द वर्ल्ड इज फ्लॅट

Parent Category: मराठी पुस्तके Category: पुस्तक परिचय

नुकतेच मी पुलित्झर पुरस्कार विजेता थॉमस फ्रीडमॅन यांनी लिहिलेले 'द वर्ल्ड इज फ्लॅट' पुस्तक वाचले.

मला हे पुस्तक आवडले, मुख्यत: कारण त्यात बर्‍याच काळापासून माझ्या अभ्यासाचा विषय असलेल्या आउटसोर्सिंगच्या वादग्रस्त विषयावर चर्चा होती. २००० पासून जगातील आणि भारतीय अर्थव्यवस्थेत आयटी क्षेत्रात जी आर्थिक क्रांती झाली त्यावेळी या संधीचा फायदा घेण्याच्या उद्देशाने अत्यंत उत्साहात ज्ञानदीप इन्फोटेक कंपनीची स्थापना केली होती. मात्र या कंपनीची वाढ न होता विद्यार्थ्यांसाठी स्टेपिंग स्टोन म्हणूनच कंपनीचे कार्य होत राहिले.

जॉर्ज ऑरवेलचा '1984', आल्विन टॉफलरचा 'फ्यूचर शॉक' आणि 'थर्ड वेव्ह', बिल गेटच्या 'वर्ल्ड अ‍ॅट स्पीड ऑफ थॉट' ही नवीन पुस्तके वाचल्याने आयटी क्षेत्रातील नव्या लाटेची मला ओळख झाली होती. 'सिलिकॉन व्हॅली ग्रेट्स'द्वारे क्षत्रिय यांनी आयटी विकासात भारतीय उद्योजकांकडून केलेल्या अग्रगण्य प्रयत्नांची माहिती वाचून मी भारावून गेलो होतो.

'वर्ल्ड इज फ्लॅट' या पुस्तकात आउटसोर्सिंगच्या अचानक झालेल्या लाटांमुळे होणार्‍या बदलांची भारताच्या दृष्टीने उजळ बाजू दाखविली होती आणि याचा अमेरिका, भारत आणि चीनवर होणा-या भविष्यकालीन परिणामांवर भाष्य केले होते.
लेखकाने बंगळुरूमध्ये 'इन्फोसिस'ला भेट दिली, चीनच्या वरिष्ठ सॉफ्टवेअर अधिका-यांच्या मुलाखती घेतल्या. उत्पादन आणि तांत्रिक मनुष्यबळाचा पुरवठा करणा-या व दळणवळणात सुलभतेने प्रगती करणार्‍या देशांनी उत्पादनाच्या आणि सेवांच्या मुक्त प्रवाहास रोखणा-या सर्व अडथळ्यांचा नाश केला असून आता जागतिक अर्थव्यवस्था सपाट होईल असा अंदाज या पुस्तकात व्यक्त करण्यात आला आहे. आउटसोर्सिंगद्वारे सेवा पुरवठा करणा-या देशामध्ये तसेच उत्पादनांच्या आउटसोर्सिंग करणा-या अशा दोन्ही प्रकारच्या देशांत विकास व एकूणच अर्थव्यवस्थेची भरभराट होत असल्याची अनेक उहाहरणे या पुस्तकात दिली आहेत.

पहिल्या वाचनात, मी लेखकांनी केलेल्या विश्लेषण आणि भविष्यवाण्या पाहून खूप प्रभावित झालो आणि मला वाटले की हा सपाट परिणाम देशातील स्थानिक पातळीवर देखील होईल आणि शक्यतो दुर्गम ठिकाणी असलेल्या लहान इन्फोटेक कंपन्यांना चालना मिळेल आणि त्याचा ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीवर फायदेशीर प्रभाव पडेल, शहरीकरण कमी होईल व जग हरित नगरीच्या दिशेने प्रगती करेल असे मला वाटले.

प्रत्यक्षात मला व माझ्या कंपनीला याउलट अनुभव आला. ग्रामीण व निमशहरी भागात उपलब्ध सॉफ्टवेअर व वेब तंत्रज्ञानाच्या छोट्या आयटी उद्योगातील कर्मचारी सॉफ्टवेअर कॉर्पोरेट दिग्गजांकडून पैशाच्या जोरावर हिरावून घेतले जातात आणि स्थानिक छोट्या छोट्या व्यवसायांना प्रशिक्षण वर्गावर जगण्याशिवाय पर्याय रहात नाही ही वस्तुस्थिती आजही आहे.

आमच्या बाबतीत सांगली येथे असणा-या आमच्या छोट्या कंपनीने कोल्हापूर कॉर्पोरेशनची वेबसाईट तयार केली होती महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाल्याने आम्ही उत्साही होऊन कामांचा विस्तार करण्याची आशा बाळगत होतो. अचानक एके दिवशी कळले की कार्पोरेशनने वेबसाईटचे काम एचसीएल कॉर्पोरेटला दिले आहे. इस्लामपूरसारख्या छोट्या नगरपालिकेची नोकरीसुद्धा अशाच एका एजन्सीने आमच्याकडून हिसकावली. इतर क्षेत्रातही अशी अनेक उदाहरणे आहेत की भारतातील भौगोलिकदृष्ट्या अनेक विखुरलेल्या स्वरूपात छोट्या प्रकल्पांचे काम मिळविण्यासाठी मोठ्या कार्पोरेट कंपन्यांद्वारे सरकारी यंत्रणेचा कुशलतेने उपयोग केला जातो. परिणामी स्थानिक छोट्या व्यावसायिकांना डावलले जाते.

अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमध्ये स्थानिक लोकांचा असंतोष, नोकरीची असुरक्षितता आणि वाढती आर्थिक समस्या यांच्या बातम्या भारताला भविष्यातील संकटाची सूचना देत आहेत. परदेशातील बरेच लोक भारतात परत येण्याचा आणि अशा आकर्षक स्थानिक आयटी कॉर्पोरेट्समध्ये सामील होण्याचा विचार करीत आहेत. जर असे लोक परत आले आणि आधुनिक संप्रेषण आणि जागतिक व्यवसाय कल्पनांच्या कौशल्यांचा उपयोग करून त्यांनी मोठ्या शहरात न जाता स्वतःच्या राहत्या घरी उद्योग सुरू केला तरच आपण असे म्हणू शकतो की जग सपाट होत आहे.

सध्याच्या परिस्थितीत कॉर्पोरेट्समधील लाभदायक नोक-यांच्या आकर्षणामुळे भारतात तरी हे शक्य दिसत नाही.---डॉ. सु. वि. रानडे

Hits: 479
X

Right Click

No right click