काव्यदीप - अर्पणपत्रिका

Parent Category: मराठी पुस्तके Category: काव्यदीप पुस्तक परिचय

अर्पण

आई म्हटले म्हणजे माझ्या डोळ्यासमोर नेहमी - पांढरी शुभ्र नऊवारी साडी, केसांचा अंबाडा, एका हातात घड्याळ, बेतशीर उंची, सावळा वर्ण, सतत अनवाणी चालण्याने भेगाळलेले पाय, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे चेहऱ्यावरील जिद्द, तेजस्वी व बाणेदार डोळे असलेली तिची मूर्ती उभी राहते.

शालेय शिक्षण इयत्ता ४थी पर्यंतच झालेले. परिस्थितीने स्वतःला शिक्षण घेता आले नाही तरी आपल्या मुलांना मात्र सुशिक्षित करायचेच ही जिद्द. तिच्या लग्नानंतरची सुरुवातीची काही वर्षे 'उकसाण' या कामशेतजवळच्या खेडेगावी गेली. पुढे मुलांच्या शिक्षणासाठी पुण्याला आली. सदाशिव पेठेतील पेंडसे चाळीतील एका खोलीत स्वत:च्या हिंमतीबर संसार सुरू केला. नर्सिंग कोर्स केला आणि ताराचंद रामनाथ हॉस्पिटलमध्ये नोकरी सुरू केली. अनंत अडचणी येत होत्या. भरीत भर म्हणजे अकाली आलेले वैधव्य. पण ती खचून गेली नाही. डगमगली नाही. स्वत:च्या एकटीच्या खांद्यावर संसाररथाची धुरा समर्थपणे पेलली. संसाररथातील प्रवासी म्हणजे आम्ही पाच मुले. केवळ मुलांनाच शिक्षण देऊन ती थांबली नाही तर नातवंडांच्या शिक्षणाची जबाबदारी सुद्धा तिने सहजी पार पाडली.

हे सारे करताना तिने कधीही कोणासमोर हात पसरला नाही. लाचारी पत्करली नाही. प्रचंड स्वाभिमान व लागतील तेवढे कष्ट करण्याची तयारी. 'कंटाळा' हा शब्द तर तिच्या शब्दकोशातही नव्हता. आणि म्हणूनच ताराचंद हॉस्पिटलमध्ये ३५ वर्षे सलगपणे नोकरी केली. दिवसपाळी, रात्रपाळी असे. पण तिचे वैशिष्ट्य म्हणजे २१ वर्षे रात्रपाळी केली. सदाशिव पेठेतील आमचे घर ते ताराचंद हॉस्पिटल हा पल्ला काही थोडा नव्हता. ती कायम चालतच जात-येत असे. बस तिला ठाऊक नव्हती. रिक्षाचे तर नावच सोडा. पण यामुळे शेवटपर्यंत कोणत्याही प्रकारचा आजार तिच्या जवळ सुद्धा फिरकला नाही. चालत जाता-येता न चुकता कविता तिच्या सोबतीला यायची. संकटकाळी तर ती हमखासपणे कवितेला साद घालायची. तिची कविता मनाला भिडणारी, ऐकणाऱ्याचे काळीज हेलावून सोडणारी होती. कारण ती कविता प्रत्यक्ष धगधगत्या जीवनातून फुलून आली होती. बहुतेक कविता प्रसंगांच्या किंवा व्यक्तीच्या अनुषंगाने सहजगत्या प्रकट व्हायच्या. तिच्या कवितेत आशयघनता किती असायची हे सोबत दिलेल्या देहाची नाव' या तिच्या कवितेवरून आपणास कळून येईल. अशा परमेश्वरस्वरूप आईला 'काव्यदीप ' हा माझा पहिलावहिला काव्यसंग्रह मी प्रेमपूर्वक अर्पण करत आहे.
---सौ. शुभांगी रानडे

Hits: 535
X

Right Click

No right click