१. विद्यार्थिदशा आणि मनाची घडण - ६

ध्येयवादी निर्णय

१९२८ साली एस्‌. एम्‌. बी.ए.ची परीक्षा दुसर्‍या वर्गात उत्तीर्ण झाले. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीलाच सर्वस्वी वाहून घ्यायचे ठरविले. त्यामुळे दादांना काही मदत करणे त्यांना शक्‍य नव्हते. दादांची मदत न मागता सर्व वेळ सार्वजनिक काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला

दहा वर्षांपूर्वी शिकण्यासाठी नागपूर, मुंबई अशी भ्रमंती करीत जो मुलगा पुण्यात आला तो फ्री स्टुडंटशिपच्या आधारे कष्ट करीत बी.ए. झाला. पण नोकरी, संसार ही चाकोरी या तरुणाने स्वीकारली नाही. मातृभूमीच्या पारतंत्र्यामुळे त्याचे मन नुसत्ते व्यथित झाले नाही, तर या शृंखला तोडण्यासाठी प्राणपणाने लढण्याचा त्याने नात्याने निज निर्धार केला. कुटुंबाचे मायेचे पाशही बाजूला सारले. आर्थिक शाळेत समवयस्क विद्यार्थ्यांमध्ये प्रमुख असणारा एस्‌. एम्‌. आता यूथ लीगचा तडफदार कार्यकर्ता म्हणून तळपू लागला. १९२८च्या फेब्रुवारी महिन्यात एस्‌. एम्‌.ने सायमन कमिशनच्या विरोधात पहिले जहाल भाषण शिवाजी मंदिरात केले. १९२८च्या नोव्हेबर महिन्यात एस्‌. एम्‌., गोरे आणि खाडिलकर या यूथ लीगमधील तरुण कार्यकर्त्यांनी पुण्याला यूथ कॉन्फरन्स बोलाविली. त्यांनी या युवक परिषदेचे अध्यक्ष म्हणून पं. जवाहरलाल नेहरूंना बोलाविले. पं. नेहरूंच्या भाषणाचा एस्‌. एम्‌.च्या मनावर मोठा परिणाम झाला नेहरूंचे व आपले विचार जुळणारे आहेत. हेही त्याला जाणवले. एस. एम्‌ यांनी त्यांच्या आत्मकथनात पं. नेहरूंची पुढील वाक्ये उद्धृत केली आहेत

“Youth is the standard bearer of revolt. It is his privilege. Every society alternates between stabilization and revolution and we are in a for a revolutionary state.”

१९२८ साली काँग्रेसने नेमलेल्या एका समितीने वसाहतीचे स्वराज्य हे ध्येय असावे, असा अहवाल दिला होता. पं. नेहरूंनी याला विरोध करून संपूर्ण स्वातंत्र्य हेच ध्येय असावे, अशी दुरुस्ती सुचविली होती. एस्‌. एम्‌. गोरे आणि खाडिलकर हे यूथ लीगचे तीन तरुण नेते त्याच मताचे होते. संपूर्ण स्वातंत्र्याच्या ध्येयासाठी संघर्ष करण्याचा निर्धार त्यांनी केला होता. एस्‌. एम्‌.ने दहा वर्षे शिक्षणासाठी खडतर वाटचाल केली होती. १९२८च्या अखेरीस त्याच्या जीवनातील खडतर वाटचालीचे दुसरे पर्व सुरू झाले.

पर्वती सत्याग्रह

कॉलेजमध्ये सप्तर्षी मंडळात एस्‌. एम्‌., गोरे आणि खाडिलकर हे राजकीय विषयांप्रमाणे सामाजिक प्रश्‍नांवरही चर्चा करीत. त्या वेळी या तरुण विद्यार्थ्यांनी ज्याप्रमाणे लो. टिळकांचे केसरीतील अग्रलेख वाचले होते, त्याप्रमाणेच आगरकरांचे लेखही त्यांनी वाचले आणि हिंटू धर्मातील जातींची उतरंड अनिष्ट आहे, हे त्यांना मनोमन पटले. त्याचप्रमाणे स्त्रियांवरील अन्याय दूर झाले पाहिजेत. पुनर्विवाहांना समाजाने मान्यत्ता दिली पाहिजे, हा आगरकरांचा विचारही त्यांना पटला. विचारांचे हे बीजारोपण वाचनातून झाले असतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला. एस्‌. एम्‌., गोरे आणि खाडिलकर यांची या सत्याग्रहानंतर चर्चा झाली.. त्यामध्ये हा अन्याय दूर झाला पाहिजे आणि सार्वजनिक पाणवठ्यावर तरी अस्एश्यता पाळली जाऊन नये, यावर या तीन तरुणांचे एकमत झाले पुण्यामध्ये सनातनी मंडळींनी या सत्याग्रहाची जी निंदानालस्ती केली आणि भाला संदर्भात या वृत्तपत्राचे संपादक भोपटकर यांनी जे गलिच्छ आणि विकृत लेखन या संदर्भात केले, त्याचा या तीन तरुणांना तीव्र संताप आला.चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि नाशिकला डॉ. आंबेडकरांनीच काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून केलेला सत्याग्रह यांमुळे यूथ लीगचे हे तिथे तरुण कार्यकर्ते प्रभावित झाले.

१९२९च्या ऑक्टोबर महिन्यात ब्राह्मणेतर चळवळीचे नेते केशवराव जेधे, डॉ. आंबेडकर यांचे पुण्यातील अनुयायी पां. ना. राजभोज आणि यूथ लीग यांनी पुण्याला पर्वती मंदिरात दलित बांधवांसह प्रवेश करण्याचे ठरविले. त्याचवेळी म. गांधींच्या सत्याग्रह आंदोलनाची पूर्वतयारी सुरू होती आणि आचार्य जावडेकर कार्यकर्त्यांची बौद्धिके घेत असत. एस्‌. एम्‌. आणि त्यांच्या यूथ लीगमधील सहकार्यांनी अस्पृश्य मानल्या गेलेल्या बांधवांसह सत्याग्रह करण्याचा त्यांचा विचार आचार्य जावडेकरांना सांगितला. त्या वेळी आचार्यांनी त्याला पाठिंबा दिला.

१३ ऑक्टोबर रोजी पंचवीस-तीस सत्याग्रहींनी पर्वतीच्या पायऱ्या चढण्यास सुरुवात करताच सनातन्यांनी त्यांना अडवले, धक्काबुक्की केली जवळच्या निवडुंगाच्या काटेरी फडात ढकलून दिलें. पोलिस सनातन्यांची ही गुंडगिरी शांतपणे पाहत होते. पर्वती सत्याग्रह पुण्यात खूप गाजला. एस्‌. एम्‌. आणि खाडिलकर खानावळीत जेथे जेवायला जात तेथेही जेवायला येणारी सनातनी ब्राह्मण मंडळी त्यांना उद्देशून अभद्र बोलत असत. पर्वती सत्याग्रहानंतर अकरा दिवसांनी पुण्यामध्ये सनातनी मंडळींनी एक जाहीर सभा घेतली. त्या पर्वती सत्याग्रह सभेत भालाकार भोपटकर यांनी अस्पृश्यांनी खुशाल मुसलमान व्हावे म्हणजे हिंदूधर्म अधिक पवित्र होईल, असे आत्मधातकी उद्गार काढले. भालाकार भाषण करता करता म्हणाले, 'आम्ही घरातदेखील अस्पृश्यता पाळतो. बाईला पाळीच्या वेळी तीन दिवस शिवत नाही.' हे निर्लज्ज उद्गार ऐकून सभेत हशा पिकला.

एस्‌. एम्‌. मुद्दाम सभेस गेले होते. हशा थांबताच ते संतापून उभे राहिले आणि म्हणाले, 'तीन दिवस बाईला दूर ठेवतो हे सांगितलंत पण चौथ्या दिवशी जवळ घेता, हे नाही सांगितलंत?' त्यावर सभेत एकदम कोलाहल झाला आणि लोक एस्‌. एम्‌.ना मारायला धावले. तेव्हा एस्‌. एम्‌.चे एक तालीमबाज मित्र सदूभाऊ गोडबोले यांनी एस्‌. एम्‌-ना उचलून प्रक्षुन्ध जमावातून बाहेर काढले. एस्‌. एम्‌.ना त्या दिवशी भयानक मारहाण झाली असती ती टळली.

या वेळी राजकीय घटनाही फार वेगाने घडत होत्या. १९२७ साली सरकारने निदान देशभरात ट्रेड युनियन चळवळीत काम करणार्‍या डांगे, मिरजकर, जोगळेकर, मुजफ्फर अहमद आदींची धरपकड केली आणि त्यांच्यावर मीरत कटाचा खटला भरला. पं. मोतीलाल नेहरूंनी या तरुण कार्यकर्त्यांचे वकीलपत्र घेतले. मीरत कटाचा खटला खूप गाजला. त्या वेळी बी.ए.च्या वर्गात असणाऱ्या एस्‌.एम्‌ आणि सप्तर्षी मंडळातील त्यांच्या सहकाऱ्यांना या कटातील आरोपींबद्दल आदर आणि आकर्षण वाटले होते.

क्रांतिकारकांबद्दल आकर्षण

एस्‌. एम्‌.ची यूथ लीगमधील कामाची सुरुवात सायमन कमिशन विरोधी निदर्शनाने झाली. ही निदर्शने देशभर झाली. लाहोरलां सायमनच्या विरोधात निघालेल्या मिरवणुकीचे नेतृत्व थोर आणि ज्येष्ठ देशभक्त लाला लजपतराय हे करीत होते. त्या वेळी साँडर्स या पोलिस अधिकाऱ्याने लालाजींच्या छातीवर दंडुक्याचा प्रहार केला. लालाजी खाली पडले. नंतर ते सभेत थोडा वेळ बोलले. परंतु त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यावे लागले आणि तेथेच काही दिवसांनी त्यांचे निधन साले. सर्व देशभर या घटनेने संतापाची लाट उसळली. यृथ लीगचे तरुण कार्यकर्तेही प्रक्षु्ब्ध झाले. पुढे काही दिवसांनी भगतसिंग, राजगुरु सुखदेव, चंद्रशेखर आझाद या प्रतिकारक तरणानी सांडला गोळया घालून ठार मारले आणि लालाजींवरील हल्ल्याचा बदला घेतला. एस्‌. एम्‌. यांनी त्यांच्या आत्मकथेत लिहिले आहे, पुण्यास ही बातमी येताच आमच्या अंगावर रोमांच उभे राहिले

काही दिवसांनी सरकारने ट्रेड डिस्पूट बिल आणि पब्लिक सेफ्टी बिल सेंट्रल असेंब्लीत मांडण्याचे ठरविले. नागरी स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या या बिलांना सर्व देशभक्तांचा विरोध होता. पब्लिक सेफ्टी बिल ज्या दिवशी असेंब्लित मांडले जाणार होते त्या दिवशीच भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी असेंब्लीत बाँब टाकला. त्याचा धूर सगळीकडे पसरत असताना भगतसिंग आणि दत्त या दोघांनी 'इन्किलाब झिंदाबाद' या आणि सरकारच्या निषेधाच्याही घोषणा दिल्या आणि हे दोघेही निर्भयपणे उभे राहिले. त्या दोन क्रांतिकारी तरुणांना अटक झाली. भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली सशस्त्र क्रांतीची तयारी करणाऱ्या अनेक क्रांतिकारी तरुणांनाही पकडण्यात आले आणि त्यांच्याविरुद्ध लाहोर कटाचा खटला सुरू झाला. या खटल्यातील आरोपींचा अमानुष छळ करण्यात आला. त्यांना भीषण मारहाण करण्यात आली. याविरुद्ध या क्रांतिकारी राजबंद्यांनी उपोषण सुरू केले. जतीन्द्रनाथ दास यांनी सर्वांत अधिक काल उपोषण केले. ६४व्या दिवशी १३ सप्टेंबर १९२९ला जतीन्द्रनाथ दास यांचे निधन झाले. ते हुतात्मा झाले. पुण्यात एस्‌. एम्‌., गोरे आणि खाडिलकर या यूथ लोगच्या कार्यकर्त्यांनी 'सर्व युवकांनी उपोषण करावे' असे आवाहन केले. त्यांनी मिरवणूक काढली आणि जतीन्द्रनाथ दास यांना वंदन करण्याकरिता सभाही घेतली. आता या तीन तरुण कार्यकर्त्यांची नावे पोलिसांच्या ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आली. कारण सरकार या यूथ लीगच्या तरुण नेत्यांना 'धोकादायक' (डेंजरस) मानत होते. अर्थात्‌ देशभक्तीने पेटलेल्या या तरुणांना त्याची फिकीर वाटत नव्हती.

१९२९च्या लाहोर काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष पं. जवाहरलाल नेहरूहे होते. पं. नेहरूंनी अध्यक्षीय भाषणात, संपूर्ण स्वातंत्र्य हे भारताचे ध्येय आहे, असे स्पष्टपणे सांगितले आणि अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणारा ठराव एकमताने मंजूर झाला. पं. नेहरूंच्या आदेशानुसार २६ जानेवारी १९३० हा स्वातंत्र्य दिन म्हणून देशभर कार्यकर्त्यांनी साजरा केला. पुण्यामध्ये एस्‌. एम्‌., गोरे आणि खाडिलकर या तरुणांच्या पुढाकाराने २६ जानेवारीस झेंडावंदन, मिरवणूक, सभा आदी कार्यक्रम करण्यात आले.

मे १९३०ला जाहीर सभेत एस्‌. एम्‌. जोशी आणि वामन परांजपे या तरुण कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्याची मागणी करणारी ज्वलज्जहाल भाषणे केली. त्यांना त्या रात्री पकडण्यात आले. दुसऱ्या दिवशी त्यांच्यावरील खटला चालला. सत्याग्रही असल्यामुळे वकील देणे वा खटला लढविणे, हा प्रश्‍नच नव्हता. यानंतर म. गांधींनी स्वातंत्र्य लढ्यासाठी देशाला हाक दिली आणि नंतर यांनी मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी साबरमती आश्रमापासून दांडीपर्यंत पदयात्रा काढली.

Hits: 308
X

Right Click

No right click