६. स्वदेशी उद्योजकांच्या सहवासात - ३

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील

६. स्वदेशी उद्योजकांच्या सहवासात - ३

७) भाऊरावांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य असे की, नवीन कार्याची आव्हाने स्वत:च उभी करावयाची व ती स्वतःच यशस्वी करून दाखवावयाची. पहिल्या आव्हानाचे यश दुसर्‍या आव्हानाचे बीज ठरे. सन॒ १९१९ पासूनच भाऊरावांच्या विचारात व कृतीत कमालीची एकवाक्यता दिसून येते. श्री. एच. जी. स्टेड नावाचे शिक्षणतज्ज्ञ म्हणतात, “शिक्षणशास्त्र्यापुढे दोन प्रकारची आव्हाने असतात. पहिले आव्हान असते ते समाजासंबंधीचे. तात्कालीन समाजाची चिकित्सा करून, जरूर तर्‌ तिच्यावर गुणदोषात्मक टीका करावी लागते. त्याच वेळी दुसरे आव्हान असे असते की, समाजाच्या उगवत्या पिढीच्या सुयोग्य वाढीस जराही धक्का न लावता, योग्य वेळी योग्य त्या रचनात्मक शैक्षणिक सोयीसवलती त्यांच्यासाठी निर्माण कराव्या लागतात.” (समाजाचे शिक्षण : आजचे व उद्याचे, लंडन विद्यापीठ प्रेस, १९४४, पृष्ठ ६). भाऊरावांच्या कार्याचे स्वरुप याच प्रकारचे होते. सत्यशोधक चळवळीद्वारे समाजाची गुणदोषात्मक चिकित्सा त्यांनी केली व रयतशिक्षण संस्थेच्या माध्यमातून उगवत्या ग्रामीण तरुण पिढीसाठी रचनात्मक शैक्षणिक सोयीसवलती उपलब्ध केल्या.

८) भारतीय नेत्यांपुढे व सामाजिक कार्यकर्त्यांपुढे सगळ्यांत मोठे आव्हान पूर्वी होते व आजही आहे ते राष्ट्रीय व सामाजिक एकात्मता साधण्याचे. इंग्रजांच्या "फोडा व झोडा' या नीतीमुळे हे एकात्मतेचे काम अतिशय कठीण झाले होते व आजही आहे. भाऊरावांना हे दुर्घट काम जात, पंथ, गोत व धर्मविरहित वसतिगृह युक्‍त शिक्षणाच्या माध्यमातून साध्य करता येईल अशी खात्री होती. नियोजित वसतिगृहातून तयार होणाऱया नवीन पिढीचे मानसिक उन्नयन व उदात्तीकरण झाल्यास अस्पृश्यतेच्या भावनेस आळा बसेल. समतेची भावना रुजेल याची त्यांना जाण होती. हा त्यांचा द्रष्टेपणा अपूर्व होता. कारण भाऊरावांच्या पहिल्या वसतिगृहानंतर बेचाळीस वर्षांनी सन १९६१ साली भावनगरला भरलेल्या अखिल भारतीय कॉंग्रेस समितीने राष्ट्रीय व भावनिक एकात्मतेसाठी एक शपथ तयार केली. जातीजमातीतील भांडणे व वाद मिटविण्यासाठी लोकांनी शांततामय मार्गाचाच अवलंब करावा अशी ती शपथ होती. भारत सरकारनेही भावनिक एकात्मतेसाठी उपाय सुचविण्यासाठी एक समिती याच साली नेमली. दीर्घ विचाराअंती या समितीने विविधांगी शिक्षण हाच भावनिक एकात्मतेस उपाय आहे असे सुचविले; आणि शाळा व महाविद्यालये यांत भावनिक एकात्मता समित्या स्थापण्यास सांगितले.

९) सन १९०२ पासूनच कोल्हापुरत भाऊरावांवर प्रागतिक विचारांच्या लाटा आदळून त्यांची मानसिक घडण आमूलाग्र बदलून टाकीत होत्या. पहिली लाट आली शाहू महाराजांच्या विचारांची, मागासलेल्या समाजाच्या प्रगतीसंबधीची. कोल्हापुरातच भास्करराव जाधव, जउण्णासाहेब लठ्ठे आदींच्या सानिध्यात महात्मा फुल्यांच्या विचारांची दुसरी लाट आली. तिसरी लाट आली ती महर्षी विठ्ठल रामजी शिंद्यांच्या डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या कार्याची आणि शेवटी १९२१ साली लाट आली ती महात्मा गांधींच्या व १९३९ साली संत गाडगेबाबांच्या विचारांची.

Hits: 293
X

Right Click

No right click