बुवा बाजीवर हल्ला - १

Parent Category: मराठी पुस्तके Category: शंकरराव किर्लोस्कर - पुस्तक

आपल्या समाजात अंधश्रद्धा व दैववाद अशाप्रकारे सगळीकडे बोकाळल्यावर त्यांचा फायदा घेणारी भोंदूगिरrही सर्वत्र फैलावली. 'किर्लोस्कर' मासिकांनी सामाजिक ढोंगावर टाकलेला आणखी एक बॉम्ब म्हणजे बुवाबाजीवर टाकलेला प्रखर प्रकाश, लोकांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन धर्माच्या नावाखाली 'मूर्खांचा पैसा म्हणजे लुच््यांचा खुराक" या न्यायाने भोंदू-लबाड माणसे कसा फायदा करून घेतात त्याची अनेक उदाहरणे महादेवशास्त्री दिवेकरांनी आपल्या लेखात मांडली. बुवांना आपल्या मुली किंवा बायका अनुग्रहासाठी अर्पण करणारे भक्‍त म्हणजे मूर्खपणाचा अतिरेक झाला. अंगठ्यातून पाणी काढणारे महाराज गावातून पाणी काढून लोकांना का देत नाहीत, पाणी शिंपडून जो अन्न तयार करतो त्याने उपाशी मरणाराला का वाचवू नये? हे प्रकार म्हणजे दृष्टिभ्रमाचेच चमत्कार असतात. मुले होतील का? पैसे मिळतील का? असे विचारत अडाणी माणसे या बुवांच्या मागे लागतात आणि चमत्काराचे थोतांड माजवून, शिष्याची बुद्धी गहाण ठेवून आपल्या नादी लावतात व स्वत: गलेलठ्ठपणे फुकट ऐतखाऊचे जिणे जगतात- समाजाची विचारशक्ती आणि कर्तृत्वशक्ती खच्ची करणारा बुवाबाजी हा गुप्तरोगच आहे. बुवांनी नाडलेल्या लोकांना आपल्या तक्रारी नोंदण्यासाठी 'बुवाशाही विध्वंसक संघ' सुरू करून त्याचे वृत्त किर्लोस्करच्या अंकात प्रसिद्ध होऊ लागले.

त्यावेळी उपासनीबुवा, नारायण महाराज अशा धेंडांवरच शास्त्रीबुवांनी हल्ले केले. या सर्वांस रंगत चढली ती उपासनींच्या भक्ताने 'किर्लोस्कर' मासिक व दिवेकरशास्त्री यांच्यावर खटले भरल्यामुळे. कोर्टापुढील जबानीत बुवांनी अनेक गोष्टी कबूल केल्या. ''हातात बाळकृष्ण घेऊन त्याच्याशी मुलींची लग्ने लावली, मी धर्मशास्त्र वाचले नाही. मी सांगेन ते धर्मशास्त्र, भक्‍त माझी पूजा करतात. माझ्या पायखान्याचीही पूजा करतात. पुरुषांना लुगडे नेसवणे, बांगड्या घालणेही मी करतो. लोक मला मुली अर्पण करतात. अशा पाच मुली माझ्याकडे आहेत. त्यांना मी पिंजऱ्यात ठेवतो'' तर याहूनही जास्त बीभत्स गोष्टी जबानीतून बाहेर आल्या.हजारो रुपयांची जमवलेली मालमत्ता उजेडात आली आणि बुवांच्या पूर्वचारित्र्यात मनुष्यवधाबद्दल त्यांना झालेल्या तुरुंगवासाचा प्रश्न निघताच हे अनंतकोटी ब्रह्मांडनायक काकुळतीला आले!

किर्लोस्कर मासिकावरील या खटल्याच्या बातम्या महाराष्ट्रात व इतर वृत्तपत्रातून फोटोसह प्रसिद्ध झाल्यावर बुवाबाजीची फजिती आणखी दूरवर पसरली.

'बुवाबाजी' हा भोळ्या अंधश्रद्ध, लोकांची फसवणूक करून लुबाडणारा एक धंदाच आहे. लोकांची बौद्धिक गुलामगिरी व परमार्थाबद्दल वेडगळ कल्पना यावर चढविलेल्या या हल्ल्याने 'किर्लास्कर मासिक म्हणजे बुवाबाजीवर हल्ला' असे त्या काळात समीकरण झाले.

Hits: 282
X

Right Click

No right click