नांगर विक्री ते समाजमंदिर - ४

Parent Category: मराठी पुस्तके Category: शंकरराव किर्लोस्कर - पुस्तक

ऑफीसच्या कामातून थोडी सवड मिळाली की शंकरभाऊ कारखान्यातून एखादी चक्कर टाकीत. त्यामुळे काम करणाऱ्यांची आपुलकी वाढत जाई. एकदा बोलतांना विलायतेतील कामगार नुसतच चांगलं काम करीत नाहीत, तर भरपूरही काम करतात. आपणही तीच दृष्टि ठेवायला हवी, तरच परदेशी मालाशी टक्कर देणे आपल्याला सोपे होईल असे शंकरभाऊंनी सांगितले. एवढे ऐकून दादू न्हावी, विठू माने ब त्यांचे दोघे मदतनीस यांनी आठ तासांत दोनशे मोल्ड घालून त्यांत रस ओतून नांगराचे भाग तयार करून दाखविले. हा त्यांचा पराक्रम पाहण्याला लक्ष्मणरावापासून सारे कामगार व घरातली मंडळीही येऊन गेली. लक्ष्मणरावानी त्यांना योग्य ते पारितोषिक दिले. थोड्या दिवसांनी मोगलाईतील एक ग्राहक मुल्ला नजफअल्ली कमरुद्दीन कारखान्यात आले. शंकरभाऊ त्यांना म्हणाले '' आपण आलात त्याबद्दल आम्हाला आनंद आहे. पण आम्हाला ऑर्डर दिल्याशिवाय आपण जावे हे ठीक वाटत नाही.'' ते खोखो हसत म्हणाले '' आप सच कहते है लेकिन आपके पास नांगर है कहा? ''

त्यांचे म्हणणे खरे होते तेवढ्यात कारखाना सुटल्याची घंटा झाली व कामगार नेहमीचे कपडे घालून बाहेर पडू लागले होते. शंकरभाऊ म्हणाले, '' आपण ऑर्डर तर द्या. आम्ही माल दिला नाही तर आमची आपोआप परीक्षा होईल.'' ''ठीक आहे घ्या माझी पन्नास नांगरांची ऑर्डर. '' शंकरभाऊ चटकन घंटेकडे गेले व ती वाजवायला सुरूवात केली. कामगारांना हा काय घोटाळा ते समजेना. ते पुन्हा कारखान्याच्या दारांत जमले तेव्हा शंकरभाऊ म्हणाले, '' आपले आजचे काम संपले आहे. पण हे गिऱ्हाईक मोगलाईतून आले आहे. त्यांना पन्नास नांगर हवेत. पण ते आजच्या आज मिळाले पाहिजेत अशो त्यांची अट आहे. तेंव्हा आपण काय करायचं हे विचारायला घंटा देऊन मी तुम्हाला बोलावले आहे''; कामगारांनी त्यांचे उत्तर कृतीनेच दिले आपले कपडे उतरून कामगार पुन्हा कामाला लागले. खाते प्रमुख खात्यातून हिंडून त्यांना हुरूप देत होते. साच्यांची माती काढणे, भट्टी लिंपणे, कोळसा व लोखंड भट्टोत भरणे, अशी कामे वेगाने होऊ लागली. नांगराच्या फाळाची कास्टिंग्ज बाहेर पडून एमरोकडे निघाली. नांगर जोडून रंग देण्याचे काम सुरू झाले. ते तपासल्यावर मार्क घालून स्टेशनला रवाना करण्यासाठी वॅगनमध्ये भरून रेल्वे रिसिट काढायला के. के. कुलकर्णी तयार होतेच.

मुल्लासाहेबांनो कंदिलाच्या उजेडांत आपली हुंडी लिहून दिली व शेवटी सर्व कामगारांना शाबासकी दिली. दुसऱ्या दिवशी त्या कामगारांना सुट्टो दिल्याचे सांगून शंकरभाऊही घराकडे परतले. ते मनांत म्हणत, ''केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे।'' एका रात्री पन्नास नांगर हा एक धडा आहे.

Hits: 242
X

Right Click

No right click