१०. भाऊरावांचे शैक्षणिक तत्वज्ञान - ४

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील

१०. भाऊरावांचे शैक्षणिक तत्वज्ञान - ४

८) जैन धर्मात मानवाच्या मुक्तीसाठी चतुर्विध दाने सांगितली आहेत. वसतिगृहाच्या स्थापनेमुळे त्यांचे आपोआप आचरण होत असे. विद्यादानामुळे वसतिगृहात मुलांना अन्नदान मिळे. आजारी मुलांना औषधदान मिळे. गरीब अनाथांना अभयदान मिळे. लोकशिक्षणाकडे वळण्यात या दान संकल्पनेचाही भाऊरावांकडून अम्मल होत असे. समाजातील कमकुवत घटकांतील मुले, निराधार मातृपितृविहीन मुले, शूद्र व दलित अस्पृश्य मुले व मुली यांच्यासंबंधी अपार करुणा भाऊरावांच्या ठिकाणी होती. सन १९२९ सालातील स्टार्ट समितीपुढील त्यांची साक्ष याचे द्योतक आहे.

९) या वसतिगृहातून भाऊरावांनी आपल्या कार्याची धुरा वाहणारे स्वाभिमानी, निर्भय, आत्मनिर्भर आपणासारख्याच तरुणांच्या पिढ्या तयार
केल्या. 'रयत सेवक? तयार करणारे ते शिल्पकार ठरले. विशेषत: शारीरिक श्रमावर भर देण्यामागे दोन हेतू होते. ग्रामीण व शहरी मुलांत “लाथ मारीन तेथे पाणी काढीन' ही प्रवृत्ती वाढवावी. व अस्पृश्य लोक जी हलकीसलकी कामे करतात त्याविषयी तिरस्कार करू नये म्हणून वसतिगृहात झाडलोट करणे, शौचालये साफ करणे, सर्वांना सक्तीचे होते.

१०) ही हलकीसलकी स्वच्छतेची कामे करण्याने मुलांच्या ठिकाणी उपजीविकेसाठी कोणतेही काम करणे कमीपणाचे नाही याची जाणीव व आत्मविश्‍वास निर्माण व्हावा ही अपेक्षा होती. शिक्षणानंतर मुलांना आपल्या गरीब पालकांविषयी लाज वाटता कामा नये. उलट, त्यांच्या मदतीसाठी कंबर कसून ते तयार झाले पाहिजेत. तसेच नोकरी करीत असताना स्वत्व, स्वाभिमान यांची लाचारीशी तडजोड करता कामा नये, मात्र दिलेले काम अनेक अडचणी सोसून पुरे करण्याची विद्यार्थ्यांची प्रवृत्ती बनेल याकडे भाऊरावांचे लक्ष असे. सन १९४८ साली शिक्षण खात्याने अनुदान बंद केल्यावर शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी जी प्रवृत्ती दाखविली हे त्यांचे ज्वलंत उदाहरण आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी भिक्षा मागणे भाऊरावांच्या तत्त्वात बसत नव्हते. 'कमवा व शिका? यामागे स्वाभिमान जागृत ठेवून सर्वांगपरिपूर्ण लोकोपयोगी नागरिक बनवणे ही दृष्टी होती. म्हणूनच र. शि. संस्थेच्या घटनेत माधुकरीसारख्या प्रथेचा त्यांनी समावेश केला नाही.

११) स्वावलंबन व स्वत:ची मदत स्वत:च करणे या डी. ई. सोसायटीच्या आजीव सभासदाच्या तत्त्वाचा शिक्षकांच्या बाबतीत; तर मुलांच्या बाबतीत अमेरिकेतील बुकर टी. वॉशिंग्टनच्या टस्कधी विद्यापीठातील “हाताचे शिक्षण शेतीच्या कामात व इमारती बांधण्याचे कामात स्वीकारल्याचे दिसते. आणि 'स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद!' (सेल्फ हेल्प इज अवर मॉटो) हे ध्येय ठरवून शासनाकडे, शेतकऱ्याकडे आम्हांस पडीक जमीन (वेस्ट लॅंड) द्या; आम्ही तिचे सुपीक (बेस्ट लॅंड) जमिनीत श्रमाने रूपांतर करू,' असे भाऊराव जाहीरपणे सांगत. ही मागणी करताना जनतेस शिक्षणाभिमुख करून शेतीच्या बाबतीत त्यांच्यामध्ये शास्त्रीय दृष्टिकोन रुजविण्याचा हेतू होता.

१२) स्वावलंबन आणि आत्मनिर्भरता हे गुण तरुणांच्यावर कसा परिणाम करतात हे सांगताना श्री. ए. पी. मॅकडोनेल म्हणतात, "स्वावलंबनाची निर्मिती आत्मसंयमातून होते, आणि आत्मसंयम केवळ ज्ञानग्रहणाच्या पद्धतीच्या पलीकडे जाऊन नैतिक आचरण व संस्थेच्या ध्येयाशी तादात्म्यातून निर्माण होते.” भाऊरावांच्या विद्यार्थ्यांनी सन १९२७ साली आजीव सेवक होण्याच्या शपथा घेतल्या. त्यांची बैठक संस्थेच्या ध्येयधोरणाशी तादात्म्य, कृतज्ञता, आत्मसंयम व स्वावलंब यातून निर्माण झाल्याचे दिसते.

Hits: 374
X

Right Click

No right click