१२. भाऊरावांच्या कर्तृत्वाचा सन्मान - ७

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील

१२. भाऊरावांच्या कर्तृत्वाचा सन्मान - ७
यानंतर भाऊरावांचा गौरव किर्लोस्करवाडीस सन १९२३ साली भरलेल्या तिस-या ग्रामोद्वार सभेत, तेथे जमलेल्या प्रमुख नेत्यांकडून त्यांच्या ग्रामीण जनतेसाठी चाललेल्या कामाबद्दल अभिनंदनासह करण्यात आला आणि त्याच साली महाराज सयाजीराव गायकवाड (३ रे) यांनी छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस पाहून फार मोठा गौरव केला. याची माहिती पूर्वी दिलेली आहेच. (उक्त अहवाल, पृ: १३)१८) यापूर्वी १९२६ साली ऑगस्ट महिन्यांत भाऊरावांच्या जीवन व कार्याचा त्रोटक परिचय श्री. के. सी. ठाकरे यांनी प्रबोधन मासिकातून केला होता. ' त्यांनी भाऊरावांना “आदर्श समाजसेवक! म्हटल्याची आठवण धनंजय कीरांनी आपल्या चरित्रात दिली आहे. (पाहा बा. म. ठोकेकृत कर्मवीर भाऊराव पाटील, पृ. ६८) किर्लोस्करवाडीच्या ग्रामोद्धार परिषदेनंतरच भाऊरावांना कर्मवीर या उपाधीने जनतेने भूषविलेले दिसते. पण भाऊरावांना स्वत: 'रयतसेवक' म्हणवून घेणे पसंत होते. त्यामुळे संस्थेच्या सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेजच्या सन १९४१-४२ अहवालात (पृ. ३२२) प्रथम भाऊरावांना 'कर्मवीर' उपाधी
लावण्यात आल्याचे दिसते. परंतु १९२४ पासून त्यांना काहीजण कर्मवीर म्हणत असल्याचे दिसते. (बा. म. ठोकेकृत कर्मवीर भाऊराव पाटील चरित्र, पू. १२८)

१९) १९४५ साली सातारा जिल्हा विद्यार्थी कॉंग्रेसने भाऊरावांना एक लाखाची थैली देण्याचा ठराव कापील गावी साने गुरुजींच्या अध्यक्षतेखाली १३-५-१९४५ ला केला. त्यांत भाऊरावांचा महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील असा उल्लेख करण्यात आला आहे. पण 'रयतसेवक” ही उपाधी अगोदर देण्यात आली आहे. (डॉ. रा. अ. कडियाळकृत कर्मवीर भाऊराव पाटील, इंग्रजी चरित्र, पु. ३०९)

२०) भाऊरावांचा म. गांधींनी छत्रपती शाहू बोर्डिगच्या नामकरण विधीप्रसंगी गौरव केला होता. त्याचा पूर्वीच उल्लेख केलेला आहेच. यामुळे हरिजन सेवक संघाने रयत शिक्षण संस्थेस अनुदान देऊन भाऊरावांचा गौरव सन १९३३ साली केला. |

२१) सन १९४५ साली मे महिन्याच्या २२ तारखेस कोल्हापूरच्या उद्यमनगर व शाहूपुरीच्या गूळ व्यापाऱ्यांनी भाऊरावांना रु. २५,१५१ ची थैली कोल्हापूरचे मंत्री नामदार गुलाबराव देशमुख यांच्या हस्ते देऊन त्यांचा भव्य सत्कार केला. (काटकरकृत कर्मवीर भाऊराव पाटील चरित्र, पृ. ७०)

२२) भाऊरावांच्या दृष्टीने दोन गौरव समारंभ महत्त्वाचे होते.भाऊरावांना संधिवाताच्या विकाराने अनेक प्रसंगी जागीच खिळून ठेवल्याने, संस्थेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी त्यांना एक मोटार घेऊन देण्याचे ठरविले. त्यासाठी रु. ११ हजार जमविण्यात आले होते. तसेच सातारा जिल्हा विद्यार्थी कॉंग्रेसने एक लाखाची थैली देण्याचे ठरवून सद्गुरू गाडगे महाराज यांच्या उपस्थितीत ता. २७ व २८ नोव्हेंबर १९४८ रोजी हे दोन्ही समारंभ उरकण्यात आले. महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाच्या मुलांसाठी भाऊरावांनी आजपर्यंत काम केले, त्याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्याने भाऊराव विद्यार्थ्यांच्या या कृतज्ञतेने भारावून गेले होते. हे समारंभ म. गांधींच्या हस्ते व्हावयाचे, पण नौखालीत उसळलेला जातीय दंगा थांबविण्यासाठी म. गांधींना जावे लागल्याने त्यांनी संदेश पाठविला को, “श्री भाऊराव पाटील की सेवा ही उनका सच्चा कीर्तीस्तंभ है। फिर भी छात्रोने जो प्रवृत्ती की है, वह उनके लिये तो स्तुत्य है श्री. भाऊराव दीर्घ कालतक सेवा करते रहे)” - (९-१-१९४८)

२३) सन १९४८-४९ . मध्येच अहमदनगर जिल्हा लोकलबोर्डाच्या अध्यक्ष होत्या सौ. हिराबाई भापकर, त्यांनी भारतरत्न महर्षी अण्णासाहेब कर्वे, हरिजनसेवक काकासाहेब बर्वे व गुरुवर्य बाबुरावजी जगताप यांच्यासह भाऊरावांना, त्यांच्या प्रदीर्घ समाजसेवेबद्दल ता. १७-३-१९४९ रोजी संयुक्‍त मानपत्र देऊन गौरव केला. सन १९५७ साली भाऊरावांच्या शैक्षणिक कार्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी ग्वाल्हेरचे महाराज जिवाजीराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. या सुवर्ण महोत्सव फंडास महाराष्ट्र शासनाने 5 २ लाख दिले. मात्र भाऊरावांना हा फंड निर्माण करणे मान्य नव्हते. भाऊरावांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. हे जाणून सातारा जिल्हा लोकल बोर्डाने ता. २३ जुळै १९५८ रोजी मानपत्र दिले. आजारी अवस्थेतही भाऊराव या समारंभास हजर राहिले.

Hits: 419
X

Right Click

No right click