७३. बेळगाव २००० प्रा. य. दि. फडके

लोकशाहीत विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. भारतीय घटनेने दिलेला आविष्कारस्वातंत्र्याचा अधिकार वापरताना घटनेच्या शिल्प्कारांनी नमूद केलेले निर्बंधलेखकांनी, कलावंतांनी, प्रसारमाध्यमांनी जसे पाळावयास हवेत तसेच ते सरकारने किंवा त्यांच्या समर्थकांनीही पाळावयास हवेत. कोणीही मर्यादा ओलांडल्या की त्याचे कृत्य वाजवी आहे की नाही हे ठरविण्याचा अधिकार न्यायपालिकेस असतो. मोर्चे आणून, विधानमंडळांच्या सभागृहाबाहेर हुल्लड माजवून, पुस्तकांच्या होळ्या पेटवून, त्यांच्यावर बंदी आणून अधिकारस्वातंत्र्य हिरावून घेणार्‍या असहिष्णु लोकांची संख्या वाढते आहे. नेत्यांचे दैवतीकरण करण्याची प्रवृत्ती, जातीविषयीचा व धर्माचा दुराभिमान या दुष्प्रवृत्ती वाढीस लागल्या की कोणाच्या भावना केव्हा दुखावतील याचा नेम नसतो. आविष्कारस्वातंत्र्यावर आघात करणार्‍या सवयीस वेळीच आवर घातला नाही, तर लोकशाहीचे रुपांतर प्रथम झुंडशाहीत आणि नंतर एकपक्षीय हुकूमशाहीत किंवा लष्करशाहीत होते. आपल्या तसेच इतरांच्या आविष्कारस्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी सदैव दक्षता, सहिष्णुता व संयम बाळगण्याची आवश्यकता असते. आविष्कारस्वातंत्र्यावर हल्ले होतील तेव्हा निर्भयपणे आपले मत मांडताना किंमतही मोजावी लागते. ती मोजण्याचे सामर्थ्य आपणा सर्वांना लाभेल अशी आशा व्यक्त करतो.

Hits: 627
X

Right Click

No right click