आनंदाची वेणू

Parent Category: मराठी पुस्तके Category: सय कवितासंग्रह

गूज मनीचे आई, तुज कथिते तरी
म्हणशील मज तू लेक आपुली खरोखरी
आनंदाची वेणू घुमली घरोघरी
आली रे आली लेक जन्मा आली . . . १

जन्मायेण्याआधी गेल्या देवाघरी
भगिनी माझ्या गणती किती होईना तरी
हाक दिली त्यांनी तुम्हा देवापरी
हाकेला ना ‘ओ’ दिधली कुणीही तरी . . . २

जन्मायेण्याआधी का गे झाले नकोशी
लेकच जन्मा घाली खरी एका आईसी
लेक, भगिनी, पत्नी, सासू तूही अससी
कैसी गे तू भुलसी अपुल्या सार्या नात्यासी . . . ३

कपाळाला कोणाच्या ना पडो ही आठी
अमृताचा पेला माझ्या लाव तू ओठी
प्रेमाने घे जवळी मजला देऊन मिठी‍
पांग तुझे फेडीन मी झाल्यावर मोठ्ठी . . . ४

मुलगा किंवा मुलगी ऎसा भेद ना करी
होतीस ना तू मुलगी बाई माझ्यापरी
वंशदीपक नाही तरी मी पणती खरी
वेल नेईन वंशाचा मी गगनावेरी . . . ५

आईपणा घेऊन आले तुझ्यासाठी
देवराणा राहतो गे तुझिया पोटी
पुण्यकर्मा येती अति फळे गोमटी
गोष्ट लाख मोलाची ही होईना खोटी . . . ६

सांगणे हे इतुके माझे ऎक तरी
येऊ दे गे आई, मजला अपुल्या घरी
ऋणी राहीन तुझी मी जन्मभरी
मगच म्हणतील सारे तुला ‘आदर्श नारी’ . . . ७

Hits: 303
X

Right Click

No right click