यू इंग्लिश स्कूलमधील हे हुशार विद्यार्थी वर्गाचे गणपती उत्सव करीत आणि तेथे ता तात्यासाहेब केळकर, ज. स. करंदीकर, बाबुराव गोखले अशा वक्त्यांना भाषणाला बोलावीत. जी. जी. दामले हे इतिहास शिकविणारे तरूण शिक्षक विद्यार्थ्यांना किल्ले पहायला घेऊन जात. पुरंदर, रायगड, सिंहगड, शिवनेरी या गडांवर गेल्यावर शिवछत्रपतीच्या पराक्रमी, स्फूर्तीदायी जीवनाचा संस्कार या विद्यार्थ्यांवर झाला.

न्यू इंग्लिश स्कूलसमोरच लोकमान्य टिळक राहात असलेला गायकवाड वाडा होता. एकदा मधल्या सुट्टीत श्रीधर आणि त्याचे मित्र लोकमान्यांना पहायला गेले. टिळकांनी नुसती 'कोणत्या वर्गात आहात?' अशी चौकशी केली. पण केवळ त्यांच्या दर्शनाने विद्यार्थ्यांना वाटले की आपणही देशासाठी काहीतरी केले पाहिजे. टिळक इंग्लंडहून परत आले त्या वेळी त्यांची मिरवणूक निघाली होती. श्रीधर आणि त्याचे दोस्त मिरवणुकीत गेले. त्यामुळे शाळेत यायला एक तास उशीर झाला. शाळेच्या दरवाज्यावर सुपरिन्टेन्डेंट छडी घेऊन उभेच होते. त्यांच्या हातची छडी खाऊनच सगळेजण वर्गात गेले. त्यांनी ही शिक्षा आनंदाने सोसली. १९२० साली लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थींच्या मिरवणुकीस गेल्याबद्दलही या विद्यार्थ्यांना छड्या खाव्या लागल्या.

त्या वेळी देशातले वातावरण देशभक्तीचे होते. न्यू इंग्लिश स्कूलमधल्या या हुशार विद्यार्थ्यांच्या मनावर हा देशभक्तीचा संस्कार होत होता. दोन वर्षांनी श्रीधर हा आपटे यांच्या घरी राहू लागला. पुढे श्रीधरचा धाकटा भाऊही पुण्यास आला. थोरल्या भावाचा पगार वाढल्यावर श्रीधर व त्याचा भाऊ खोली घेऊन राहू लागले. ते हाताने स्वयंपाक करून जेवत व शाळेला जात. नंतर श्रीधरची आई आणि दोन बहिणीही पुण्यात आल्या. भाऊ महाराजांच्या बोळातील खाडिलकरांच्या वाड्यात त्यांनी बिऱ्हाड केले. श्रीधर मॅट्रिक झाला त्यावेळी तेथेच राहात होता. त्या वेळी शाळेतील विद्यार्थी एकमेकांना इंग्रजी आद्याक्षरी नावांनी हाक मारीत. श्रीधरला सर्वजण एस्‌. एम्‌. म्हणत, आणि तेच त्याचे नाव कायमचे पडले. श्रीधर १९२५ साली मॅट्रिक झाला, तेव्हा सगळे त्याला "एस्‌. एम्‌." म्हणूनच ओळखू लागले.

Hits: 271
X

Right Click

No right click