चाफेकर नि रानडे यांजवरील फटका - परिचय

Parent Category: मराठी पुस्तके Category: स्वातंत्र्यवीर सावरकर समग्र कविता

चाफेकर नि रानडे यांजवरील फटका - परिचय
(परिचय : हा फटका चाफेकर नि रानडे फाशी गेल्याची बातमी येताच सावरकरांनी सन १८९९चे मध्यंतरात रचला. त्या वेळी त्यांचे वय अवघें सोळा-सतरा वर्षांचे होते.

वीर सावरकरांच्या वडिलांना 'अण्णासाहेब' म्हणत. ते त्या वेळच्या टिळकपक्षीय राजकारणाचे अभिमानी होते. त्यांच्या भगूर येथील 'नव्या वाड्या'चे बैठकीत, त्यांच्या गावची नि त्यांच्या आजूबाजूच्या गावची पाटील, शेठजी, शेतकरी, शिक्षक अित्यादि वर्गातील त्यांची इष्ट मित्रमंडळी जेव्हा जमे, तेव्हा 'केसरी', 'जगद्वितेच्छु', 'पुणे वैभव' नि नवीनच निघालेला आणि तात्यांचा, कुमार सावरकरांचा, आवडता 'काळ' इत्यादि पत्रे वाचली जात, चर्चिलीही जात.

त्या काळी प्लेगने देशभर प्रथमच भयंकर कहर उडविला होता. त्या प्लेगची वर्णने, सरकारची दडपशाही, रॅंडचा वध, लो. टिळकांचा खटला नि शिक्षा, चाफेकर-रानड्यांचे खटले नि त्यांना झालेल्या फाशीच्या शिक्षा इत्यादि उत्क्षोभक बातम्या एकामागून एक येत गेल्याने सर्वच जनतेत त्या वाचल्या जाताच जशी खळबळ उडत जाई तशीच अण्णारावांच्या त्या छोट्याशा बैठकीतही उडे. त्या बैठकीत हीं वर्तमानपत्रे वाचून दाखविण्याचें काम पुढेपुढे कुमार सावरकरांकडे सोपविलेले होतें. चर्चेमध्ये तर कुमार सावरकर इतक्या त्वेषाने परकीय सरकारवर तुटून पडत आणि चाफेकरांच्या कृत्याचें नि क्रांतिप्रवणतेचें इतक्या आग्रहाने समर्थन करीत की, त्यांच्या वडिलांनी असें उघडअुघड न बोलण्याविषयी आपल्या त्या
तिखट मुलास एकान्तात प्रेमाने समजावून सांगावे! - परंतु त्या कुमाराचें मन 'चाफेकरांसारखें काही तरी करावें', अशा अग्र विचारांनी भारून गेलें ते गेलेंच !

ज्या दिवशी चाफेकर-रानड्यांना शेवटी फाशीवर चढविल्याची वार्ता आली, त्या पुढच्या एक दोन दिवसांतच कुमार सावरकरांनी त्यांची कुलस्वामिनी असलेल्या अष्टभुजा देवीपुढे प्रतिज्ञा केली की, 'चाफेकरांचें अपूर्ण राहिलेले कार्य मी पुढे चालवीन ! माझ्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी मी सशस्त्र क्रांतीची उठावणी करीन! '

सावरकरांच्या बालवयातील ह्या उग्र प्रतिज्ञेचा पडसाद, गाभाऱ्यात वेदघोषांचा पडसाद अुठावा त्याप्रमाणे, त्याच वेळी रचलेल्या ह्या फटक्यातील खालील शेवटच्या ओळीतही उठत आहेत : -

कार्य सोडुनी अपुरें पडलां झुंजत, खंती नको! पुढे ।

कार्य चालवू गिरवित तुमच्या पराक्रमांचे अम्ही धडे ॥

कुमार सावरकरांनी चाफेकर प्रकरणावर एक नाटिकाही रचिली होती. त्या गावातील तमासगिरांपैकी राणूशेट शिंपी ह्यांचा जो प्रमुख फड होता त्यातील सावरकरांच्या बालमंडळींपैकी परशुराम नि राजाराम शिंपी ह्यांच्या खटपटीमुळे त्या फडाने ती नाटिका बसविली. आता खेळ व्हायचा, तों गावच्या पाटील-कुळकर्ण्यांना ती वार्ता कळली. तेव्हा काही धाक दाखवून, काही गोडीगुलाबीने त्यांनी तो बेत रद्द करविला आणि गावावर येणाऱ्या ह्या 'नसत्या अरिष्टा'पासून गाव बचावलें.

ह्या चळवळीमुळे कुमार सावरकरांच्या वडिलांना आपल्या आवडत्या नि होतकरू मुलाचें हें प्रकट होअू लागलेले तेज, बुद्धि, प्रखर देशभक्ति आणि वीरवृत्ति पाहून मनात अत्यंत कौतुक नि अभिमान वाटे; पण हृदयात ह्या त्याच्या धाडसीपणामुळे केव्हा काय संकट ओढवेल त्याची चिंता लागून धस्स होई. आपल्या वडिलांची चिंतातुर मुद्रा पाहून त्या मुलालाही वाईट वाटे. ह्यासाठी जेव्हा हा फटका कुमार सावरकरांनी रचावयास घेतला तेव्हा तो बेत त्यांनी वडिलांना कळविला नाही. रात्री सगळे निजले म्हणजे 'नव्या वाड्या'तील बंगल्यात झोपाळ्यावर बसून अंधेरातच मनाशी ओळी रचाव्या आणि झटकन्‌ दिवा लावून तेवढ्या ओळी कागदावर उतरून लगेच दिवा विझवून टाकावा; असा त्यांनी क्रम ठेवला. पण एका रात्री अण्णा सहज उठले नि दिवा कोणी लावला म्हणून पाहावयास वर आले. तों त्यांनी पाहिलें, आपला मुलगा तन्मय होऊन काही तरी लिहीत आहे! कागद उचलून पाहतात तों 'चाफेकरांचा फटका !' अण्णा न रागावता पण कळकळीने मुलाला समजावू लागलें, 'हें पहा, तू अजून लहान आहेस. आपले कुटुंब म्हणजे एका खांबावर उभी असलेली द्वारका! तू पुढे थोरपण पावशील, आमचे पांग फेडशील, ह्या आशेवर मी दिवस कंठीत आहे. पण तू अशा भयंकर नादापायी आपल्या कुटुंबावर अकस्मात्‌ एखादें प्राणसंकट ओढवून घेशील. म्हणून सध्या तू हा असमय आणि अपक्व खटाटोप सोडून दे. पुढे मोठा झालास, बुद्धि प्रगल्भ झाली म्हणजे काय भवितव्यता असेल तें घडेल ?'

चार-पांच महिन्यांच्या आतच कुमार सावरकरांवरील तें पितृप्रेमाचें छत्रही मोडून पडलें! त्यांचे वडील प्लेगमध्ये वारले! सबंध कुटुंबच प्लेगच्या कहरात वाताहत झालें. प्लेगच्या ह्या संकटाला तोंड देण्यात सावरकर कुटुंब गुंतल्यामुळे पुढे एक वर्षभर ह्या फटक्याकडे कोणासही लक्ष देण्यास झालें नाही.

पुढे सावरकरांचें कुटुंब नाशिकला येवून राहिल्यानंतर त्या फटक्याचा प्रचार चालू झाला. अनेक बैठकांतून सावरकर तो स्वतः म्हणत. नाशिकला येणाऱ्या जाणाऱ्या बाहेरगावच्या नि पुण्यामुंबईच्या कित्येक मंडळींनाही ह्याचा चटका लागून तो फटका त्यांनी अुतरून न्यावा, पाठ करावा; आणि तेथल्या तेथल्या समाजांत अंतःस्थपणे म्हणून दाखवावा.

शब्दालंकारांनी नि अर्थालंकारांनी इतका रसरसलेला आणि क्रांतिकारक आवेशाने भरलेला हा फटका कुमार सावरकरांनी सोळा-सतराव्या वर्षीच रचावा; ह्याचें आजही जें कौतुक वाटतें त्याच्या दसपट कौतुक त्या वेळच्या राजकीय परिस्थितीत शतावधि तरुणांनाच नव्हे, तर नामांकित कवींना आणि पुढाऱ्यांनाही वाटावें हें साहाजिकच होतें. कुमार सावरकरांनीच स्थापलेल्या गुप्त संस्थेची उघड प्रचाराची 'मित्रमेळा' ही शाखा होती. त्या शाखेतील कै. वामनराव खरे, म्हसकर, पागे प्रभूति अनेक प्रौढ नि प्रतिष्ठित मंडळींच्याही मनात हा फटका छापावा असें वारंवार येअू लागलें. परंतु ज्या काळात काही मोठमोठे राजकीय नेतेही मनात नसतानासुद्धा आणि बरेचजण मनापासूनच चाफेकर-रानड्यांना आततायी, नीच, 'राजनिष्ठ सौजन्यशील नि सात्विक' अशा हिंदुजातीस कलंक लावणारे इत्यादि वेचक शिव्या हासडीत सभांतून नि वृत्तपत्रांतून निषेधाचा विषारी पाऊस पाडीत होते आणि परकी सरकार पिसाळून जाऊन ज्याला त्याला चावत सुटलें होतें,
त्या १९००-१९०१च्या काळात चाफेकर-रानड्यांना 'राष्ट्र-वीराग्रणी' आणि 'अनुकरणार्ह' म्हणून इतक्या अुत्कटपणे अभिनंदणारा हा फटका छापणें ही गोष्ट मुळातच दुर्घट होती! छापून देणारा तरी कोण मिळणार ? तेव्हा हा फटका मूळ धोरण न सोडता, शक्य तों सौम्य करून देण्यासाठी ह्या मंडळींनी सावरकरांना सांगितलें. त्यांनीही काही फेरफार नि गाळागाळी करून तो शक्‍यतों सौम्य केला. पण तिखटाच्या पाळ्यातून काही तिखट काढलें तरी अुरलेले तें तिखटच असणार! तरीसुद्धा ही सौम्य प्रत सुविख्यात 'काळ'कर्ते यांजकडे अंत:स्थपणे धाडावी आणि छापावी किंवा काय ह्या दृष्टीने अभिप्राय विचारावा असें ठरलें. त्याप्रमाणे श्री. म्हसकर यांनी ती प्रत धाडली. काळकर्त्यांनी त्या कवितेची आणि त्या वेळेस ओळख नसलेल्या त्या बालकवीची उचित तितकी वाखाणणी करूनही ती कविता छापणें त्या परिस्थितीत अनिष्ट आहे असें मत दिल्याचे म्हसकरांनी मंडळींना सांगितलें.

ह्याच सौम्य प्रतीचे वेळी मूळ फटक्यात सावरकरांनी अंतीच्या चरणातील आपलें सरळ घातलेलें नांव बदललें आणि चित्रकाव्याचा आश्रय करून तें शेवटच्या चारपांच ओळीत कूटस्थपणें गोविलें. ह्या फटक्यात शेवटच्या चारपांच ओळींत ठळक अक्षरांमध्ये तें नांव प्रकट करून छापलें आहे.

पुढे छापण्यासाठीच म्हणून रचलेले सावरकरांचे पोवाडेही जेव्हा धडाधड जप्त होअू लागले तेव्हा या फटक्याची 'सौम्य' प्रतही छापण्याचे नांवच काढणें अशक्य झालें. तथापि त्याचा प्रचार वाढतच गेला. लग्न समारंभ, उत्सव, संमेलनें इत्यादि प्रसंगी निवडक बैठकींतून हा फटका ठिकठिकाणी म्हटला जाई. फर्ग्युसन कॉलेजमध्ये सम्मेलनादि प्रसंगी स्वत: तरुण सावरकर हा फटका म्हणत असता श्रोत्यांत क्रांतिशील आवेश आणि स्फूर्ति कशी संचरत असे तें प्रत्यक्ष अनुभवाने सांगणारी मंडळी सुदैवाने आजही विद्यमान आहेत. जेव्हा मधून मधून धरपकडीची सत्रे चालू होत तेव्हा या फटक्याची तुरळक प्रत कोणाजवळ सापडली किंवा हा फटका म्हणत असता कोणी धरले गेले तर ती गोष्ट ते गृहस्थ क्रांतिकारक असल्याचा एक बळकट पुरावा म्हणून गणला जाई! परंतु असले धोके पत्करूनही शतावधि स्त्रीपुरुषांनी गुप्तपणे प्रती करून, तोंडपाठ करून, पिढीमागून पिढीचे जिव्हेवर आज पन्नास वर्षे तरी तो फटका जिवंत ठेवलेला आहे! महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर एकंदर सावरकर साहित्याने केवढी छाप पाडलेली आहे त्याचे त्यांची ही बालवयातील कविताही एक प्रत्यंतरच होय.

आश्चर्य हें की, छापण्यासाठीच म्हणून जे अगदी जपून रचिले ते सावरकरांचे सिंहगडादिक पोवाडे छापले म्हणूनच जप्त झाले! परंतु जप्तीची लवलेशही क्षिति न बाळगता रचलेला आणि इतका शस्त्राचारप्रवण नि क्रांतिशील असणारा हा फटका छापतासुद्धा आला नाही; म्हणूनच केव्हाही रीतसर जप्त झाला नाही!

अनेक वर्षे अनेकांकडून तोंडी म्हटला गेल्याने नि गुप्तपणे प्रतविला गेल्याने ह्या फटक्यात कित्येक पाठांतरें आढळलीं. ती संकलून नि समन्वयून ह्याची शुद्ध प्रत अुण्यापुऱ्या पन्नास वर्षानंतर सन १९४६ मध्ये प्रथमच छापण्यात आली.)

Hits: 440
X

Right Click

No right click