९. शिक्षणातील प्रयोग - १२

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील

९. शिक्षणातील प्रयोग - १२

३७) रयत शिक्षण संस्थेची सन १९३५ साली रा. ब. रावजी रामचंद्र काळे यांनी पहिली घटना तयार केली. ती डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणेच्या घटनेवर बेतली होती. प्राचार्य व्ही. एस. आपटे यांनी डेक्कन एज्युकेशन संस्थेची घटना १८८० त मंजूर करताना प्रवर्तकापुढे सांगितले को, “आमची महत्त्वाकांक्षा आहे की वेळेनुसार या प्रांताच्या बहुतांश भागात स्वतंत्र खाजगी संस्थेच्या (म्हणजे डी. ई. सोसायटीच्या) माध्यमातून शाळांचे जाळे विणण्यात येईल; आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी आपले स्वत:चे महाविद्यालय पाहिजे की जेथून आपल्या. देखरेखीखाली व आपल्या प्रणालीप्रमाणे चांगल्या कामासाठी स्वार्थत्याग करणारे पदवीधर मिळतील.” (डी. ई. सोसायटीच्या प्रा. पी. एम. लिमयेकृत इतिहास,) १९२३५, पृष्ठ ७२). डी. ई. सोसायटीची प्रणाली होती ती स्वाभिमान व राष्ट्रभक्ती तरुणांत रुजविण्याची. तसेच पारतंत्र्यात पडलेल्या आपल्या राष्ट्राची भौतिक, नैतिक व धार्मिक उन्नती करण्यास व पुढारलेल्या राष्ट्राच्या पंक्तीत त्यास आणण्यास शिक्षण हेच मानवी संस्कृतीतील प्रमुख साधन आहे, असे प्रा. आपट्यांनी वरील भाषणात म्हटले आहे. (उक्त ग्रंथ पृ. ७१)

३८) प्राचार्य आपट्यांनी सांगितलेल्या या उद्दिष्टापासून डी. ई. सोसायटी पुढे ढळली. त्यास प्रा. लिमयांनी वरील ग्रंथात काही कारणे दिली ती अशी :
(अ) लहान लहान केंद्राच्या ठिकाणी माध्यमिक शाळा सुरू करणे हे स्थानिक लोकांच्या इच्छेवर व आर्थिक मदतीवर अवलंबून असल्याने
सोसायटीच्या कामावर बंधने पडत.

(ब) स्थानिक कार्यकर्त्यांच्या जिव्हाळ्यावर व स्थानिक पाठिंबा मिळविणार्‍यांनाच हे क्षेत्र योग्य होते.

(क) फर्ग्युसन महाविद्यालय ही नियोजित माध्यमिक शाळांसाठी सेवाभावी शिक्षक तयार करणारी संस्था न राहता उच्च दर्जाचे सर्वांगीण शिक्षण देणारी संस्था झाल्याने संस्थापकांच्या मूळ उद्दिष्टापासून ढळली. त्यापेक्षाही माझ्या मते भाऊरावासारखा ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचणारा नेता डी. ई.
सोसायटीकडे नव्हता.

३९) कर्मवीर भाऊराव पाटलांनी मात्र डी. ई. सोसायटीने केलेली चूक सुधारून, प्राथमिक शिक्षणापासून तिच्या राहिलेल्या कामास हात घातला; प्राथमिक शाळा व ट्रेनिंग कॉलेज, माध्यमिक शाळा, छत्रपती शिवाजी महाविद्यालठय व आझाद शिक्षण महाविद्यालय काढून ग्रामीण भागातील शाळांसाठी शिक्षक तयार केले. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांतूनच शिक्षक तयार केले असल्याने त्यांच्या ठिकाणी स्थानिक शाळांविषयी प्रेम व आस्था असे. स्थानिक शेतकरी व धनिक त्यांच्या मदतीस येत. त्यामुळे ग्रामीण भागांत भराभर माध्यमिक शाळा निघू शकल्या, व डी. ई. सोसायटीचे राहिलेले कार्य कर्मवीर भाऊरावांनी पुरे केले. हे डॉ. जी. एस. महाजनी यांनी २३-९-१९७३ रोजी सातारला संस्थेच्या कार्यकर्त्यांपुढे आग्रहाने मांडले. या शाळांत मुलांची संख्या पुरेशी राहावी म्हणून सोबत वसतिगृहे आवश्यक ठेवली. या वसतिगृहातूनच या मुलांवर स्वाभिमानाचे, स्वावलंबन व अममाहात्म्याचे संस्कार केले जात.

४०) डी. ई. सोसायटीच्या संस्थापकांच्या उद्देशामध्ये एक भाग महत्त्वाचा होता, तो हा की, एका मध्यवर्ती संस्थेच्या छत्राखाली ही माध्यमिक विद्यालये व महाविद्यालये चालावीत. तो भागही भाऊरावांनी यशस्वी करून दाखविला. डी. ई. सोसायटीचे अनुकरण अनेक संस्थांनी केले. पण र. शि. संस्थेने अनुकरण केलेल्या बाबी पुढीलप्रमाणे होत.

(अ) प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षकांच्या माध्यमातून ग्रामीण समाजास नेतृत्व पुरविले.
(ब) शिक्षकांच्या बाबतीत स्वार्थ त्याग व स्वावलंबनाचा आदर्श ठेवल्याने कमी पगारावर डी. ई. सोसायटीच्या आजीव सेवकाप्रमाणे रयत शिक्षण संस्थेचे आजीव सेवक काम करीत.

४१) दोन पावले पुढे जाऊन भाऊरावांनी या अनुकरणात नवीन भर टाकून ग्रामीण भागात शैक्षणिक संस्था चालविण्यासाठी एक नवीन आदर्श निर्माण केला. भाऊरावांनी सामान्य जनतेच्या शिक्षणासाठी शिक्षणाचे सार्वत्रिकरण व लोकशाहीकरण हे ध्येय ठेवले. श्रमातून शिक्षण घेता येते ही नावीन्यपूर्ण कल्पना राबविली, आणि डी. ई. सोसायटीचे शिक्षणाच्या स्वस्ताईकरणाचे तत्त्व मोफत शिक्षणाच्या पातळीवर आणून ठेवले.

सारांश, स्वावलंबन व स्वार्थत्याग यांचे व्यवहारीकरण करून भाऊरावांनी शिक्षणप्रसाराच्या बाबतीत ग्रामीण भागासाठी एक वस्तुपाठ तयार करून ठेवला, पण त्याची बैठक मात्र महात्मा फुल्यांच्या मानवतावादी कारुण्याची राखली. सामाजिक सुधारणांच्या बाबतीत भाऊरावांचा दृष्टिकोन बंडखोरीचा व परिवर्तनवादी असला तरी शैक्षणिक सुधारणांच्या बाबतीत तो समन्वयवादी होता.

Hits: 257
X

Right Click

No right click