९. शिक्षणातील प्रयोग - २

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील

९. शिक्षणातील प्रयोग - २

यानंतर महाराजांनी सातारच्या जुन्या इतिहासाचा आढावा घेऊन 'अज्ञान, ऐक्याचा अभाव व ख-या धर्माचा विसर यामुळे मराठी राज्य अल्पजीवी' झाल्याचे सांगून आपली भरभराट होण्यासाठी ज्ञानाचा प्रसार करून परस्परांतील भेदभाव आत्मनिरीक्षणाने कमी करण्यास सुचविले; तसेच आपल्या भावी पिढ्यांची शिक्षणाची जबाबदारी स्त्रीवर्गावर असल्याने स्त्रीवर्गास जरूर ते शिक्षण देण्यास सुचविले व म्हटले, “आज जनता जागी झाली असून जागृतीची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत, हा मोठा आशेचा किरण असून सातार्‍यासारख्या लहान शहरात तुम्ही इतके कार्य करू शकता यावरून आपल्या देशाचा भाग्योदय लवकर होईल, असा मला विश्‍वास वाटू लागतो. भाग्याचे हे दिवस आता लवकरच येतील याची तुम्हांस मी पूर्ण खात्री देतो. शेवटी आपण केलेल्या सत्काराबद्दल आपले आभार मानून मी आपले भाषण पुरे करतो.” (र. शि. संस्थेचा अहवाल :१९३५-१९३८., पू. ३६-४०)

४) सयाजीराव महाराजांनी या भाषणानंतर वसतिगृहाच्या मुलांनी तयार केलेल्या ज्वारीच्या भाकरीचा व खमंग तिखट पिठल्याचा आस्वाद
घेतला. सातारी मिरची त्यांच्या गुर्जरदेशीय मृदू जिभेस झणझणली. लगेच आतार नावाच्या मुलाने बागेतील शहाळ्याचे मधुर पाणी देऊन, शाहू
बोर्डिंगच्या सहवासाचा तिखटपणा व माधुर्य एकाच वेळी महाराजांच्या अनुभवास आणून दिला. तसेच भाऊरावांच्या कष्टप्रद ध्येयाची प्रचीतीही.

५) भाऊरावांच्या या राष्ट्रीय व भावनिक एकात्मतेच्या प्रयोगाचे महाराजांना सतत स्मरण होत राहिले. सन १९३५-३६ साली (ता. ३ जाने. ते ११ जाने. १९३६) बडोद्यात सयाजीराव महाराजांच्या राज्यारोहणाचा हीरक महोत्सव होता. रयत शिक्षण संस्थेस निमंत्रण होते. या समारंभात भाऊरावांसाठी दरबारी रीतीरिवाज बाजूस ठेवले. डोक्यावर पगडी व पायांत वहाणा न घालता भाऊरावांना समारंभाच्या सभामंडपात येण्यास महाराजांनी परवानगी दिल्याने महाराजांना हार अर्पण करण्यास भाऊराव सिंहासनाजवळ गेले व हारासह मानपत्र महाराजांना अर्पण केले.

६) अशा या राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व जाणणाऱ्या महाराजांचे संस्थेत स्मारक करण्याची कल्यना भाऊरावांच्या मनात घोळत होती. सन १९३७ साली सयाजीराव महाराज युरोपच्या दौऱ्यावरून परतत असताना इजिप्तमधील जिबुटी बंदरातून २६-११-१९३७ रोजी तार करून भाऊरावास मुंबईस भेटण्यास बोलाविले. भाऊराव महाराजांना मुंबईत ठरलेल्या दिवशी भेटले. गुर्जर प्रांतनिवासी हमीद ए. अलीनीही सन १९३५ मध्ये माध्यमिक शाळेची कल्पना भाऊरावांना सुचविली होती. पण भाऊरावांचा १९२२ सालचा ट्रेनिंग कॉलेजचा 'पण' आडवा येत होता. तो आता सुटलेला होता. भाऊरावांनी ओळखले होते की महाराज आपल्या संस्थेस मदत करू इच्छितात. भाऊरावांनी सरळ आपली माध्यमिक शाळेची कल्पना महाराजांना सांगितली ती अशी . 'सातारा जिल्हा पश्‍चिम महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आहे. बहुसंख्य मध्यम आणि मागासवर्गीय मराठा माज १२०० खेड्यांतून या जिल्ह्यात पसरलेला आहे. त्यास गरीबीमुळे शिक्षण घेता येत नाही. त्यांस स्वावलंबन, आत्मनिर्भरता व आत्मसन्मान या तत्त्वावर माध्यमिक शिक्षण घेण्यास मिळेल तर खेड्यातील मातीत दडलेली अनेक नररत्ने प्रकाशात येतील. नव्हे, त्यांच्या नशिबी शिपाई, चपराशीसारखे नोकर होण्याचे टळेल. दोन तास दररोज शारीरिक अम करणाऱ्या मुलास या शाळेत माध्यमिक शिक्षण मोफत मिळेल. त्याने स्वत:च्या गरीबीचे गाऱ्हाणे गाण्याची आवश्यकता राहाणार नाही.' (रा. अ. कडियाळकृत 'कर्मवीर भाऊराव पाटील? (इंग्रजी), पु. २१३२-१९)

Hits: 277
X

Right Click

No right click