भीमभयंकर पाऊस

Parent Category: मराठी पुस्तके Category: सांगावा कवितासंग्रह

भीमभयंकर पावसा रे
रूप तुझे विद्रूप असे
अगणित जीवितहानी करिता
लाज तुझ्या जीवास नसे .. . १

जीवन देता सृष्टीचा तुज
ऐसे वदती जन सारे
तोच तूच का लाख जीवांचा
वैरी होसी दुष्टा रे ... २

मला वाटते सुनामीसवे
जन्म तुझा त्या झालासे
सजीव निर्जीव साऱ्या म्हणूनी
झोडपशी तू वाटतसे .. . ३

पावसा तुजला पैसा देती
विनम्रभावे जन सारे
उतून मातून व्रत हे टाकून
खदाखदा वरी हससि रे...४

पुन्हापुन्हा हे कथिते तुजला
माणसापरी वाग जरा
जुनापुराणा रागलोभ अन्‌
मत्सर सोडून देई खरा ... ५

सखा होई तू सकल जनांचा
समजूतदारपणास धरी
सज्जनापरी करूनी मैत्री
सकलांचा सांभाळ करी... ६

Hits: 297
X

Right Click

No right click