१२. भाऊरावांच्या कर्तृत्वाचा सन्मान - ५

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील

१२. भाऊरावांच्या कर्तृत्वाचा सन्मान - ५
१३) छत्रपती शाहू बो्र्डींगला भाऊरावांच्या प्रयत्नाने बॅकवर्ड क्लास वसतिगृह म्हणून सन १९३४ साली मान्यता मिळाली होती. त्यास भाऊरावांची डिसेंबर १९२९ मधील श्री ओ. बी. एच. स्टार्ट कमिटीपुढील साक्ष कारणीभूत होती. या समितीपुढे अस्पृश्यांच्या शाळांचा व देवदासींच्या पुनर्वसनाचा व त्यांच्यामधील वेश्याव्यवसाय थांबविण्याचा प्रश्‍न त्यांनी आग्रहाने मांडला. हेच श्री. स्टार्ट बॅकवर्ड क्लास ऑफीसर झाल्यानंतर त्यांचेपुढे भाऊरावांनी बालगुन्हेगार कोर्टाकडील मुलांचा प्रश्‍न मांडला होता, कारण सन १९३७पासून ते या बोर्डाचे सभासद होते. त्यांचे म्हणणे की, तुरुंगासमान बोर्स्टल स्कूल्स येरवड्याच्या शाळेत या बाल-गुन्हेगारांची सुधारणा होणार नाही. त्यांचे सहानुभूतीपूर्ण मुक्त वातावरणातच संगोपन व शिक्षण झाल्यास ते उत्तम नागरिक बनतील. या प्रयोगासाठी भाऊरावांनी या बालगुन्हेगारांना छत्रपती शाहू बो्डींग हाऊसमध्ये दाखल करण्यास सुरुवात केली. व या मुलामुलींतून उत्तम नागरिक बनवून दाखविले.

छत्रपती शाहू बोर्डिग हाऊसला मुक्‍त वातावरणात आल्यावर ही मुले पळून जाण्याचा विचार सोडून देत शेती, बागकाम, स्वयंपाक आदींमध्ये रमल्याने त्यांना शिक्षणाबरोबर खेळाचा व नवनिर्मितीचा आनंद मिळे. या मुलांपैकी अनेकजण द्विपदवीधर होऊन संस्थेत काम करीत आहेत. सन १९३८ सालीच छत्रपती शाहू बोर्डींग हाऊसला अशा गुन्हेगार मुलांसाठी सुधारगृह व शाळा म्हणून मान्यता मिळाली होती. समाजाच्या मुख्य प्रवाह्मपासून तुटलेल्या या बालगुन्हेगारांस परत मूळ प्रवाहात आणणे ही फार मोठी जोखमीची समाजसेवा होती. ती भाऊरावांनी पार पाडली. मुलींच्या बाबतीत, वेश्याव्यवसाय किंवा तत्सम अनैतिक व्यवहारापासून त्यांना मुक्‍त करण्याची शिक्षण हीच गुरुकिल्ली असल्याचे त्यांचे मत होते. म्हणून मुलींना शाळेत पाठविण्यास व त्यांना सर्व सवलती मोफत देण्यावर त्यांचा भर होता. मुलींच्यासाठी पाच वेगळ्या स्वयंसेवी शाळा सुरू केल्या होत्या.

१४) धार्मिक बाबतीत भाऊराव धर्मभोळे किंवा अंधश्रद्ध नव्हते. या विश्‍वचक्राच्या मागे ईश्‍वर किंवा निर्मिक नावाची शक्‍ती आहे किंवा असावी असे ते मानीत. मात्र ते मूर्तिपूजक नसल्याने जैन मंदिरात जात नसत. जैन समाजाच्या अधिवेशनास ते हजर राहात. कर्मठ जैनांच्या प्रबोधनाद्वारे त्याच्यांत दीनदलित व अस्पृश्यांच्याप्रती प्रेम व सहानुभूती निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असे . त्याबरोबरच रयत शिक्षण संस्थेच्या कार्यास मदत मिळविण्याचा हेतू असे. सनातनी व अस्पृश्यता पाळणाऱ्या जैनांस जाहीरपणे ते वाक्‍ताडन करीत. हाच दृष्टिकोन मराठा व कर्मठ ब्राह्मण माणसांबद्दल त्यांचा असे. अठरापगड जातीस मराठा समाजाने आपणात मिळवून बृहन्मराठी समाज तयार करावा अशी त्यांची विशाल दृष्टी असल्याने आंतरजातीय विवाहास भाऊराव प्रोत्साहन देत. संस्थेत असे कांही विवाह त्यांनी घडवून आणले. सारांश, धार्मिक बाबतीत ते दुराग्रही नव्हते व पुरोहितकृत कर्मठ रूढी, आचारविचार व संस्कार यांच्या बाबतीत भाऊराव रूढीभंजक होते. मग हे पुरोहित, जैनातील असोत, ब्राह्मण्यातील असोत किंवा मराठ्यातील असोत, त्यांच्या बाबतीत रूढीभंजक मानवतावादी दृष्टिकोन भाऊरावांचा होता. त्यासाठी संस्कारकेंद्रेही सुरू केली होती.

Hits: 407
X

Right Click

No right click