१२. भाऊरावांच्या कर्तृत्वाचा सन्मान - ३

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील

१२. भाऊरावांच्या कर्तृत्वाचा सन्मान - ३
७) या वसतिगृहात सर्व धर्मांच्या, जातींच्या व अस्पृश्यांच्या मुलांना प्रवेश असल्याने सामाजिक दृष्टीने अस्पृश्यता निवारणाचे मोठे काम झाले. आपण कितीही घसा कोरडा करून, मोठ्या आवाजात म्हटले की आम्ही भारतवासीय सांस्कृतिक दृष्ट्या एक आहोत; पण ते सांगण्यापुरतें झाले आणि ते उच्चवर्णीय पुढारलेल्या लोकांपुरते झाले. फार तर शहरवासीयांपुरते झाले. खेड्यात आजही काय दृश्य आहे ! महार, मांग, चांभार, ढोर यांची वसाहत वेशीबाहेर, घाणीने भरलेल्या परिसरात असते. त्यांचा पाणवठा वेगळा असतो. त्यांचे व्यवसाय अस्वच्छतेत बुडालेले असतात. आरोग्य व सामाजिक सुधारणेस शिक्षण हा महत्त्वाचा घटक असतो. म्हणून भाऊसवांनी समाजसुधारणासाठी वसतिगृहेच भावी भरारीची केंद्रे बनविली. या वसतिगृहात अठरापगड जातींच्या मुलांना एका घरातील मुलांप्रमाणे एकत्र राहणे, एकत्र स्वयंपाक स्वहस्ते करणे व एकत्र एका पंगतीत जेवणे अनिवार्य केले. जे ग्रामोद्वार समितीच्या खेडोपाडी घेतलेल्या व्याख्यानातून सांगितले ते या वसतिगृहातून मुलांकरवी आचरणात आणविले.

८) प्रत्येक खेड्यात शाळा हवी. परंतु गावकऱ्यांनी शाळा सुरू केली तर चालविण्यालायक शिक्षक पाहिजे म्हणून प्रथम भाऊरावांनी सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग स्कूल सुरू केले. या ट्रेनिंग स्कूलमध्ये सुतारकाम, लोहारकाम व शेती शिक्षणावर भर दिला. अस्पृश्यता निवारणाचे हे शिक्षक अग्रदूत बनावेत म्हणून त्यांचे जेवणखाण व राहणे शाहू बोर्डिंग हाऊसमधील इतर मुलांसमवेत होते. अत्यल्प खर्चात एकत्र राहण्याची व जेवणाची त्यांची सोय करण्यात आली होती. महात्मा गांधींनी छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊसचे नामकरण करताना अस्पृश्यता निवारणाचे काम व स्पृश्य-अस्पृश्य मुले एकत्र बंधुभावाने राहत असल्याने पाहून भाऊरावांची पाठ थोपटली होती व म्हणाले होते की, “भाऊराव, मला जे साबरमती आश्रमात करता आले नाही ते तुम्ही केले.” हे जगजाहीर आहे की साबरमती आश्रमात दुदाभाई, त्यांची पत्नी सौ. दानीबेन व मुलगी लक्ष्मी यांना घेण्यास स्पृश्य गुजराती समाजाने महात्मा गांधींना प्रतिबंध केला होता.

भाऊरावांचे हे वसतिगृह स्पृश्य सनातन्यांना 'सबगोलंकारी' वाटे. त्यामुळे सातार्‍यात सार्वजनिक हौदावर वसतिगृहातील मुलांना पाणी भण्यास व आंघोळीस मज्जाव होई; मग मुले बंड करून उठत, या हौदावर पाणी भरीत, आंघोळी करीत. भाऊरावांच्या सामाजिक सुधारणेच्या मर्मस्थानी अस्पृश्यता निवारण हे पहिल्या प्रतीचे काम होते. सन १९५ २ मध्ये पुण्यास न्यायमूर्ती डॉ. प्र. बा. गजेंद्रगडकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिली महाराष्ट्र सामाजिक परिषद झाली. भाऊराव तिच्या प्रवर्तकापैकी एक असल्याने अस्पृश्यता व जातीभेद मानणार नाही अशी एक शपथ सभासदांना घ्यावी लागे. या शपथेवर भाऊरावांचा आग्रह असे. या अस्पृश्यता निवारणाच्या कामामुळेच दिल्लीच्या हरिजन सेवक संघाने सन १९३३-३६ या चार सालांत शाहू बोडिग हाऊसला दरसाल रु. ५०० मदत दिली.

९) भाऊरावांनी खेड्यांतील लोकशिक्षण, ग्रामोद्वार, अस्पृश्यतानिवारण आणि प्राथमिक स्वयंसेवी शाळांची सांगड आपल्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये तयार झालेल्या प्राथमिक शिक्षकांमार्फत घालून सामाजिक सुधारणेचा पाया ग्रामीण भागात घातला. त्यांचे हे काम तळागाळातून सुरू झाल्याने (ग्रासरूट लेव्हल) जनतेने त्यांचे नेतृत्व निस्संकोचपणे स्वीकारले व भाऊरावांचे लोकसंग्रहाचे व लोकसाहाय्याचे काम सुकर झाले व त्यांचे समाजसुधारणेचे काम महाराष्ट्रात सुदूर अनेक जिल्ह्यांत पसरले.

१०) आपल्या संस्थेसाठी मदत गोळा करताना आजचे अनेक संस्थाचालक जसे पालकांना वेठीस धरून प्रवेश देताना जबरदस्तीची देणगी गोळा करतात, तसे भाऊराव कधीही करीत नसत. पायास भिंगरी बांधल्याप्माणे ते सतत हिंडत असत. ग्रामीण भागातील त्यांचे स्नेहीसोबती, संस्थेचे चाहते, हितचिंतक आपण होऊन, पैसे व धान्यरूपाने त्यांना मदत देत. भाऊराव म्हणत, “शेतकर्‍यांनी माणशी एक रुपयाप्रमाणे मदत द्यावी. एकाद्या धनिकाने हजार रुपये देण्यापेक्षा ते अधिक मोलाचे आहे. कारण माझी संस्था त्यामुळे हजार शेतकऱ्यांच्या अंत:करणात स्थान मिळवील.”

Hits: 447
X

Right Click

No right click