६. स्वदेशी उद्योजकांच्या सहवासात -१

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील

६. स्वदेशी उद्योजकांच्या सहवासात -१

१) साडेसात महिन्यानंतर कोल्हापुरी पोलिसांच्या साडेसाती विळख्यातून बाहेर पडल्यावर, पुन्हा सातार्‍यात येऊन शिकवण्याचा व्यवसाय करण्याच्या बाबतीत भाऊरावांचे मन शेंकाकुल झाले होते. अशा वेळी योगायोगाने सहाध्यायी आत्मारामपंत ओगले यांची भेट झाल्याचे मागील प्रकरणात सांगितले आहेच. किर्लोस्कर आयर्न वर्क्सच्या आवारातच ओगलेंनी आपला ओगले ग्लास वर्क्स १९१३ साली सुरू केला होता. त्यांना स्वदेशी कंदील व काच सामानाची विक्री करणारा मातब्बर प्रतिनिधी हवा होताच. भाऊरावांनी भारत विमा कंपनीचा प्रतिनिधी, कृषी सुधारणा सोसायटीचा संघटक म्हणून केलेले काम गाठीशी असल्याने ओगल्यांनी भाऊरावांस आपला फिरता विक्रेता नेमले.

भाऊरावांनी दोन वर्षांत ओगल्यांचे भरीव काम केले. ओगल्यांच्या कंदील व काच सामानाचा मोठा उठाव केला. किर्लोस्करांच्या कारखान्याचे आवारातील जागा ओगल्यांना कमी पडू लागली. त्यांनी दोन वर्षातच १९१५ साली आपला कारखाना कराडच्या पूर्वेस औंध संस्थानच्या हद्दीतच हलविला.

२) भाऊरावांचे विक्रीतील कोशल्य श्री. लक्ष्मणराव किर्लोस्करांच्या नजरेत भरल्याने त्यांनी भाऊरावांस आपल्या कारखान्याचे फिरते एजंट नेमले. ओगल्यांच्या नवीन कारखान्यास सुरू होण्यास अवकाश होता. त्यामुळे भाऊरावांनी हे किर्लोस्करांचे काम स्वीकारले.

भाऊरावांनी महाराष्ट्रभर हिंडून किर्लोस्करांच्या लोखंडी नांगराचा व चरकाचा उठाव केला. भाऊरावांचे वडील निवृत्त झाल्याने घर चालवण्याचा
भारही भाऊरावांवर आला होता. किर्लोस्करांनी भाऊरावांना आपले सर्व कुटुंबच किर्लोस्करवाडीस आणण्यास लावले. भाऊराव किर्लोस्करवाडीच्या
छोट्या वसाहतीतील सामाजिक कार्यकर्तेच होते. त्यांचेकडे नाटक, क्रिकेट, करमणुकीचे कार्यक्रम यांचे संयोजन असल्याचे शंकरराव
किर्लोस्करांनी आपल्या 'शंवाकि” या आत्मचरित्रात म्हटले आहे. एवढेच नव्हे, तर ते कामगारांचे प्रतिनिधी होते. त्यांची गाऱ्हाणी श्री. लक्ष्मणराव
किर्लोस्करापर्यंत ते पोहोचवीत.

३) ज्या सत्यशोधक समाजाच्या नावाखाली भाऊरावांना कोल्हापुरात यमयातना भोगाव्या लागल्या होत्या त्या समाजाचे पुण्यातील व नगर जिल्ह्यातील कार्यकर्ते कोल्हापुरास येत. सातारा वाटेवरच असल्याने ओतूरचे डुंबरे पाटील, महामुनी यांचे जलसे सातार्‍यात होत असत. सन १९११ साली सातार्‍याला आल्यानंतर भाऊराव या जलशाकडे आकर्षित झाले होते. कोल्हापूरला शाहू महाराजांनी हे पुण्याकडील जलसे साहिल्यानंतर त्यांना दिसून आले की खेड्यातील निरक्षर ग्रामीण जनतेस सत्यशोधक समाजाचे कार्य पटविण्यास वृत्तपज्ञांपेक्षा जलसे अतिशय उपयुक्त आहेत. त्यांनी या जलशांना मदत देण्यास सुरवात केल्याने सातारा जिल्ह्यात सन १९१२ नंतर भाऊराव पाटोळे (भिलवडी), तातोबा यादव , कासेगाव), साबळे (शिवथर), रामचंद्र घाटगे (काले) या लोकांनी सातारा जिल्ह्यात सत्यशोधक जलसे, इस्लामपूर सत्यशोधक समाजाच्या विद्यमाने सुरू केले होते. भाऊराव पायगौंडा पाटील ऐतवडेकर या समाजाचे सभासद होते. (सत्यशोधक हीरक महोत्सव ग्रंथ, १९३४ , पु. ८-१०) भाऊराव या जलसेवाल्याबरोबर जिल्ह्यात हिंडत असत. ढोलकी चाजवण्याचे काम करीत, भाषणे देत, समाजाचा हेतू सांगत.

४) कि्लोस्करांच्याकडे काम स्वीकारल्यानंतरही लक्ष्मणरावांनी भाऊरावांना सत्यशोधक समाजाचे काम करण्यास मोकळीक ठेवली होती. कारण या जलशातून भाऊराव आधुनिक पद्धतीचे स्वदेशी नांगर लाकडी नांगरापेक्षा उपयुक्त असल्याचे पटवून देत व लोखंडी नांगरासंबंधीचा गैरसमज काढून टाकीत. सन १९१६ ते १९२० या पाच सालातच सातारा, सोलापूर, पुणे या जिल्ह्यांत समाजाचा प्रचार मोठ्या प्रमाणावर झाला. सातारा जिल्ह्यात भाऊराव व केशवराव विचारे प्रमुख प्रचारक होते.

Hits: 377
X

Right Click

No right click