२. गणेशोत्सवप्रसंगी रचलेल्या आर्या

Parent Category: मराठी पुस्तके Category: स्वातंत्र्यवीर सावरकर समग्र कविता

२. नाशिक येथील अि. स. १८९७च्या गणेशोत्सवप्रसंगी रचलेल्या आर्या (गीति)

वंदुनि प्रथम भवानी वर्णी गेल्या गणेशउत्साहा ।
कीं हिंदु बांधवासी आधारचि कामधेनु वत्सा हा ॥ १ ॥

जरि पुण्यपत्तनासम गजबजला ना तरी असामान्य ।
झाला तोची बहु कीं लघुसौभद्रहि जनीं जसा मान्य ॥२॥

प्रथम चतुर्थी येतां उत्कट आनंदभरित जन झाले ।
भावें सकलजनांनीं शिवकुमरा गणवरासि आठवले ॥३ ॥

होते मेळ तयारचि जरि चारचि तरि बहूत सुंदर ते ।
गणराजकीर्तिधीला शोभे सुंदर कराचि बंद रते ॥ ४ ॥

त्या निशि पुराण गर्दी गणराया गावयास गवयांची ।
लटपट जन खटपटती मुकले जे त्या कशास चव याची ॥५ ॥

रस्तोरस्ती स्तविती गणराया वदति 'तार आर्या या' ।
प्रभुजी, असह्य हरहर चिरती चरचर हजारगायायां ॥६ ॥

ज्या आर्यांचा पदमलतेज शमाया हरादि खटपटती ।
दैदिप्यमान ब्राह्मण गोरे तेची बघून लटपटती ॥ ७ ॥

जी रामकृष्णवासें सत्क्षेत्रेंपावलीं अशा सुपदा ।
हरहर त्यांतचि ब्राह्मण भोगिति निर्बंधनें सदा अपदा ॥ ८ ॥

ज्या शूर पूर्वजांनी जरिपटिका थेट अटकिं फडकविला ।
त्यांचेच आम्ही वंशज भ्याडाकृति ज्या कथासि नड कविला ॥९ ॥

आज विजापुर उदईक दिल्ली कीं चालले पन्हाळगडा ।
राव भरारी जेथे ही स्थिती तेथेंचि लाजवी दगडा ॥ १० ॥

राजा परकी शिक्षण परकी लक्ष्मीहि जाहली परकी ।
आतां प्रभो दयाळा, तुजविण कोणीच ना रिपू हाकी ॥ ११ ॥

तरि गणराया समया करिं या बदला धरा हरा अपदा ।
अपराध क्षमा व्हावे हे दीन तुझेचि दासची स्तवीति पदां ॥ १२ ॥

नरवर विघ्नहर प्रभु सुखकर भयहर स्मरारि प्रिय अमरां ।
अजरा विश्वाधारा भक्तवरा तुज नमोस्तु शिवकुमरा ॥ १३ ॥

Hits: 407
X

Right Click

No right click