बुवा बाजीवर हल्ला - ३

Parent Category: मराठी पुस्तके Category: शंकरराव किर्लोस्कर - पुस्तक

'किर्लोस्कर' मासिकाच्या आकर्षणामध्ये महत्त्वाचे स्थान सचित्रतेचे होते. शंकरभाऊ स्वत: चित्रकार असल्यामुळे प्रारंभीच्या कितीतरी मुखपृष्ठांवर त्यांनी ठसठशीत व्यक्तिमत्वाच्या स्त्रियांची सुंदर चित्रे काढली. त्याचबरोबर माणसांचा आळस, अविचार, दुर्लक्ष, जुने विचार यांची थट्टा करणारी व्यंगचित्रे प्रत्येक अंकाच्या सुरुवातीस काढण्याची प्रथा ठेवली. मार्मिक विषय आणि जोमदार रेषा यामुळे ती व्यंगचित्रे प्रभावी होत. अंकातील गोष्टी किंवा कवितेसाठीही ते चित्रे काढीत. ३३-३४ च्या सुमारास या एकपात्री परिश्रमाने उच्चांक गाठलेला दिसतो. नंतर पुढे इंगळहळ्ळीकर, पाटील, घाग अशा होतकरू चित्रकारांची मदत घेण्यात आली. कधी बाबुराव पेंटर यांची सुंदर व्यक्तिचित्रेही मुखपृष्ठावर येऊ लागली.

प्रेसमध्ये आलेल्या नवशिक्या तरुणांतून शं. तु. माळी, गोलिवडेकर, बसवंत, ग. ना. जाधव हे पुढे नाव मिळवू लागले. मुंबईच्या 'टाईम्स' या वृत्तपत्रामधले प्र ग. सिरूर यांची ओळख झाल्यावर त्यांची चित्रे सातत्याने किर्लोस्कर व 'स्त्री'च्या मुखपृष्ठावर येऊ लागली. कधी नदीच्या काठी, कधी डोंगरावर, घर सजवताना, बागेत हिडताना, अशी तरुण युगुले त्यांनी जिवंत शैलीत रंगवली. त्याबद्दल एका चिकित्सक संपादकाने पुढे म्हटले को, ''स्रियांच्या वावरास माजघराची मर्यादा पडलेल्या समाजात, जीवनाच्या आनंदाच्या अनेक संधींची ओळख तरुणपिढीला किलॅस्कर-स्त्रीच्या मुखपृष्ठानी करून दिली.''

चित्रकलेविषयी शंकरभाऊचे विचार पुढील भाषणातून आणखी स्पष्ट होतात

अखिल महाराष्ट्र चित्रकार स्नेहसंमेलन १० वे अधिवेशन
(श्री. शंकरराव किर्लोस्कर यांचे अध्यक्षीय भ्रापण १९५१९)

चित्रकार बंधु भगिनींना,

चित्रकलेचे माहेरधर गणल्या जाणाऱ्या कोल्हापूर शहरात आपल्या अखिल महाराष्ट्र चित्रकार परिषदेचे १० वे अधिवेशन भरत आहे हा योग अपूर्व आहे. कै. आबालाल, रा. ब. धुरंधर, आनंदराव मिस्त्री इत्यादी नामवंत चित्रकार या शहरातून निर्माण झाले व त्यांचीच उज्वल परंपरा चालविणारे वरच्या दर्जाचे चित्रकार आजही येथे आढळून येतात. चित्रकलेचे प्रेम हा कोल्हापूरकरांचा एक जन्मसिद्ध गुणच म्हणता येईल. पण तसे न करता माझ्यासारख्या चार रेघोट्यांची चित्रे काढण्यापलिकडे ज्याची मजल गेली नाही, अशा एका सामान्य माणसाला आपण ते पद दिले, याला आपली मित्र भावना कारण असेल, पण परस्पेक्टिव्हच्या दृष्टीने त्यात एक चूक राहून गेली असे आपल्यालाही कबूल कराबे लागेल. आपण करीत असलेल्या सन्मानाबद्दल अर्थात मी आपला अत्यंत आभारी आहे.

मी स्वत: मोठासा चित्रकार नसलो तरी चित्रकलेबद्दल मला फार प्रेम आहे व त्याच्याही पेक्षा विशेष म्हणजे चित्रकलेला मनुष्याच्या आयुष्यात फार महत्त्वाचे स्थान आहे असे मला फार वाटते. नुसत्या आनंदप्राप्तीचा विचार केला तरी सौंदर्यदर्शनासाठी प्रत्येकजण हपापलेला असतो ही गोष्ट स्वयंसिद्ध आहे. मग ते सौंदर्य एखाद्या
देखाव्यात, वस्तूत, शरीर सौष्ठवात अथवा अशा नमुन्यावरून काढलेल्या चित्रात साठविलेले असो. मनुष्य सौंदर्याचा इतका भोक्ता का असतो याचे कारण देखील उघड आहे. आपले सुख अथवा दुःख आपल्या पंचेंद्रियांच्या द्वारे मिळते. पण कान, नाक, जीभ, त्वचा व डोळा यापैकी सर्वात जागृत व तीक्ष्ण असं कोणतं इंद्रिय असेल तर ते डोळा आणि म्हणूनच डोळा नसलेला आंधळा आयुष्यातील सतत मिळणाऱ्या एका उच्च आनंदाला पारखा झालेला असतो. म्हणून त्याच्याबद्दल आपण जास्तीत जास्त सहानुभूती दाखवितो.

तथापि डोळ्यांच्याद्वारे आपल्यास मिळणाऱ्या आनंदाचा लाभ तात्पुरता अथवा क्षणभंगूर असतो असं म्हणता येईल काय? कोणीस म्हटलं आहे की 'A thing of beauty is a joy forever' सुंदर वस्तुपासून मिळणारा आल्हाद अवीट असतो. एवढंच नव्हे तर ती वस्तू डोळ्यापुढे नसली तरी आपले कल्पनाचक्षू ती आपल्या डोळ्यांपुढे उभी करू शकतात व आनंदाचा प्रत्यय आणून देतात. 'मेघदूतात' कालिदासाने वर्णन केलेला यक्ष त्याच्या प्रियेपासून अनेक योजने दूर राहात होता पण त्या प्रियेचे चित्र मूर्तिमंत त्याच्या अंत:करणात उभे होते व त्याला व्यथित करीत होते. पण याबाबतीत कालिदासाच्या यक्षाचं आपल्याला कशाला उदाहरण हवं? माहेरी गेलेल्या बायकोमुळे त्या यक्षासारखी कोणत्या नवऱ्याची स्थिती होत नाही?

हे झाले गमतीचे उदाहरण! पण यापेक्षा आणखी कितीतरी उदात्त, उत्कट व टिकाऊ संस्कारही आपल्या दृष्टीच्या द्वारेच आपल्या मनावर घडत असतात व अशा संस्कारामुळे आपल्या जीवनाचा साचा हळूहळू घडत जात असतो ही गोष्ट आपल्याला नाकारता येण्यासारखी नाही. पंढरीच्या विठोबाच्या दर्शनामुळे भक्ताचे देहभान उडते, तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापुढे अथवा चित्र ही एक निर्जिव वस्तू असली तरी प्रेक्षकाला चैतन्य अथवा नवी दृष्टी देण्याचे केवढे तरी सामर्थ्य त्या निर्जीव वाटणाऱ्या चित्रात असते हे आपण ओळखले पाहिजे.

सुरुवातीलाच हे थोडेसे रुक्ष वाटण्याजोगे विवेचन करावे लागले तरी ते जरूर होते. कारण चित्रकाराची नवी भूमिका त्याशिवाय समजावून देणे मला कठीण होईल.

चित्रकलेचे महत्त्व इतके थोर असताना अनेक चित्रकारांची अशी तक्रार असते की समाज त्यांच्या गुणांचे चीज करत नाही, त्यांची उपेक्षा केली जाते. पण मला नम्रपणे अशी पृच्छा करावीशी वाटते की, आपल्या चित्रकार मित्रांनी अगोदर समाजात कशा प्रकारच्या कलेची आवश्यकता आहे, आपले चित्राचे विषय अथवा ती चित्रे काढण्याचे तंत्र किंवा या कलेच्या प्रसारासाठी उघडी असलेली नवी क्षेत्रे यांचा कितीसा विचार केला आहे? काहीजण करीत असतील. पण पुष्कळ कलावंताकडे पाहिल्यास 'येरे माझ्या मागल्या' या धर्तीचेच त्यांचे काम चालू असलेले दिसते.

आजच्या झपाट्याने बदलत्या जगात जुन्या कल्पनांची जागा नव्या कल्पना घेत आहेत. जुनी मूल्ये जाऊन नवी मूल्ये येत आहेत. चित्रकारांनी आपापल्या दृष्टीकोनातून फरक केला नाही तर त्याचे कार्य त्याला नीट पार पाडता येणार नाही.

कारण आपला दारिद्र्याने आणि जुन्या कल्पनांनी पछाडलेला, अज्ञानात गुरफटलेला व सर्व बाजूंनी नि:सत्व बनलेल्या देशाला सुंदर, संपन्न, सामर्थ्यशाली व सुसंस्कृत बनविणे हे यापुढील आपलं काम आहे. त्या प्रयत्नात केवढी तरी मोलाची कामगिरी बजावण्याची चित्रकार वर्गापुढे आज संधी उभी आहे.

Hits: 290
X

Right Click

No right click