३. भाऊरावांचे शिक्षण व जडणघडण - ३

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील

घेऊन कोरिगावला प्रयाण केले.

१०) भाऊराव या वेळी बावीस वर्षांचे झाले होते. त्यांचेवर शाहू महाराजांच्या सामाजिक सुधारणांपैकी सगळ्यात मोठा परिणाम झाला तो त्यांच्या बहुजनसमाजाच्या शिक्षणप्रेमाचा. शाहू महाराजांची भावना होती की अज्ञानांधकारात बुडालेल्या अठरापगड जातींच्या मुलांना शिक्षण देऊन शहाणे केल्याशिवाय त्यांच्या संस्थानात काय किंवा हिंदुस्थानात काय, लोकशाहीची मुळे रुजणार नाहीत व लोकशाही स्थिर होणार नाही. लोकांना लोकशाही व स्वातंत्र्य यांचा अन्योन्यसंबंध जाणवणार नाही. महाराजांचे विचार अमेरिकन देशभक्त टिडियस स्टीव्हन्सप्रमाणे होते. पेनसिल्व्हानिया प्रांताच्या विधानसभेपुढे सन १८३४ साली स्टीव्हन्स म्हणतो, “लोकनियुक्त प्रजासत्ताक टिकावयाचे असेल तर प्रत्येक मतदारास स्वत:च्या आर्थिक हिताखेरीज, विधानसभेस, इतर देशांत राज्यप्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांना व देशाच्या कार्यकारिणीस (मंत्रिमंडळास) शहाणपणाने मार्गदर्शन करण्याचे ज्ञान असले पाहिजे. काही प्रमाणात ही जबाबदारी प्रत्येक स्वतंत्र नागरिकाची आहे. आपल्या
शासनाचे स्थायी स्वरूप अशा ज्ञानावर जर अवलंबून आहे, तर ज्ञान मिळविण्याची साधने प्रत्येक नागरिकास उपलब्ध करण्याची जबाबदारी शासनाची आहे. जे लोक शिक्षण देणे हे शासनाचे कर्तव्य नसून खाजगी बाब मानतात त्यांना हे माझे उत्तर पुरेसे आहे.” (शंकरराव मोरेकृत प्राथमिक शिक्षण', १९३७, पृष्ठ १७७)

११) कोल्हापुरातील वसतिगृहयुक्त शैक्षणिक चळवळीतून मुलांना नैतिक शिक्षण व शिस्तीचे धडे मिळून ते संस्थानी शासनास मदत करणारे जबाबदार नागरिक व्हावेत हा उद्देश होता. दुसरा उद्देश होता की, शिक्षणाने जातीय दृष्टी व जमातवाद कमी होऊन या वसतिगृहातील तरुणांतून सामाजिक कार्यकर्ते तयार व्हावेत. भाऊराव हे त्याचे दृश्य फळ होते. ऑगस्ट १९२० मध्ये आर्य क्षत्रिय समाजाच्या परिषदेत शाहू महाराज म्हणाले, “जातीभेद हा भारताला लागलेला मोठा व प्रमुख रोग आहे. स्वत:च्या जातीपलीकडे मोठा समाज आहे, हे प्रत्येकाने जाणले पाहिजे.
२०) कर्मवीर भाऊराव पाटील - काल आणि कर्तृत्वस्वत:च्या जातीचा अभिमान दुय्यम असला पाहिजे. प्रथम आपण भारतीय आहोत, भारताचे हित ही आपली पहिली जबाबदारी आहे, याचा विसर पडता कामा नये. जातीच्या अभिमानाने राष्ट्रीय हिताकडे डोळेझाक होता कामा नये.” (एम. एस. शिंदेकृत “भारतातील विद्यार्थी वसतिगृहाचे आद्यजनक', राजर्षी शाहू गौरव ग्रंथ, संपा. पी. बी. साळुंखे.) या प्रकारचे विचार आपल्या बलदंड शरीरावरील मस्तकात घेऊन भाऊराव कोरेगावात
वावरत होते. कोल्हापुरात असताना भाऊरावावर आणखी दोन संस्थांचे संस्कार झाले. ते म्हणजे १९०८ साली कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे मिस्‌ क्लार्क वसतिगृहाच्या उद्घाटनास आले असता त्यांच्या डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे विचार भाऊरावांच्या संस्कारक्षम मनावर आदळले. सन १९०२ पासूनच सत्यशोधक समाज व महात्मा फुले यांचे विचार भास्करराव जाधव, गणपतराव कदम वकील यांच्या 'दीनबन्धु' वृत्तपत्रातून भाऊरावांवर परिणाम करीत होते. व भावी कार्याची रूपरेषा भाऊरावांच्या मनात आकार घेत होती.

Hits: 333
X

Right Click

No right click