सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन

Parent Category: ROOT Category: वार्तापत्र Written by सौ. शुभांगी रानडे
New post on महासंवाद

सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन सर्वत्र साजरा करणार – शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड Team DGIPR द्वारा

मुंबई, दि.१ : स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा ३ जानेवारी हा जन्मदिवस राज्यात साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान, त्यांनी आचरणात आणलेली स्त्री उद्धारासाठीची मुल्ये भावी पिढीसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणातील योगदान, त्यांचे कार्य, समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि त्यांनी रुजविलेली शैक्षणिक मुल्ये पुढील पिढीपर्यंत संक्रमित करण्यासाठी क्रांतीज्योति सावित्रीबाई फुलें यांची जयंती 'महिला शिक्षण दिन' म्हणून साजरी करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.

या दिवशी शाळांमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषणे, निबंध, वक्तृत्व स्पर्धा, परिसंवाद व एकांकिकांचे आयोजन करण्यात येईल. त्याचप्रमाणे, सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात, शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येईल.

त्यांच्या नावाने स्त्री शिक्षणात कार्यरत शिक्षिका, अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्या यांना पुरस्कार देण्यात येईल, ऑनलाईन तसेच ऑफलाईन चर्चासत्र आयोजित केले जातील आणि समाजमाध्यमांवर #मी_सावित्री, #महिला_शिक्षण_दिन असे हॅशटॅग वापरून नव्या पिढीला यात सामावून घेतले जाईल, अशी माहिती प्रा. गायकवाड यांनी दिली आहे.

क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले
क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांनी जुन्या रुढी, परंपरा तोडण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. १८४८ मध्ये भारतातील पहिली मुलींची शाळा पुणे येथे स्थापन करुन या शाळेच्या मुख्याध्यापक बनल्या. त्यानंतर त्यांनी १८ शाळा सुरु केल्या. बालकांच्या हत्या थांबाव्यात विधवांची परिस्थिती सुधारावी म्हणून बालक व विधवा आश्रमांची स्थापना केली. विधवा पुनर्विवाहाच्या कायद्यासाठी प्रयत्न केले. महिलांच्या केशवपनाविरोधात नाभिकांचा संप घडवून आणला. शिक्षणाच्या प्रणेत्या, स्रीयांच्या मुक्तीदात्या, क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणातील योगदान व त्यांचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचवणे व त्यांनी रुजविलेली शैक्षणिक मूल्ये पुढील पिढीत संक्रमित करण्यासाठी ३ जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या संदर्भातील शासन निर्णय २४ डिसेंबर २०२० रोजी जारी करण्यात आला आहे.

Hits: 543
X

Right Click

No right click