५०. इचलकरंजी १९७४ - पु. ल. देशपांडे

इचलकरंजी येथे १९७४ साली भरलेल्या ५० वे म्हणजेच सुवर्णमहोत्सवी संमेलनाचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे उर्फ पु. ल. होते. महाराष्ट्राचे लाडके व्तक्तिमत्व, सुप्रसिद्ध विनोदी लेखक, कवी, संगीतकार, नट, गीतकार असे अष्टपैलू साहित्यिक म्हणून ओळखले जाणारे पु. ल. हे या संमेलनाचे अध्यक्ष असल्याने संमेलनाची रंगत चांगलीच वाढली होती. पु.लं. नी आपल्या अध्यक्षीय भाषणात आपले मराठी साहित्याबद्दलचे विचार अतिशय सुंदर रीतीने मांडलेले दिसतात. त्यांच्या मते ललित वाङ्मय हे आपल्याला जीवनावर प्रेम करायला शिकवतं. जगातलं कुठलही ललित वाङ्मय हे कधीच हिंसात्मक नसतं. कलावंताच्या श्रद्धेचे स्थान एकच असतं आणि ते म्हणजे कला हे होय. लेखन करताना आशय व अभिव्यक्तीत एकरूपता असावी. लेखकाची जात बघण्यापेक्षा लेखनाची जात बघावी असं पु. लं. ना मनापासून वाटतं. साहित्य आत्मतेजोबलावरंच उभं राहतं. साहित्यकलेचा आस्वाद ही एक साधना आहे असे मानून ग्रंथ हातात घेणारा वाचक हा एकच मतदारसंघ साहित्यात असतो. साहित्यात जसे असामान्य लेखक असतात तसे असामान्य वाचकही हवेत. ललित साहित्यात समाजातील परिवर्तनाचे पडसाद उमटत असतात. त्यातही जे अस्सल असेल ते टिकेल व बाकीचे कालप्रवाहात वाहून जाईल. काय लिहावे व काय लिहू नये ही जशी लेखकाची जबाबदारी तसेच काय वाचावे व काय वाचू नये ही वाचकाची जबाबदारी असल्याचे पु. लं. ना प्रामाणिकपणे वाटते.

Hits: 1003
X

Right Click

No right click