१०. भाऊरावांचे शैक्षणिक तत्वज्ञान - ५

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील

१०. भाऊरावांचे शैक्षणिक तत्वज्ञान - ५

१३) भाऊरावांच्या या शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा अंतिम हेतू पिळवणूकरहित एकसंध भारतीय समाजनिर्मितीचा होता. जातपात, भेद यांना थारा न मिळता सर्वांना मानव म्हणून शिक्षणाची व प्रगतीची संधी मिळाली पाहिजे. भारतास आत्मनिर्भर, संपन्न राष्ट्र बनविण्याचा तोच मार्ग आहे अशी त्यांची ठाम समजूत होती. परंतु हे ध्येय साध्य करण्यासाठी भाऊरावांनी आपल्या वसतिगृहातील कमकुवत स्तरातील मुलांना, जात-पात, जातिबहिष्कृतता, स्पृश्याकडून होणारी पिळवणूक व जुलूम यापासून निर्भय बनण्यास प्रथम शिकविले. भित्रा मनुष्य बंडखोर बनू शकत नाही. सांप्रदायिकता, जातपात, विवेकशून्य रूढी यांच्या भयापासून मुलांना मुक्‍त करून त्यांना मुक्‍त मानव बनविण्याचे भाऊरावांचे तत्त्वज्ञान होते; आणि हे काम परकीय सत्तेच्या भयापासून मुक्‍त करण्यास पूरक होते.

१४) महाराष्ट्राच्या बाबतीत ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद निरर्थक असल्याचे १९५३ साली त्यांनी पहिल्या महाराष्ट्र सामाजिक परिषदेत जाहीरपणे सांगितले. होते. याची जाण भाऊरावांनी सन १९२२-२३ साली 'कुऱ्हाड' साप्ताहिकासाठी प्रबोधनाच्या पहिल्या प्रस्तावनेत स्पष्ट केली होती. सन १९५८ साली सातारच्या जिल्हा परिषदेने भाऊरावांना त्यांच्या आजारपणाच्या स्थितीत मानपत्र देऊन सत्कार केला, त्यावेळी भाऊराव म्हणाठे, “ब्राह्मण समाजावर तरुणपणाच्या अविचारी अवस्थेत त्या काळास अनुसरून त्यांनी टीका केली; त्याबद्दल त्यांना पश्‍चात्ताप होतो आहे. आता हा वाद गाडून टाकला पाहिजे.” आंतरजातीय विवाह हा वाद मोडण्यास पूरक आहे अशी त्यांची धारणा असल्याने अशा लग्नसमारंभास भाऊराव स्वत: हजर राहून वधूवरांना आशीर्वाद देत. आचार्य अत्र्यांच्या विवाहास ते हजर होते. कारण अत्र्यांचा तो विवाह आंतरजातीय होता.

१५) सारांश, भाऊरावांचें तत्त्वज्ञान मानवतावादावर आधारलेले होते. पॉल फ्रे अरी या ब्रॅझेलियन शिक्षणतज्ज्ञाच्या व्याख्येप्रमाणे भाऊराव हे प्रागतिक, मानवतावादी सामाजिक मुक्तीचे पुरस्कर्ते 'शिक्षणाचार्य' होते असे म्हणावे लागते. शिक्षणक्षेत्रात जागतिक स्तरावर शिक्षणाच्या तत्त्ववेत्त्यांनी शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचे चारा औपचारिक विभाग पाडले आहेत, ते असे: स्वभाववाद (नेचरॅलिझम), आदर्शवाद (आयडियालिझम), वास्तववाद (रिअँलिझम) आणि व्यवहारवाद (प्रॅग्मेटिझम). या खेरीजही वेगळ्या तर्‍हेने हे वर्गीकरण काही शिक्षणतज्ज्ञ करतात. भाऊरावांचे तत्त्वज्ञान व्यवहारवादात मोडते. शिक्षणप्रसार करीत असताना भाऊरावांना ज्या अडचणी आल्या किंवा आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली की त्यांना कसे तोंड द्यावयाचे ? त्यांच्यावर कशी मात करावयाची किंवा त्यांना कसे टाळावयाचे याचा ते शोध घेत.

Hits: 826
X

Right Click

No right click