सय - प्रस्तावना

Parent Category: मराठी पुस्तके Category: सय कवितासंग्रह

सौ. शुभांगी रानडे - माझी आई - यांचे ‘काव्यदीप’, व ‘सांगावा’, हे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेले आहेतच. आज ‘सय’ हा तिसरा काव्यसंग्रह प्रसिद्ध होत आहे.

सय म्हणजे आठवण. आठवण आई-बाबांची, भावाबहिणीची, मित्रमैत्रिणींची अग्दी घरादाराचीही. माणूस अशा या आठवणींमध्येच रममाण होत असतो.

आई म्हणते त्याप्रमाणे या कविता सुमधुर चालीच्या कुशीतूनच जन्माला आल्या आहेत.त्यामुळे या कवितांची खरी गोडी कळते ती प्रत्यक्ष तिच्या तोंडून ऐकल्यावरच. मात्र या चाली निवडण्याचे व त्यात समर्पक शब्द गुंफण्याचे कसब आईच करू जाणे. या पुसेतकात केवळ कविता असल्या तरी ह्या कविता वेबसाईट व सीडीवर ध्वनीफितींसह प्रसिद्ध केल्या असल्याने त्यांचा रसिकांना आस्वाद घेता येईल,

मी आईला नेहमी म्हणते ‘तुला या कविता सुचतात तरी कशा ?’ तर तिचे आपले साधे आणि एकच उत्तर ‘अशाच’. पण जरा विचार केल्यावर मला जाणवते आहे की ती या कविता स्वतः जगते आहे. सकाळी उठल्यापासून सडा, रांगोळी, फुले, पक्ष्यांचे आवाज, रेडिओवरचे भक्तिसंगीत या व अशा अनेक गोष्टीत ती गुंग झालेली असते. दारातल्या तुळशीचे मनही तिला कळते. पारिजातकाच्या झाडाशी ती गुजगोष्टी करते. आणि मागील दारी येणार्‍य़ा मांजर, कुत्र्य़ांहीही तिचे संभाषण चालू असते.

या संग्रहातल्या ‘तुळशीबाई’, ‘पारिजातकाचा सडा’, ‘आंबामोहोर’, ‘सारमेयास’ या कविता वाचताना मला आमच्या घरची सकाळ आठवते. ‘नवे घर’, ‘मायेचा गाव’, ‘दिवाळीचा किल्ला’, ‘भूपाळी’, ‘गारा आल्या’ या कवितांमधून प्रत्येकाला आपल्या घराची, गारांच्या पावसाची, भूपाळीपासून संध्याकाळच्या परवच्यापर्यंत ऎकू येणार्‍या धुनींची आठवण आल्याशिवाय राहत नाही. या कवितांमधून कवयित्रीचे संवेदनशील मन आपल्याला दिसते व भावतेही.

आमची आई सगळ्या देवांची पूजा मनोभावे करते. तिने केलेले विठ्ठलाचे, शंकराचे, मारुतीचे, दत्ताचे, रामाचे स्तुतीगान तितक्याच भक्तिभावाने केले आहे. केवळ कर्मकांडापेक्षा मनापासून केलेली देवाची पूजा याला ती अधिक महत्व देते.‘जीवन’, ‘मनपाखरू’, ‘काळची पायवाट’ ‘अखेरचे पर्व’ यासारख्या कविता आपल्याला जीवनाचे सार सांगून जातात. अंतर्मुख करुन टाकतात. जगण्याचं सार्थक हे आनंदी व समाधानी राहण्यात आहे हे शिकवतात.

सध्याचे जग माणसांना पैशामागे पळायला भाग पाडते. त्यामुळे माणसे जगण्याचा खरा अर्थच विसरून जातात. अशा आजच्या धावत्या जगात निर्विकार, निरंतर आनंद देणार्‍या वेळेच्या बंधनात न अडकणार्‍या कवितांची गरज आहे.

सय या कवितासंग्रहातल्या कविता आठवणीवर आधारित आहेत. पण आठवण येऊन उदास करणार्‍या नाहीत. हुरहुर लावणार्‍या नाहीत. मुलं मोठी होऊन घराबाहेर गेल्यावर पालकांना वाटणारी ओढ, काळजी यात आहे. घरापासून दूर गेलेल्या आम्हां मुलांना आईवडिलांची आठवण आली की या कविता मनाला शांतता, दिलासा देतात. आईवडील सदैव आपल्याबरोबर आहेत याचा अनुभव देतात.

विषय छोटा असो वा मोठा. आमची आई हाडाची शिक्षिका असल्याने कितीही अवघड विषय असला तरी तो सोपा करून कसा सांगावा हे तिला चोख जमते. म्हणूनच अगदी साध्या शब्दांमधूनही उदाहरणे देऊन मोठे गहन विचार मांडण्याची हातोटी या कवितांमधून दिसते.

सौ. सुमेधा गोगटे
कॅलिफोर्निया, अमेरिका

Hits: 409
X

Right Click

No right click