४. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन - ३

निवडणुकीतील मतदारांचा कौल

१९५७च्या निवडणुकीसाठी संयुक्त महाराष्ट्र समितीने आपल्या सर्व नेत्यांना आणि प्रमुख कार्यकर्त्यांना उभे केले. एस्‌. एम्‌. जोशींना पुण्याला शुक्रवार पेठेतून विधानसभेसाठी उभे करण्यात आले. काँग्रेसचे तेथील उमेदवार पुण्याचे महापौर बाबुराव सणस हे होते. पुण्यातून लोकसभेसाठी काकासाहेब गाडगीळ हे उभे होते. नानासाहेब गोरे गोव्याच्या तुरुंगातून नुकतेच सुदून आले होते. संयुक्त महाराष्ट्र समितीने गोरे वांना लोकसभेसाठी पुण्यातून उभे केले. एस्‌. एम्‌. यांच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष होते, कारण ती निवडणूक जिंकणे फार अवघड होते. शुक्रवार, वेताळ गंज, भवानी या पेठांतील घराघरांतील प्रौढ माणसे, कर्तें पुरुष कॉंग्रेसला, सणसांना पाठिंबा देत होते. तरुणवर्ग मात्र संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूचा होता. हे तरुण एस्‌. एम्‌.ना पाठिंबा देत होते. अखेर या अटीतटीच्या सामन्यात एस्‌. एम्‌. जोशी विजयी झाले. 'समितीचा एक्का, निवडून येणार पक्का' ही त्या निवडणुकीत गाजलेली घोषणा खरी झाली.

ना. ग. गोरे यांनी काकासाहेब गाडगीळ यांचा पराभव केला. एस्‌. एम्‌. यांच्या विजयानंतर संयुक्त महाराष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यानी पुण्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर जल्लोष केला. पश्चिम महाराष्ट्रात समितीने ११६ जागा जिंकल्या. तर कॉँग्रेसला फक्त ३६ जागा मिळाल्या. विदर्भात मात्र काँग्रेसला ५५ आणि समितीला ८ जागा मिळाल्या, अर्थात, या द्वैभाषिकात काँग्रेसलाच बहुमत मिळाले. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि एस्‌. एम्‌. हे विरोधी पक्ष नेते झाले. यशवंतराव चव्हाणांनी फार कुशलतेने राज्य केले. मोरारजी देसाईंच्या काळातील कटुता खूप कमी झाली.

प्रतापगड मोर्चा

यशवंतराव चव्हाणांनी यानंतर आणखी एक डाव टाकला. प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवून पंतप्रधान पं. नेहरूंना या पुतळ्याचे अनावरण करण्यास १९५८च्या नोव्हेंबरमध्ये चव्हाणांनी बोलाविले. या वेळो एस्‌. एम्‌. यांनी या समारंभाविरुद्ध संयुक्त महाराष्ट्र समितीने निदर्शने करावोत, अशी सूचना केली. समितीतही यावर एकमत नव्हते. एस्‌. एम्‌. यांच्या नेतृत्वाची ही आणखी एक कसोटी होती. एस्‌. एम्‌. त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले. अखेर निदर्शने करण्याचा निर्णय झाला. वाईला हजारो निदर्शक २९ नोव्हेंबरला जमले. प्रचंड सभा झाली. आवार्थ अत्रे, भाई डांगे यांची भाषणे झाली. एस्‌. एम्‌. शेवटी बोलले. त्यांनी लोकांना शांततापूर्ण निदर्शने करण्याची विनंती केली. ठरल्याप्रमाणे पं. नेहरू वाई-पांचगणी मागें प्रतापगडाकडे गेले तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूस निदर्शक उभे होते आणि घोषणा देत होते; "मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे" वाईपासून पसरणीच्या घाटापर्यंत पं. नेहरूंच्या कानावर निदर्शकांच्या या घोषणा येत होत्या,

संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार

यानंतर संगुक्त महाराष्ट्र समितीने नोव्हेंबर १९५९ मध्ये अंतिम लढा सुरू करावयाचा असा निर्णय घेतला. ३ ऑगस्टला समितीतर्फे विधानसभेवर मोर्चा आणावयाचा, त्याच वेळी समितीतर्फे सभागृहात सभा तहकुबीचा प्रस्ताव मांडावयाचा आणि तो फेटाळला जाताच संयुक्त महाराष्ट्र समितीच्या आमदारांनी सभात्याग करून मोर्चात सामील व्हावयाचे ही एस्‌. एम्‌. यांची सूचना सर्वानी मान्य केली. याच वेळी संयुक्त महाराष्ट्र समितीत कम्युनिस्टांनी एस्‌. एम्‌.च्या विरुद्ध आघाडी उघडली. परंतु एस्‌. एम. डगमगले नाहीत. ते स्पष्टपणे म्हणाले, सत्ता संपादन हे माझे उद्दिष्ट नाही, मला संयुक्त महाराष्ट्र मिळवावयाचा आहे'.

पं. नेहरूंनाही लोकमताची कल्पना आली आणि अखेर संयुक्त महाराष्ट्राची मागणी मान्य करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. १ मे १९६०ला संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली.

Hits: 303
X

Right Click

No right click