९. शिक्षणातील प्रयोग - ८

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील

९. शिक्षणातील प्रयोग - ८

२४) साताऱ्यातील नागरिकांनीही सदर महाविद्यालयात स्थानिक मुलामुलींना प्रवेश द्यावा असा आग्रह व्यवस्थापक मंडळापुढे धरला. या स्थानिक लोकांचा पूर्वीचा विरोध विसरून व्यवस्थापक मंडळाने भाऊरावांच्या सम्मतीने वसतिगृहातील मुलांसमवेत शारीरिक श्रम करण्याची तयारी असल्यास स्थानिक मुलांना महाविद्यालयात प्रवेश तसेच श्रममूल्याइतकी शिक्षणशुल्कात सवलत मिळेल असे जाहीर केले. नंतर स्थानिक गरीब मुलेही वसतिगहातील मुलांसमवेत काम करून शिक्षणशुल्कात सवलत मिळवू लागली. एवढेच नव्हे तर एकतृतीयांश शिक्षणशुल्काइतके श्रम केल्यास एकतृतीयांश शिक्षणशुल्क माफ करून राहिलेल्या दोनतृतीयांश शुल्कासाठी सौ. लक्ष्मीबाई पाटील फंडातून कर्जाऊ मदत देण्याचे ठरविण्यात आले व शारीरिक अम करणे ऐच्छिक ठेवण्यात आले. भाऊरावांच्या मूळ 'कमवा व शिका” योजनेत झालेला हा बदल त्यांनी आर्थिक विवंचनेमुळे मान्य केला. सातारच्या, कराडच्या महाविद्यालयात सन १९४७ ते १९६० अखेर १०३४ मुलांनी या 'कमवा व शिका' योजनेचा फायदा घेतला. सन १९५९ साली ९ मे रोजी भाऊराव पुण्यात हृदयविकाराने मृत्यू पावल्यावर या योजनेकडे थोडे लक्ष कमी झाल्याचे दिसून येते.

२५) सन १९४८ साली जानेवारीच्या ३२० तारखेस दिल्लीत म. गांधींचा वध झाला. सार्‍या देशात दु:खाची लाट पसरली. ता. १२ फेब्रुवारी १९४८ रोजी सातार्‍यात गांधी मैदानात म. गांधींना श्रद्धांजली अर्पण करताना भाऊरावांनी महाराष्ट्रात म. गांधींच्या स्मरणार्थ १०१ माध्यमिक शाळा व महात्मा गांधी ग्रामीण विद्यापीठ स्थापण्याची घोषणा केली. परंतु याच सभेत त्यांनी मुख्यमंत्री बाळासाहेब खेरांच्या पुण्यातील वक्तव्यावर टीका केली. त्याचा विपर्यस्त अहवाल सातारा कॉंग्रेसमधील हितशत्रूंनी दिल्याने त्यावेळचे मुंबई प्रांताचे शासन वक्रदृष्टीने भाऊरावांच्या कार्याकडे पाहू लागले. आकसाने र. शि. संस्थेची व तिच्या शाखांची अनुदाने स्थगित करण्यात आली. भाऊरावांसह चार शिक्षकांवर खोटे आरोप करण्यात आले. परंतु चौकशीतून कांहीही निष्पन्न झाळे नाही व शासनास बिनशर्त अनुदाने द्यावी लागली. ना. बाळासाहेब खेर व गृहमंत्री मोरारजी देसाई यांच्यावर अनेक ठिकाणांहून टीका होऊ लागली. सांगलीचे दैनिक 'नेता', जळगावचे दैनिक 'बातमीदार', पुण्याचा 'ज्ञानप्रकाश' यांनी कडाडून टीका केली. खुद्द कॉंग्रेसमधील प्रांताध्यक्ष केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यास भरलेल्या सभेत श्री. बाळासाहेब खेर व श्री. मोरारजी देसाई यांच्यावर सभासदांनी त्यांच्या तोंडावर सडकून टीका करून त्यांच्या बेजबाबदार जातीयवादी भाषणाबद्दह व बहुजनसमाजाचे शिक्षण करणार्‍या र. शि. संस्थेचे आकसाने अनुदान बंद केल्याबद्दल निषेधाचा ठराव पास करण्यात आला.

२६) संस्थेचे अनुदान तहकूब केलेल्या मुदतीत भाऊरावांनी अनेक ठिकाणी दोरे करून संस्थेची बाजू पटवून दिल्याने जनतेने २० खंडी धान्य व त्रेपन्न हजार रुपये इतकी मोठी रक्‍कम जमा करून दिली. भाऊरावांनी अशा सभा घेऊ नयेत म्हणून त्यांचेवर भाषणबंदी लागू केली होती. सारांश र. शि. संस्था मूळातून नष्ट व्हावी अशी सातार्‍यातील सनातनी भाऊरावद्वेष्ट्या कांग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा होती. भाऊरावांची ना. बाळासाहेब खेरांवरील टीका हे कोलीत या हितशत्रूंना सापडले आणि खेरांनी अधिकची चौकशी न करता सातार्‍यातील या लोकांच्या खोट्या अर्जावर विश्‍वास ठेवून साप म्हणून भुई धोपटण्यास सुरुवात केली. भाऊरावांचे वय यावेळी ६१ वर्षांचे होते. त्यांना रक्तदाबाचा व संधिवाताचा विकार होता. त्यात या जीवघेण्या प्रसंगाने भर पडली. भाऊरावांचे आयुष्य कमी होण्यास हेही एक मोठे कारण ठरले.

Hits: 270
X

Right Click

No right click