महर्षी अण्णासाहेब कर्वे

Parent Category: व्यक्तिपरिचय Category: समाजसुधारक Written by सौ. शुभांगी रानडे

Maharshi-Karve

महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या व्यक्तिमत्वाचे जे अनेक पैलू आहेत, ते परस्परपूरक आहेत. अण्णा समाजमनस्क होते म्हणून ते जीवनव्रती झाले. त्यांच्या जीवनातील वैयक्तिक निर्णयालाही व्रतस्थतेची भरभक्कम बैठक होती. अगदी बालपणापासून त्यांनी हे व्रत घेतले होते. सोमण गुरुजींच्याबरोबर भांडारात काम करताना त्यांनी ज्या निष्ठेनं काम केलं, त्यावरून त्यांची व्रतस्थ वृत्ती दिसून येते. जो मार्ग त्यांनी स्वीकारला होता, त्याचाच ध्यास त्यांनी आयुष्यभर घेतला. असे ते ध्यासपंथी होते. या ध्यासपंथावरीळ काटेकुटे त्यांनी तुडवले. रणरणते ऊन सहन केले. अडथळ्यांच्या अनेक शर्यती पार केल्या; आणि शंभराहून अधिकवर्षे ते या ध्यासपंथावर चालत राहिले. विचार करीत राहिळे, अपयश पचवीत राहिले. यश मिळवत राहिले.

प्रा. श्री. ना. बनहट्टी यांनी अण्णांचं वर्णन 'कर्मयोगी' असं केलं आहे. श्री. बनहट्टी म्हणतात.

“कर्वे यांच्या कार्याला काळ जरी अनुकूल होता, तरी दुसरी एक शक्‍ती प्रतिकूल होती. समाजाचे परंपरागत संस्कार, पूर्वग्रह आणि रूढीग्रस्त मन या गोष्टी समाजसुधारकांचा प्रतिरोध करण्यास सज्ज होत्या. या पूर्वग्रहरुपी, दुष्ट खडकांमधून स्रीसुधारणेचे तारू हाकारण्यास असामान्य चिकाटीची,

धीमेपणाची आणि खंबीर ध्येयवादित्वाची आवश्‍यकता होती. ईप्सितकार्याकरिता अण्णासाहेबांनी काय सहन केले नाही? समाजाचे शिव्याशाप, अवहेलना, बहिष्कार हे सर्व सहन करून, न चिडता, न संतापता, समाजावरील आपले प्रेम तिळमात्रही कमी होऊ न देता, तपेच्या तपे अण्णासाहेबांनी आपला निष्काम कर्मयोग आचरिला; त्याचेच फळ म्हणजे आज शहरी मध्यमवर्गातील स्रीसमाज शिक्षणसंपन्न होऊन निर्भय रीतीने आपला मार्ग स्वतःच्या जबाबदारीवर चोखाळण्यास सिद्ध झाला आहे.”

श्री. बनहट्टी यांच्या मते आदर्श कृतिवीराची सर्व लक्षणे अण्णासाहेबांच्या ठिकाणी प्रकर्षाने आढळतात. पुष्कळ बोलणे, लिहिणे हा कदाचित्‌ वाग्वीर व बुद्धिवीर यांच्या ठायी गुण ठरेल. पण कृतिवीर हा प्रसिद्धी पराड्मुख असतो. प्रचाराचे खरे साधन कृती हेच असते. अण्णांनी आयुष्यभर अशी कृती केली आणि कृतीद्वारे आपल्या विचारांचा प्रसार केला.

पंधरा कोटी स्त्रियांच्या शिक्षणाचे कार्य आपल्या हातून घडावे अशी त्यांची महत्त्वाकांक्षा होती. या आपल्या आकांक्षेबाबत ते कसे व्रतधारी होते, हे त्यांच्याच उद्गारांतून आपणाला दिसेल-

“निदान १५ निरक्षर स्रियांना साक्षर करून या महत्कार्याचा एक कोट्यांश तरी मी आपल्या श्रमाने साध्य करीन व हे घडून आल्यावर एक लहानसे व्रत तरी माझ्या हातून तडीला गेले, म्हणून मला धन्यता वाटेल.”

महर्षी कर्वे यांनी अशाप्रकारे केवळ आपले विचार व्यक्त केले नाहीत तर प्रथम त्यांनी आपल्या बहुतेक सर्व विचारांना मूर्त रूप दिले. त्यातूनच त्यांचा तो विचार आणखी नव्या विचारांना जन्म देत असे.

अनाथबालिकाश्रम, निष्काम-कर्म-मठ, महिला विद्यालय, महिला विद्यापीठ अशी त्यांच्या कार्याची एक साखळीच मग तयार झाली. त्यातच कोठेतरी समता संघही होता. या सर्व संस्था म्हणजे जीवनव्रती अण्णासाहेबांच्या ध्येयनिष्ठ चिंतनज्ञीलतेची मूर्तिमंत व कृतिप्रवण प्रतीके आहेत.

भारतरत्न डॉ. धोंडो केशव कर्वे यांच्या जीवनाचा कालपट

१८ एप्रिल १८५८ जन्म ( शेरवली : रत्नागिरी)

१८७३ राधाबाईंशी लग्न.

१८७६ मराठी ६ वीची परीक्षा पास

१८८१ मेंट्रिक्युलेशन परीक्षा

१८८४ बी. ए. परीक्षा

१८८५ शिक्षक, एल्फिन्स्टन हायस्कूल, मुंबई

१८८७ एम. ए. परीक्षा ( अनुत्तीर्ण)

१८८८ ते १८९१ शिक्षक, मराठा व इतर हायस्कुलें

१८९१ पहिल्या पत्नीचा मृत्यु

१५ नोव्हेंबर १८९१ प्राध्यापक, फर्ग्युसन कॉलेज

११ मार्च १८९३ आनंदीबाईशी पुनर्विवाह

३१ डिसेंबर १८९३ विधवाविवाहोत्तेजक मंडळीची स्थापना

२० ऑगस्ट १८९५ विधवा-विवाह-प्रतिबंध-निवारक मंडळी असा बदल

१४ जून १८९६ अनाथबालिकाश्रमाची स्थापना

१ जानेवारी १८९९ पुण्यात आश्रमाची सुरुवात

जून १९०० आश्रमाचे हिंगण्यास स्थलांतर

४ मार्च १९०७ महिला विद्यालय स्थापना

४ नोव्हेंबर १९०८ निष्काम-कर्म-मठ स्थापना

डिसेंबर १९११ महिलाविद्यालयांचे हिंगण्यास स्थलांतर

३ जून १९१६ महिला विद्यापीठाची स्थापना

जून १९१७ अध्यापिका झाळेची स्थापना

एप्रिल १९१८ पुणे कन्याशाळेची स्थापना

१८ एप्रिल १९१८ ६१ वा वाढदिवस

१९२० सर विठ्ठलदास ठाकरसींची देणगी

१८ एप्रिल १९२८ ७१ वा वाढदिवस

१९२९-१९३० त्रिखंड प्रवास

१९३०-१९३२ आफ्रिकेचा प्रवास

१९३२ ठाकरसी ट्रस्टींविरुद्ध दावा

१९३५ ठाकरसी ट्रस्टींशी तडजोड

१९३६ महाराष्ट्र-ग्राम-प्राथमिक-शिक्षण मंडळाची स्थापना

१८ एप्रिल १९३८ - ८१ वा वाढदिवस

१९४२ बनारस हिंदु युनिव्हर्सिटीची डी. लिट. पदवी

१९४४ समता-संघाची स्थापना

१९४६ अनाथबालिकाश्रमाचा सुवर्णमहोत्सव व हिंगणे स्री-शिक्षण संस्था हे नामकरण

१८ एप्रिल १९४८ ९१ वा वाढदिवस

१९४९ श्री. ना. दा. ठा. महिला विद्यापीठ कायदा

२९ नोव्हेंबर १९५० बायाचा मृत्यू

१९५१ पुणे विद्यापीठाची डी. लिट. पदवी

१९५४ महिला विद्यापीठाची डी. लिट. पदवी

१९५५ पद्मविभूषण पदवी

२३ ऑक्टोबर १९५६ हिंगणे स्री-शिक्षण संस्थेचा हीरकमहोत्सव

१९५७ मुंबई विद्यापीठाची एल्‌. एल्‌. डी. पदवी

१८ एप्रिळ १९५८ भारतरत्न पदवी, मुंबई महानगरपालिकेचे मानपत्र व शताब्दीमहोत्सव

९ नोव्हेंबर १९६२ निधन (पुणे)

Hits: 953
X

Right Click

No right click