संत जनाबाई
Parent Category: मराठी संस्कृती
दळिता कांडिता । तुज गाईन अनंता ॥१॥
न विसंबे क्षणभरी । तुझे नाम ग मुरारी ॥२॥
नित्य हाचि कारभार । मुखी हरि निरंतर ॥३॥
मायबाप बंधुबहिणी । तू बा सखा चक्रपाणी ॥४॥
लक्ष लागले चरणासी । म्हणे नामयाची दासी ॥५॥
संतभार पंढरीत ।
कीर्तनाचा गजर होत ॥१॥
तेथ असे देव उभा ।
जैसी समचरणांची शोभा ॥२॥
रंग भरे कीर्तनात ।
प्रेमे हरिदास नाचत ॥३॥
सखा विरळा ज्ञानेश्वर ।
नामयाचा जा जिव्हार ॥४॥
ऐशा संता शरण जावे ।
जनी म्हणे त्याला ध्यावे ॥५॥