सहस्त्रचंद्रदर्शन

Parent Category: मराठी पुस्तके Category: सांगावा कवितासंग्रह

सहस्त्रचंद्रदर्शन

वयाच्या ८०व्या वर्षी सहस्त्रचंद्रदर्शन हा कार्यक्रम करतात. माझी आई ८९व्या वर्षी देवाघरी गेली. पण आईचा तो कार्यक्रम करण्याचा योग मला लाभला नाही. तरीपण तिच्या कृपाप्रसादाने मिळालेले शब्दरूपी अनमोल मोती कविता करण्यास उपयोगी पडले ही जाणीव ह्या कवितेतून व्यक्त केली आहे.

सहस्त्रवेळा बघुनी तुजला
धन्य मानी तो चंद्र स्वत:ला
सहस्त्रचंद्र ते दर्शन घडता
ब्रह्मशरीर हे लाभे तुजला . . . १

परि ना जमले करण्या आम्हा
ऋषिसमान तो तव सोहळा
विचारात या गढून जाता
ठाऊक ना कधी लागे डोळा . . . २

पहाट समयी स्वप्नी येऊनी
देशी मजला हातामधुनी
उघडुनि बघता पुरचुंडी ती
शब्दांचे ते मोती दिसती . . . ३

कवितारूपी हार गुंफिले
कितीतरी त्या शब्दमंथने
कृष्णसख्याच्या दह्याप्रमाणे
कमी न होती अमोल रत्ने . . .४

Hits: 392
X

Right Click

No right click