५. संस्थानी पोलिसांच्या विळख्यात - १

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील

प्रकरण पाचवे
५. संस्थानी पोलिसांच्या विळख्यात - १

१) भाऊरावांना कोल्हापूरच्या दिगंबर जैन वसतिगृहातून श्री. अण्णासाहेब लठ्ठे यांनी हाकलले तेव्हा श्री. लठ्ठयाविषयी कर्मठ सनातनी जैन समाजात असंतोष होता. त्याला विविध कारणे होती; त्यापैकी त्यांना मिळाठेला सन्मान व त्यांचे पुरोगामित्व हे प्रमुख होते. अशा वेळी त्यांना पाण्यात पाहणारे प्रमुख होते कल्लप्पा भरमप्पा निटवेशास्त्री. या निटव्यांच्या सनातनी सहकाऱ्यांची एक पार्टी होती. तिला म्हणत पंडित पार्टी जैनातील सुधारणावादी, नवमतवादी तरुणांची होती बाबू पार्टी. या पार्टीचे प्रमुख होते, आण्णासाहेब लठ्ठे, बळवंतराव धावते, भाऊसाहेब कुदळे इत्यादी. 'निटवेशास्त्र्यांनी श्री. लठ्ठयांना विरोध करण्याचे तात्कालिक कारण म्हणजे अ. भा. जैन तभेस शाहू महाराजांनी दिलेला प्रेस पंडित निटव्यांनी हडप केला होता, औ. लठ्ठयांनी महाराजांना सांगून परत मिळविला.

२) याच सुमारास कोल्हापुरातील दरबारी मानकर्‍्यांत दोन तट होते. पहिला तट होता सनातनी, सरंजामी, अपरिवर्तनवादी प्रतिष्ठित मराठ्यांचा. या तटाचे प्रमुख होते बाळासाहेब गायकवाड.

दुसरा तट होता परिवर्तनवादी प्रागतिक विचारसरणीच्या सुशिक्षित उच्चपदस्थ संस्थानी सेवकांचा व शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारसरणीची अंमलबजावणी करणार्‍या विविध जातीतील तरुणांचा. सर्वश्री भास्करराव जाधव, अण्णासाहेब लठ्ठे, म. ग. डोंगरे, खंडेराव बागल, बाबूराव यादव इ. या दुसर्‍या तटाचे प्रमुख होते. शाहू महाराज या सेवकामार्फत पहिल्या तटाकडील मुजोरी मोडून काढीत. उदा. गायकवाडांनी शेरी जमिनीत विनापरवाना आपली जनावरे चारली म्हणून महाराजांनी भास्करराव जाधवांना महसूल अधिकारी या नात्याने श्री. गायकवाडांकडून दंड स्वरूपात रक्‍कम वसूल करावयास लावली. श्री. भास्करराव जाधव व श्री. गायकवाड यांत तेढ निर्माण झाली. महाराज वैदिक धर्माचे व आर्य समाजाचे पुरस्कर्ते होते. शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजास व त्यांच्या पुढाऱ्यास मदत केली होती. त्यांची अपेक्षा की, श्री. म. ग. डोंगरे, भास्करराव जाधव आदी सत्य समाजिस्ट महाराजांनी स्थापन केलेल्या वैदिक शाळेची जबाबदारी घेतील. पण ती जबाबदारी घेण्याचे त्यांनी टाळले. सारांश, सत्यशोधक समाजाचे तिन्ही पुढारी भास्करराव जाधव, म. ग. डोंगरे व अण्णासाहेब लठ्ठे शाहू महाराजांच्या नाराजीस कारणीभूत झाले.

३) सन १९१४ साली १४ फेब्रुवारीस शिवाजी क्लबच्या कोणीतरी सभासदाने कोल्हापुरातीलक टाऊन हॉलमधील ब्रिटिश राजघराण्याच्या एडवर्ड बादशहा व राणी अँलेक्झांड्रा व इतर राजपुरुषांच्या पुतळ्यास डांबर फासले. ही राजद्रोहाची घटना असल्याने महाराज अस्वस्थ झाले. कारण तिचे पडसाद इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये उठठे. गायकवाड पार्टीत कल्लप्पा निटवे, चिप्रीकर पाटील, सोवनी, करमरकर, लाटकर, जांभळीकर, म्हैसकर आदी होते. ही सनातनी पार्टी अण्णासाहेब लठ्ठयांच्या विरोधात असल्याने त्यांनी महाराजांचा गैरसमज करून दिला की हे डांबर फासण्याचे काम सत्यशोधकांचे व विशेषत: अण्णासाहेब लठ्ठयांचे किंवा त्यांच्या हस्तकांचे आहे. महाराज सत्यशोधकावर नाराज होतेच आणि कल्लप्पा निटव्यांना श्री. लठ्ठयावर सूड उगविण्यास आयती संधी चालून आली. त्यांत भाऊराव पाटलांचा उपयोग करावयाची कल्पना दृष्ट निटव्यांच्या डोक्यात आली व त्यांनी भाऊरावास तारेने बोलावून घेतले.

लठ्ठयांच्या विरुद्ध कट असा होता की लठ्ठयांच्या घरी त्यांच्या गैरहजेरीत एक डांबराचा डबा व त्याचे खरेदीचे कागद व डांबर फासण्याची योजना इ. कागद त्यांच्या टेबलाच्या खणात किंवा कपाटात ठेवून धाड घालावयाची. नंतर भाऊरावाने साक्ष द्यावयाची की, तो डांबर फासणारा माणूस त्यांना माहीत आहे. व लठ्ठयांना त्यात ओढावयाचे.

Hits: 291
X

Right Click

No right click