चहा

Parent Category: मराठी पुस्तके Category: सांगावा कवितासंग्रह

चहा

चहा हे सर्वसामान्यांचे पेय आहे. कवितेत चहाच्या फायद्यातोट्यांची जंत्री केली आहे. सर्वदूर पसरलेल्या चहाची किमया कशी आहे त्याचा आढावा घेतला आहे.

झोप होता ती सकाळच्या पारी
चहापाने बहु येतसे तरारी
दूध ताजे त्या आणि ती खुमारी
चहा बहुता आवडे जगी भारी . . . ।।१ ।।

चहा नसता ते कुणा दुखे डोके
शरीरगाडीला चहाचीच चाके
अतिथिस्वागत करण्यास चहा चाले
त्याविणा ना जगी पान कधी हाले . . . ।।२ ।।

थंडीमध्ये चव चहाचीही न्यारी
ऊन वारा सरी कोसळत्या भारी
ऋतू असला जरि कोणताही दारी
गंध उधळित ये चहाचीही स्वारी . . . ।।३ ।।

चहा कोणाचे दैन्य ते निवारी
चहा घेता कुणी म्हणे हरीहरी
चहा अतिपाने रोग ये शरीरी
अति होता मति निघुनी जाय दूरी . . . ।।४ ।।

उंच डोंगरी वा दप्तरी कचेरी
गाडी लावीते चहाची हजेरी
भिस्त बहुतांची असे चहावरी
खरी किमया या चहाचीच सारी . . ।।५ ।।

Hits: 259
X

Right Click

No right click