१. श्रीमंत सवाई माधवरावांचा रंग

Parent Category: मराठी पुस्तके Category: स्वातंत्र्यवीर सावरकर समग्र कविता

१. श्रीमंत सवाई माधवरावांचा रंग
(जाति : स्वर्गज्ठ) (फटका)

(परिचय : सावरकरांनी वयाच्या अकराव्या वर्षी रचलेला फटका ह्या फटक्यांत कवि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अगदी लहानपणी झालेला बखरींचा परिचय ध्यानांत येतोच; पण, प्रभाकराचाही पोवाडा त्यांच्या अवलोकनांत आल्याचे ओळखतां येते.)

धन्य कुलामधिं धनी सवाई भाग्य धन्यची रायाचें ।
सेवक हातीं यशस्वि असती पुण्य किती त्या पायांचें ॥ १

श्रीमंतांचे भाग्यप्रतापें द्वादश वर्षे बहु श्रमले ।
अटकेला जरिपटका रोंविति पुन्हां सर्वजण चट नमले ॥ २

रजपूतादी शूर रिपूही श्रीमंतांसी शरण आले ।
मोंगलपतिंनीं प्रसन्न होऊनि वजिरपदासी अर्पियलें ॥ ३

जिकडे तिकडे नाम पेशवे काळ शत्रुसी वाटुनियां ।
प्रजेंत झाली बहू शांतता रिपू सर्व हे हटूनियां ॥। ४

नाच शिकारी रंग तमाशे प्रजेंत होती नित्य पहा ।
श्रीमंतांनी बेत ठरविला रंग करावा असा महा ॥ ५

रायाचा कल पाहुनि सर्वहि देती सत्वर रूकारा ।
हर्ष होतसे वर्षप्रतिपदे पुण्यांत झाला पूकारा ।॥ ६

सरकारांनीं सरदारांनी सकलजनांनीं दों रस्तीं ।
रंग करोनी ठिकठिकाणिंही केलि सुशोभित ती वस्ती ।॥ ७

पागे पथके मानकरी आणि कारभारि हे सरदारा ।
श्रीमंत प्रभु माधवरायासहीत आले दरबारा ॥। ८

जिंहीं रोविला महाप्रतापें जरिपटक्याला अटकेला ।
महादजीची स्वारी आली सरकारांना न्यायाला ॥ ९

हत्ती घोडे फौज असा हा समाज सर्वचि मीळाला
आज्ञा केली श्रीमंतें मग सुरुवात करा खेळाला ॥ १०

उडूं लागले गुलाल पल्ले हौद खपविले फौजेने ।
रंगाचे, किति खेळुन स्वारी वाड्यामध्यें मौजेनें ॥ ११

नंतर स्वारी तिसरे प्रहरी निघालि शहरीं थाटानें ।
वाडा डावा घालुन गेली बुधवाराचे वाटेनें | १२

पुढें विलसते मुख्य स्वारी सवें थाट अंबाऱ्यांचा ।
चंद्रबिंब श्रीमंत अवांतर प्रकाश पडला ताऱ्यांचा ॥ १३

पिचकाऱ्यांचा मार जाहला फार तेधवां बुधवारीं ।
स्वारी कापडआळींतूनी खेळत आली रविवारीं ।॥ १४

हरिपंतांचे वाड्यापाशी रंग केशरी उडवुनियां ।
स्वारी गेली नागझरींतुन रंग केशरी तुडवुनियां || १५

रास्ते यांचे पेठेमध्यें पाट लागले रस्त्यांनी ।
गच्च्यांवरूनी बंब लावुनी रंग अडविला रास्त्यांनी ॥। १६

सलाम मुजरे सर्व राहिले दंग जाहले रंगांनीं ।
द्वापारिं जसे रंग करविले भगवान श्रीरंगांनीं ॥ १७

शहरिं भिजविले कैक बंगले चौक गुलालें रंगांनी ।
द्वापारिं जसे वृंद भिजविले भगवान श्रीरंगांनीं ॥। १८

झुकत झुकत समुदाय चालती स्वारी ये मग वानवडी ।
नंतर रंगा आरंभ झाला नाच होअूनी दोन घडी ॥ १९

लाखों हौदे अडूं लागले पिचकाऱ्यांचा मार अती ।
झालि रे झाली गर्दी अकचि वर्णावी ती पहा किती ॥ २०

दों दों हातीं गुलाल भरती लाल छत दिसे बुंदांत ।
हास्यवदन मग राव शोभती शूर शिपाईवृंदांत ।॥। २१

नंतर असा रंग खेळुनी अुठले स्नानाला जाया ।
अगणित त्या क्षणि तापुं लागल्या सुगंधि पाण्याच्या कढया ॥। २२

वेगवेगळीं सुगंध तेले रायाला लावायाला ।
अभे राहिले ब्राह्मण घेअुनि घालायातें न्हायाला ।॥। २३

अवर्णनियशा थाटानें कीं झालीं सर्वांची स्नानें ।
सर्वांसी मग वाटुनि दिधलीं अनंत वस्त्रे शिंद्यानें ॥ २४

नवीं लेवुनी वस्त्रे पुनरपि येति सर्वही दरबारा ।
नाच जाहला सुरू होअुनी पानसुपारी हारतुरा ॥ २५

मग शिंद्यांनी श्रीमंतांना शिरपेंच तुरा नव अर्पियले ।
तसेंच सर्वां जनांस देखा अमोल पोशाखा दिधले ॥ २६

सूर्यबिंब लज्जीत होइसें हिलाल लावुनि मग रात्री ।
अुलटी परते स्वारी सर्वहि संगें नानादी मंत्री ॥ २७

शोभा बघती नरनारीगण चिराकदानें लावुनियां ।
गजरानें अति स्वारी येती वाड्यामध्ये घेउनियां ॥॥ २८

- भगूर, १८९४

Hits: 393
X

Right Click

No right click