वडीलधार्‍यांचे अनुकरण

Parent Category: मराठी साहित्य Category: सौ. शुभांगी रानडे यांचे लेख Written by सौ. शुभांगी रानडे

मोठ्या माणसांबद्दल आदर बाळगावा ही गोष्ट काही शिकवावी लागत नाही. तर अनुकरणप्रिय असणारी लहान मुले ही मोठ्या माणसांप्रमाणेच सर्व कृती करण्याचे आपोआपच शिकतात. सायंकाळी बाहेरून घरात आल्यानंतर जर आई, वडील स्वतः हातपाय धुऊन देवाला नमस्कार करीत असतील तर लहान मुले ते सहजपणे करतातच. देवापुढे दिवा लावून ‘शुभं करोति’ म्हणताना - जरी त्याचा अर्थ कळत नसला तरी - लहान मुलांना हेही आपोआप म्हणता येते. म्हणजे सवय ही चांगली किंवा वाईट अशी दोन प्रकारची असते. ‘संगति संग दोष किंवा गुण’ हा स्वाभाविकपणे येतोच. त्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. ‘ढवळ्यासंग पवळ्या . . . ’ अशी काहीशी स्थिती होते.

आता हीच गंमत बघा ना . . आमच्याकडे रोज एक पांढरे शुभ्र मांजर येते. तसे आम्ही त्याला पाळले वगैरे नाही पण दार उघडताक्षणीच ते ‘म्याव म्याव’ करीत आपल्या आस्तित्वाची जाणीव करून देते. अपेक्षा असते ती केवळ एका घोटभर दुधाची. मग आमचा संवाद सुरू होतो. आमचा म्हणजे माझा आणि त्या मांजराचा हं! मी विचारते ‘काय मांजरोपंत, आलात का?’ थोडाही वेळ न दवडता मांजराचे उत्तर येते, ‘म्याव’. ‘आज उंदीर मिळाला नाही वाटतं?’ माझा प्रश्न. ‘म्याव म्याव’ मांजराचे उत्तर. चहापाणी करता करता मी घरातल्यांशी काहीबाही बोलत असते. त्यावेळी माझा आवाज ऎकून मांजर मुळीच ‘म्याव म्याव ’ वगैरे म्हणत नाही. पण जेव्हा त्याला उद्देशून ‘मांजरू, थांब आले हं’ असे मी म्हणते तेव्हा त्याच्याकडून ‘म्याव म्याव’ असे उत्तर येतेच. सांगायचे तात्पर्य एवढेच की, माझे बोलणे ऎकून ऎकून ‘अनुषा’ - माझी लहान दोन वर्षाची नातही म्हणते, ‘आजी मांजरोपंत आले आहेत. त्यांना दूध हवे आहे म्हणे’. ‘ए, शुक्‌, शुक्‌.’ असे म्हणून ती त्याला हाकलून देत नाही. उलट माझ्या पावलावर पाऊल टाकून ‘मांजरोपंत’ अशी शब्दयोजना करते याचे मला कौतुक वाटले.

सांगायचे तात्पर्य एवढेच की, भलेबुरे आपण जसे वागतो तसेच लहान मुले किंवा इतर लोकही वागतात. अर्थात याची सुरूवात मात्र आपल्यापासूनच झाली पाहिजे असे प्रत्येकाने ठरविले पाहिजे.
मोठी माणसेच शिस्तीने जेवत असतील तर मुलेही त्यांचे पाहून तसेच वर्तन करतील. पण याउलट ‘मचमच’ आवाज करीत जर मोठी माणसे खात पीत असतील तर लहान मुले साहजिकच त्याचेच अनुकरण करतील. म्हणून मुख्यतः घरातील पालकांवर वडीलधार्‍या माणसांवर खूपच मोठी जबाबदारी असते. याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. तीच गोष्ट शाळेतल्या शिक्षकांच्या बाबतीत असते. शिक्षकांचे जसे वर्तन असते तसेच विद्यार्थ्यांचे होते. ‘यथा राजा तथा प्रजा.’ राजाच जर भ्रष्टाचारी असला तर प्रजाही तशीच निपजणार हे उघडच आहे.

पालकांनी मुलांबरोबर वागताना काही बारीकसारीक गोष्टींचे कटाक्षाने पालन केले तर एकमेकांमधील नाते दृढ होण्यास अधिक मदत होते. पालकांनी ‘मुलांशी मूल होऊन वागावे.’ म्हणजे काय? - तर, लहान मुलाच्या पातळीवर उतरून त्याला समजेल अशा पद्धतीने बोलावे, वागावे. त्याच्यावर प्रेम करावे; पण प्रेम म्हणजे नुसते लाड करणे नव्हे. तर सहज बोलता बोलता गोष्टरूपाने कधीतरी ‘नाही’हा शब्द त्याच्या कानावर पडला पाहिजे हे ध्यानात ठेवावे.

आमची आई नोकरी करायची, नर्स म्हणून, पुण्याला ताराचंद हॉस्पिटलमध्ये. आमचे घर सदाशिव पेठेत होते. घर ते ताराचंद हॉस्पिटल हे अंतर चालायला तसे खूप होते. पण ती रोज चालतच जायची यायची. जाता येता रोज काही ना काही घरचे सामानसुमान घेऊन यायची. आम्ही पेंडसे चाळीत तिसर्‍या मजल्यावरील एका खोलीत राहायचो. दिंडी दरवाजातून आई येताना दिसली की आम्ही पळत पळत खाली जाऊन तिच्या हातातल्या पिशव्या घ्यायचो - ‘काय खाऊ आणला आहे’ हे बघायला नव्हे तर तिचे ओझे थोडे हलके करावे म्हणून. म्हणजे नोकरी करणार्‍या आईवडिलांबद्दल आदर दाखविण्याची ही लहानशी गोष्ट थोरल्या भावंडांचे बघून बघून न शिकवताच कळली होती.

आईवडील हे सदैव आपल्या चांगल्यासाठीच प्रयत्न करीत असतात ही भावना एकदा का मुलांच्या मनात रुजली की त्यांच्या नात्यात दुरावा येण्यापेक्षा अधिक जवळीक निर्माण होण्यास मदत होते हे नक्कीच. असा वागण्यातला बारकावा प्रत्येकाने समजून घेतला तर दोन पिढ्यात कधीच अंतर पडणार नाही.

Hits: 514
X

Right Click

No right click