४. स्फुट कविता

Parent Category: मराठी पुस्तके Category: स्वातंत्र्यवीर सावरकर समग्र कविता

४. स्फुट कविता

(१) लो. टिळकांना वरूं इच्छिणाऱ्या स्तुति नि कीर्ति
(मालिनी)

अुपवर स्तुतिकन्ये, मानला बाळ भारी ॥
परि सवतिभयें तो, नित्य तीतें निवारी ।।
करुनि मग गुणांही, युक्त त्यातें सुकंठी ॥
दृढ कवळुनि आता नित्य ती काळ कंठी ॥१ ॥

(शिखरिणी)
दुरोनी ऐकोनी वरगुणगुणांलुब्ध रमणी
मृगाक्षी कीर्ति ये टिळक वरण्या अुत्सुक मनीं ॥
परीं कारागारीं वसत न कळोनी न भवनी ॥
प्रियातें शोधाया भटकत फिरे ती त्रिभुवनीं ॥२ ॥

(हे दोन श्लोक लोकमान्य रा.टिळकांवर ते कारागृहात असताना (भोजनसमयी) रचले आहेत. सन १८९८.)

(२) प्लेग
(शार्दूलविक्रीडित)

देखोनी अतिरम्य स्थान उतरे जो मुंबई बंदरीं ॥
ज्या सारे जपती; त्वरें लपति यत्क्रोधें दरीकंदरीं ॥

जिज्ञासा धरुनी घरोघर समाचारास जो घेतसे ॥
तीर्थे क्षेत्रपुरें प्रसिद्ध नगरें आलोकण्या जातसे ॥ १ ॥

असा हा नृपराज प्लेग भटके देशात ह्या त्या सवें ।॥
भेटे जो जन त्यास दंड करितो काळा न जो सोसवे ॥

देतो शासन मूषकांकडुन कीं मी येत आहे हटा ॥
जागा द्या; मग दंडितों पळतिना पेटोनियां जे हटा ॥२ ॥

(३) काळास नमन
(शार्दूलविक्रीडित)

त्या काळास असो सदा नमन जो नांदे सुखें डोलतां ॥
वाता हाटवितां; चिरंजिव ठरे वातात्मजा तोलता ॥

जो मागे परते न लेश कधि जो ना थांबतो चालतां ॥
कल्पीता वितळे; रतीभर न भूकंपेहि जो हालतां ॥१ ॥

मार्गा आक्रमिता सदा करितसे कोट्यानुकोटी कृती ॥
ज्याहीं सुष्ट जनांस सत्फल मिळे. दुष्टां जनां विकृती ॥

ज्ञाता जो इतिहासचिंतक असा पावे सुखा लोकिं तो ॥
यासाठी गतवर्षवृत्त समुदायालागि आलोकितों ॥२ ॥

Hits: 365
X

Right Click

No right click