९. शिक्षणातील प्रयोग - ९

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील

९. शिक्षणातील प्रयोग - ९

२७) या संघर्षाच्या काळात संस्थेतील सर्व शिक्षक अर्धपगारावर काम करण्यास तयार झाले. माध्यमिक शाळेतील व महाविद्यालयातील मुले व्हालंटरी शाळेवर काम करण्यास तयार झाली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पूर्ण चौकशीअंती मे १९४८ मध्ये डॉ. धनंजयराव गाडगीळ सातारला कार्यकर्त्यांच्या सभेत भाऊरावांच्या भूमिकेचा गौरव करून म्हणाले, “राज्यशासन जेव्हा उद्दाम व उदंड होते तेव्हा त्यांना वठणीवर आणण्याचे काम ऋषीमुनींना करावे लागते. भाऊराव हे वर्तमानकाळातील यती आहेत. त्यांनी जे केले ते रास्तच आहे याची मला खात्री पटली आहे.”

२८) वास्तविक सन १९३७ साली ता. १७ ऑक्टोबर रोजी नामदार खेरांनी व सन १९३८ साली ता. १४ जानेवारीस श्री. मोरारजी देसाई यांनी र. शि. संस्थेस भेट देऊन, वसतिगृहात राहून भाऊरावांचे काम प्रत्यक्ष पाहिले असल्याने हितशत्रूंच्या सांगीवांगी अहवालावर विश्‍वास ठेवावयास नको होता. पण काय करणार ! सत्ता त्यांच्या डोक्यात भिनली होती ती उतरणार कशी? या उभय गांधीवादी म्हणविणाऱ्याकडून गांधीवादी भाऊरावांचा हा छळ झाला एवढे मात्र खरे!

२९) भाऊराव शरीराने थकत चालले होते, तरी मनाची उभारी मात्र दांडगी होती. अशा स्थितीत भाऊरावांनी १५-८-१९४७ रोजी र. शि. संस्थेच्या भावी शैक्षणिक वाटचालीची घोषणा सातारच्या दैनिक 'ऐक्या'च्या “स्वराज्य” अंकात केली होती की :

(१) सातारा जिल्ह्यात एकही खेडे शाळेविना राहू द्यावयाचे नाही,
(२) जिल्ह्यात माध्यमिक शाळा काढून १० हजार विद्यार्थ्यांना शक्‍यतो मोफत शिक्षण द्यावयाचे,
(३) हुशार, गरीब व स्वाभिमानी एक हजार मुलांना संस्थेच्या कॉलेजमार्फत मोफत उच्च शिक्षण देण्याची सोय केली जाईल,
(४) कै. सौ. लक्ष्मीबाई पाटील स्मारक फंडांतून रु. १० हजारच्या शिष्यवृत्त्या दिल्या जातील.

या घोषणेनंतर ता. १२-२-१९४८ रोजी महाराष्ट्रात १०१ माध्यमिक शाळा व म. गांधी विद्यापीठ काढण्याची पूरक घोषणा केली. या पूरक घोषणेनंतर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांहून माध्यमिक शाळा काढण्यासाठी अर्ज येऊ लागले. सन १९५८ पर्यंत ७६ माध्यमिक शाळा काढण्यात आल्या, त्या अहमदनगर, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यांत भराभर निघाल्या.

Hits: 298
X

Right Click

No right click