गुजराती भाषा

Parent Category: भाषांतर Category: इतर भारतीय भाषा Written by सौ. शुभांगी रानडे

Following article is small part of language information article. Pleae refer to https://vishwakosh.marathi.gov.in for font images, complete article and info about literature in this language.

गुजराती ही भारताच्या पश्चिम किनाऱ्याला लागून असलेल्या गुजरात राज्याची भाषा आहे. १९७१ च्या खानेसुमारीप्रमाणे ह्या राज्याची लोकसंख्या २,६६,८७,१८६ असून त्यांपैकी गुजराती भाषिकांची संख्या सु. नव्वद टक्के असावी. गुजराती लोक व्यापार करण्यात प्रसिद्ध असल्याने गुजरातच्या बाहेरही अनेक राज्यांत ही भाषा बोलणारे लोक आहेत. त्यांची संख्या वीस लाखांवर आहे. त्यांपैकी दहा लाखांवर लोक महाराष्ट्रात आहेत. व्यापाराच्या निमित्ताने भारताबाहेरही — विशेषतः आफ्रिकेत — ही भाषा बोलणारे लोक स्थायिक झालेले आहेत. इराणातून येऊन प्रथम गुजरातेत व नंतर इतर राज्यांत राहिलेल्या पारशी लोकांची भाषाही गुजरातीच आहे.

गुजराती भाषेचे प्राचीन नमुने बाराव्या शतकापासून सापडतात. मराठी, बंगाली यांसारख्या ज्या थोड्या इंडो-आर्यन भाषांचे इ.स. १५०० पूर्वीचे नमुने उपलब्ध आहेत, त्यांत गुजरातीची गणना होते. ह्या भाषेचा पहिला प्रसिद्ध कवी ⇨नरसी मेहता  पंधराव्या शतकात होऊन गेला.

गुजराती ही इंडो-आर्यन भाषाकुटुंबातील एक भाषा आहे. गुजरातीला सर्वात जवळची भाषा मारवाडी ही होय. प्राचीन पश्चिमी राजस्थानी ही गुजराती व मारवाडी ह्या दोन्ही भाषांची जननी समजली जाते. सु. सोळाव्या शतकात ह्या दोन भाषा एकमेकींपासून निराळ्या होऊन स्वतंत्रपणे वाढू लागल्या. प्राचीन राजस्थानीच्या पूर्वकाळीचे गुजरातीचे मूळ शोधू गेल्यास, ते शौरसेनी अपभ्रंशाच्या पश्चिमेकडील एखाद्या स्वरूपात असल्याचे मानावे लागेल. सहाव्या शतकात गुर्जर लोक उत्तरेकडून येऊनच गुजरातेत स्थिर झाले, असे मानले जाते. त्यांच्या भाषेचाही (दार्दिक समूहातील?) पश्चिम शौरसेनी अपभ्रंशापासून विकास पावणाऱ्या गुजरातीच्या जडणघडणीवर परिणाम झाला असावा. गुजरातीच्या ह्या पूर्वीच्या स्थितीची निश्चित कल्पना करणे कठीण आहे. गुजरातेत सापडलेला सर्वांत प्राचीन भाषिक पुरावा म्हणजे गिरनार येथील अशोकाचे शिलालेख. परंतु ह्या शिलालेखांत आढळणारी भाषिक वैशिष्ट्ये गुजरातीपेक्षा निराळी असल्यामुळे, गुजरातीची पूर्वपीठिका ह्या शिलालेखांपर्यंत नेता येत नाही.

सामान्यपणे गुजरातीच्या काठियावाडी, उत्तर गुजराती, चरोतरी (मध्य विभाग) व सुरती (दक्षिण विभाग) अशा चार ठळक बोली मानल्या जातात. बडोदे-अहमदाबादच्या सुशिक्षितांची बोली ही प्रमाण गुजराती समजली जाते. गुजरातमधील पारशी व बोहरी लोक बोलतात त्याही दोन बोलभाषा होऊ शकतील. कित्येक शतकांपूर्वी तमिळनाडूमध्ये जाऊन राहिलेल्या विणकरांची ‘सौराष्ट्र’ नावाची बोलीही गुजरातीची एक स्वतंत्र बोली मानावी लागेल. गुजरातेत आदिवासींची संख्या मोठी आहे. त्यांची बोली ‘भिली’ या नावाने ओळखली जाते. ह्या लोकांनी स्वतःची मूळ भाषा टाकून गुजरातीचा स्वीकार केला असल्यामुळे ‘भिली’ हीपण गुजरातीचीच बोली मानावी लागेल. ती बोलणाऱ्याची संख्या सु. पावणेतीन लाख आहे. हे आदिवासी मुख्यत्वेकरून साबरकांठा व बनासकांठा जिल्ह्यांत आहेत तसेच बडोदे व सुरत जिल्ह्यांतही ते आढळतात. भिलीचेदेखील गरासिया, चोधरी, घोडिया इ. पोटभेद आहेत.

गुजराती हा भाषावाचक शब्द ‘गुजरात’ ह्या देशवाचक शब्दापासून आला आहे, हे उघड आहे. महाराष्ट्रात ‘गुजराथ’ व ‘गुजराथी’ असा उच्चार रूढ आहे. तो मराठीतील ‘ठ’ शी असलेल्या उच्चारसादृश्यामुळे असावा, असे नरसिंहराव दिवेटिया यांचे मत आहे.

मराठीप्रमाणेच गुजरातीतील बरेचसे शब्द (सु. साठ टक्के) तत्सम किंवा तद्‍भव आहेत. ह्या भाषेवरही अरबी- फार्सीची आणि अलीकडे इंग्रजीची बरीच छाप पडली आहे.

भाषिक कालगणना पद्धतीचे सूत्र लावले असता, गुजराती व मराठी भाषिक लोक सु. १४२० वर्षांपूर्वी (इ.स. नंतर सु. ५५० वर्षांनी) एकमेकांपासून विभक्त झाले असावेत, असे अनुमान करता येते. मूलभूत १०० शब्दांच्या संग्रहातील ६५ शब्द या दोन भाषांत समान असल्याचे आढळते.

गुजराती (महाजनी) लिपी मराठीहून निराळी असली, तरी फारशी भिन्न नाही. ह्या लिपीचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्यात शिरोरेषा नसते.

गुजराती भाषेचा नमुना :

ધં  ધે  વળગું  તે  પહેલા  મારો  વિચાર  હિંદુસ્તાનનો  નાનકડો  પ્રવાસ  ત્રીજા  વર્ગમાં  કરી,  ત્રીજા  વર્ગના  મુસાફરોનો  પરિચય  કરવાનો  આને  તેમના  દુઃખો  જાણી  લેવાનો  હતો.  ગોખલે  આગળ  મેં  આ  વિચાર  મૂક્યો.  તેમણે  પ્રથમ  તો  તે  હસી  કાઢ્યો,  પણ  જયારે  મેં  મારી  આશાઓનું  વર્ણન  કર્યું,  ત્યારે  તેમણે  ખુશીથી  મારી  યોજનાને  સંમતિ આપી.

देवनागरी लिप्यंतर : धंधे वळगुं ते पहेलां मारो विचार हिंदुस्थाननो नानकडो प्रवास त्रीजा वर्गमां करी, त्रीजा वर्गना मुसाफरोनो परिचय करवानो अने तेमनां दुःखो जाणी लेवानो हतो. गोखले आगळ में आ विचार मूक्यो. तेमणे प्रथम तो ते हसी काढयो. पण ज्यारे में मारीआशाओनुं वर्णन कर्ऱ्युं, त्यारे तेमणे खुशीथी मारी योजनाने संमति आपी.

मराठी भाषांतर : कार्याला लागण्यापूर्वी माझा विचार हिंदुस्थानचा छोटासा प्रवास तिसऱ्या वर्गाने करून, तिसऱ्या वर्गाच्या उतारूंचा परिचय करून घेण्याचा आणि त्यांची दुःखे जाणून घेण्याचा होता. गोखल्यांच्या समोर मी हा विचार मांडला. पहिल्यांदा तर त्यांनी ते थट्टेवारी नेले. पण जेव्हा मी माझ्या आशांचे वर्णन केले, तेव्हा त्यांनी आनंदाने माझ्या योजनेला संमती दिली (गांधीजींच्या आत्मकथेवरून).

संदर्भ : 1. Bloch, Jules Trans. Master, Alfred, Indo-Aryan, Paris, 1965.

           2. Cardona, George, A Gujarati Reference Grammar, Philadelphia, 1965.

           3. Dave, T. N. A Study of Gujarati Language in the 16th Century, London, 1935.

           4. Grierson, G. A. Linguistic Survey of India, Vo., IX, Part I, Delhi, 1968.

           5. Mehta, B. B. Mehta, B. N. The Modern Gujarati-English Dictionary, Baroda, 1925.

           ६. धर्माधिकारी, स. ज. गुजराती भाषा — प्रवेश, मुंबई, १९६९.

           ७. धर्माधिकारी, स. ज. गुजराती  — मराठी शब्दकोश, मुंबई, १९६७.

मेहेंदळे, म. अ.

Hits: 578
X

Right Click

No right click