श्रीमद् भगवद् गीतारहस्य या ग्रंथाविषयी - अ. र. कुलकर्णी

Parent Category: मराठी पुस्तके Category: गीतारहस्य


ह्या ग्रंथाची पूर्वपीठिका थोडक्यात अशी : १९०८ साली टिळकांना राजद्रोहाच्या आरोपावरून कारावासाची शिक्षा होऊन ती भोगण्यासाठी त्यांना ब्रह्मदेशातील (म्यानमार) मंडाले येथील तुरूंगात ठेवण्यात आले होते. त्यावेळी हा ग्रंथ लिहिण्यासाठी आवश्यक ती पुस्तकादी साधने पुण्याहून मंडाले येथे नेण्याची परवानगी तत्कालीन ब्रिटिश सरकारतर्फ मिळाल्याने ह्या ग्रंथाचा पहिला खर्डा टिळकांनी (१९१०-११ च्या हिवाळ्यात ) तुरूंगात लिहून काढला. पुढे वेळोवेळी सुचत गेल्याप्रमाणे त्यात सुधारणा केल्या. त्यांतील काही सुधारणा तुरूंगातून मुक्‍त झाल्यानंतरही केल्या.

ह्या ग्रंथाचा पहिला खर्डा शिसपेन्सिलीने केलेला होता. वयाच्या सोळाव्या वर्षी गीतेचा पहिल्यांदा संपर्क आल्यापासून टिळकांनी अनेक वर्षे केलेल्या गीता चिंतनाचे आणि त्याच्याशी संबंधित अशा अनेक ग्रंथांच्या त्यांनी केलेल्या अभ्यासाचे फळ म्हणजे गीतारहस्य हा ग्रंथ होय.

गीतेवर जी भाष्ये झाली त्यांत आद्य शंकराचार्यांचे गीता भाष्य हे सर्वात प्राचीन होय. ह्या भाष्यात शंकराचार्यांनी गीतेचा अर्थ निवृत्तिपर लावलेला आहे; तथापि शंकराचार्यांपूर्वीही गीतेवर भाष्ये व टीका झाल्या होत्या व गीतेवरील शांकरभाष्यातच ह्या टीकाकारांच्या मतांचा निर्देश आलेला आहे. ह्या टीकाकारांनी गीतेचा अर्थ प्रवृत्तिपर लावलेला होता. ज्ञानी माणसाने आमरणान्त स्वधर्मोक्त कर्म केले पाहिजे, अशी ह्या टीकाकारांची भूमिका होती. हा अर्थ शंकराचार्यांना मान्य नसल्यामुळे तो खोडून काढून आपला निवृत्तिपर असा गीतार्थ प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी आपले भाष्य लिहिले, असा च्या भाष्याच्या उपोद्घातात स्पष्ट निर्देश आहे. वैदिक काळात प्रवृत्तिवाद प्रभावी होता; तथापि गौतम बुद्धाच्या उदयापासून आणि पुढे बौद्ध धर्माचा ऱ्हास झाल्यानंतरही शंकराचार्यांच्या निवृत्तिपर गीता भाष्याच्या प्रभावामुळे निवृत्तिवाद, येथे बहुमान्य ठरला. ब्रह्म हीच सत्य वस्तू असून ऐहिक जग व जीवन हे मिथ्या, मायामय आहे. त्यामुळे चित्त शुद्ध होऊन ब्रह्म व आत्मा ह्यांच्या ऐक्याचे ज्ञान प्राप्त करून घेण्याची पात्रता अंगी येण्यासाठी स्मृतिग्रंथप्रणीत गृहस्थाश्रमाची कर्मे केली, तरी अखेरीस ती सर्व सोडून देऊन संन्यास घेतला पाहिजे, अन्यथा मोक्षप्राप्ती नाही, असा निवृत्तिमार्गी विचार आहे. टिळकांनी ह्या निवृत्तिवादाचे खंडन करून प्रवृत्तिमार्गाचा पुरस्कार केला.

निवृत्तिपर मोक्षमार्गाचे गीतेत मुळीच विवेचन नाही, असे टिळकांचे म्हणणे नाही, परंतु गीतेमधला हा मुख्य मुद्दा नाही. युद्ध करणे हा क्षत्रियाचा धर्म असला, तरी युद्धात कुलक्षयादी भयंकर पापे घडत असल्यामुळे हे युद्ध माझ्या आत्मकल्याणाचा नाश करील; अशा परिस्थितीत युद्ध करू का नको, अशा कर्तव्यमोहात पडलेल्या अर्जुनाला मोहमुक्त करण्यासाठी गीता सांगितली गेली. कर्मे ही कधीच सुटत नाहीत आणि ती सोडूही नयेत. ज्ञानमूलक व भक्‍तिप्रधान असा कर्मयोग आचरिल्यास, म्हणजे त्यानुसार कर्मे केल्यास कोणतेच पाप लागत नाही. आणि मोक्षही मिळतो. ह्या कर्मयोगाचेच गीतेत प्रतिपादन आहे, असा टिळकांचा अभिप्राय आहे.

टिळकांच्या गौतारहस्या ची एकूण पंधरा प्रकरणे असून गीतेचे बहिरंग परीक्षण ह्या नावाने एक परिशिष्ट-प्रकरणही ह्या ग्रंथात अंतर्भूत केलेले आहे. गीतारहस्यातील पंधरा प्रकरणे अशी : (१) विषयप्रवेश, (२)कर्मजिज्ञासा, (3) कर्मयोगशास्त्र, (४) आधिभौतिकसुखवाद, (५) सुखदु:खविवेक, (६) आधिदैवतपक्ष व क्षेत्रक्षेत्रजविचार, (७) कापित्र-सांख्यशास्त्र किंवा क्षराक्षरविचार, (८) विश्वाची उभारणी व संहारणी, (९) अध्यात्म, (१०) कर्मविपाक व आत्मस्वातंत्र्य, (!१) संन्यास व कर्मयोग, (१२) सिद्धावस्था व व्यवहार, (१3) भक्तिमार्ग, (१४) गीताध्यायसंगती, (१५) उपसंहार.
गीता व महाभारत ह्यांचे कर्तृत्व, गीता व उपनिषदे ह्यांचा काळ, गीता व ब्रह्मसूत्रे ह्यांची पूर्वापारता, भागवत धर्मांचा उदय व गीता, आपल्यासमोर आज असलेल्या गीतेचा काळ, गीता व बौद्ध ग्रंथ, गीता व खिस्ती बायबल असे विषय गीतेच्या बहिरंग परीक्षणात आलेले आहेत.

ज्या अनेक वादांच्या व प्रमेयांच्या आधारे गीतेत कर्मयोगाचे प्रतिपादन केतेले आहे व ज्यांचा निर्देश कधी कधी फारच संक्षिप्तरीत्या केलेला असतो, त्या सिदान्तांची आधी माहिती असल्याखेरीज गीतेतील विवेचनाचे पूर्ण मर्म लक्षात येत नाही. म्हणून गीतेत जे जे विषय किंवा सिद्धान्त आले. आहेत, त्यांचे प्रकरणश: विभाग पाडून त्यांतील प्रमुख युक्तिवादांसह गीतारहस्यात त्यांचे थोडक्यात निरूपण करण्याचा हेतू उपर्युक्त प्रकरणे पाडण्यामागे असल्याचे टिळकांनी ह्या ग्रंथाच्या प्रस्तावनेतच स्पष्ट केलेले आहे. शिवाय गीतेच्या प्रमुख सिद्धान्तांची इतर धर्मातील व तत्त्वज्ञानातील सिद्धान्तांशी आवश्यक तेथे थोडक्यात तुलना करून दाखविली आहे. अखेरीस गीतेचे श्लोकश: भाषांतर दिले आहे. तसेच त्याबरोबर टीकेच्या रूपाने अनेक टीपा दिल्या आहेत.

हा ग्रंथ बराच मोठा असला, तरी टिळकांचे मुख्य विवेचन ' संन्यास व कर्मयोग' आणि ' सिद्धावस्था व व्यवहार ' ह्या एकामागोमाग एक अशा आलेल्या प्रकरणांत सविस्तरपणे आलेले आहे. कर्मयोग श्रेष्ठ का, ह्याबद्दल प्रत्यक्ष गीतेत सांगितलेली कारणे ह्या प्रकरणांत नमूद केलेली आहेत. ज्ञानप्राप्तीनंतर ज्ञान्याला स्वत:चे असे काही कर्तव्य राहिले नाही आणि त्याचा पूर्ण वासनाक्षय झाला, तरीही त्याला कर्म सुटत नाही; म्हणून नि:स्वार्थ बुद्धीने फलआशा सोडून कर्म करणे आवश्यक आहे, हे टिळकांनी दाखवून दिल्रे आहे.
शंकराचार्यांनी ज्ञाननिष्ठा वा संन्यासनिष्ठा ही अंतिम निष्ठा मानली आणि चित्तशद्धीचे बाह्य साधन म्हणूनच कर्मयोग स्वीकारला. चित्त शुद्ध झाल्यानंतर कर्ममार्गाचा त्याग केला पाहिजे; संन्यास स्वीकारला पाहिजे; संन्यासावस्थेतच ब्रह्मज्ञान प्राप्त होते व ते सतत टिकविता येते, असे शंकराचार्यांचे प्रतिपादन आहे.
ह्याखेरीज दुसरीही एक मतप्रणाली भारतीय परंपरेत आहे. ती अशी : चित्तशुद्धी झाल्यानंतर फलाशा न धरता, निष्काम बुद्धीने कर्मयोग आचरणे शक्‍य होईल. त्यामुळे चित्तशुद्धी झालेल्याने संन्यासच घ्यायला हवा, असे नाही. संन्यास वा कर्मयोग ह्यांपैकी कोणताही पर्याय स्वीकारावा आणि अखेरपर्यंत टिकवावा.
टिळकांनी ह्या दोन मतप्रणालींपेक्षा वेगळा विचार मांडलेला आहे. साधकावस्थेपासून सिद्धावस्था प्राप्त झाल्यानंतरही-म्हणजे आमरण-कर्ममार्गाचे अनुकरण करणे प्रशस्त, असा गीतेचा अभिप्राय असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

माणूस सिद्धावस्थेला पोहोचला; त्याला स्वत:साठी काहीही प्राप्त करून घेणे राहिलेले नसले, तरी समाजधारणेसाठी त्याने कर्मे केली पाहिजेत. माणूस जेव्हा सिद्धावस्थेला पोहोचतो, तेव्हा त्याचे मन शुद्ध, निर्मळ झालेले असते; वासनांवर, विकारांवर त्याने विजय मिळविलेला असतो. समाजधारणेसाठी करावयाच्या कर्तव्यांची त्याला नेमकी जाण असते. त्यामुळे लोकांसाठी तो आचरणाचा उत्तम आदर्श निर्माण करू शकतो. त्याची जबाबदारी मोठी असते आणि जगाचा व्यवहार चालविण्यासाठी कर्मे आवश्यकच आहेत. निव्वळ चित्तशुद्धी एवढाच कर्माचा उपयोग नाही, असा गीतार्थ टिळकांनी सांगितला आहे.

ब्रिटिशांची भारतावर सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर आपल्या पराभूतपणाचा विचार ब्रिटिश राजवटीतील भारतीय नवशिक्षितांपैकी काही थोड्या व्यक्तींनी केला आणि पराभवाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी त्यांना नवसंस्कृतीच्या निर्मितीची आणि नव्या भारताचा वैचारिक पाया घालण्याची आवश्यकता जाणवू लागली.
भारताच्या मौलिक परिवर्तनाच्या दिशेने वैचारिक अंगाने त्यांनी प्रयत्न केले. लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य हा अशाच प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग होय. टिळक हे स्वत: हिंदू धर्मग्रंथांचे प्रामाण्य मानणारे होते. हे प्रामाण्य गीतेच्या संदर्भातही पूर्णपणे मान्य करून त्याचे एक उत्कृष्ट नवे भाष्य गीतारहस्याच्या रूपाने टिळकांनी निर्माण केले, अशा आशयाचे विचार तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ह्यांनी मांडले आहेत.

कुलकर्णी, अ. र.

मराठी विश्वकोशावरून साभार

Hits: 609
X

Right Click

No right click