Designed & developed byDnyandeep Infotech

दादाभाई नवरोजी

Parent Category: मराठी उद्योग


नवरोजी, दादाभाई: (४ सप्टेंबर १८२५–३० जून १९१७). भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, थोर नेते व अर्थशास्त्रज्ञ.जन्म मुंबईत एका पारशी कुटुंबात. वडील नवरोजी पालनजी दोर्दी आणि आई माणेकबाई. दादाभाई चार वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले प्रतिकूल परिस्थितीतही माणेकबाईंनी दादाभाईंचे संगोपन केले आणि शिक्षण पार पाडले. वयाच्या अकराव्या वर्षी दादाभाईंचे शोराबजी श्रॉफ यांच्या सात वर्षांच्या गुलाबीनामक कन्येबरोबर लग्न झाले. दादाभाईंना एक मुलगा आणि दोन मुली अशी तीन अपत्ये झाली.

एल्‌फिन्स्टन इन्स्टिट्यूशन आणि एल्‌फिन्स्टन महाविद्यालय यांमधून शिक्षण घेऊन १८४५ मध्ये ते पदवीधर झाले. १८५० साली एल्‌फिन्स्टन महाविद्यालयात दादाभाईंची गणित व तत्त्वज्ञान या विषयांचे साहाय्यक प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. या महाविद्यालयात प्राध्यापकपदावर नेमलेले दादाभाई हे पहिले भारतीय होत.

दादाभाई १८५५–५६ च्या सुमारास कामा यांच्या लंडनमधील व्यवसायातील एक भागीदार म्हणून लंडनला गेले तेथे त्यांचा ‘मँचेस्टर कॉटन सप्लाय असोसिएशन’, ‘कौन्सिल ऑफ लिव्हरपूल’, ‘अथेनियम’, ‘नॅशनल इंडियन असोसिएशन’ इ. संस्थांशी जवळचा संबंध आला. १८६५–६६ पर्यंत त्यांनी लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये गुजरातीचे प्राध्यापक म्हणून काम केले. १८६५–७६ या काळात व्यवसायानिमित्त दादाभाईंच्या इंग्लंडला अनेकदा वाऱ्या झाल्या. १८६५ साली लंडनमध्ये डब्ल्यू. सी. बॅनर्जी यांच्यासमवेत दादाभाईंनी ‘लंडन इंडिया सोसायटी’ ही संस्था स्थापली. १९०७ पर्यंत ते तिचे अध्यक्ष होते. १८६२ मध्ये दादाभाई ‘कामा अँड कंपनी’ तून बाहेर पडले आणि त्यांनी ‘दादाभाई नवरोजी अँड कंपनी’ अशी स्वतःचीच कंपनी उभारली. १८६६ मध्ये त्यांनी लंडनमध्ये ‘ईस्ट इंडिया असोसिएशन’ या संस्थेची स्थापना केली ते तिचे सचिवही होते. १८७३ मध्ये भारतीय अर्थकारणाविषयी नेमलेल्या संसदीय समितीपुढे (फॉसेट कमिटी) दादाभाईंनी साक्ष दिली. ही समितीदेखील त्यांच्या परिश्रमांचेच फलित होते. या समितीपुढे दिलेल्या साक्षीत दादाभाईंनी भारतातील करभारप्रमाण सर्वाधिक असून भारतीयांचे सरासरी वार्षिक उत्पन्न केवळ २० रुपयेच असल्याची पुराव्यांनिशी सिद्ध करून दाखविले.

दादाभाईंची १८७४ मध्ये बडोदे संस्थानचे दिवाण म्हणून नियुक्ती झाली तथापि एका वर्षातच महाराज आणि रेसिडेंट यांच्याशी उद्‌भवलेल्या मतभेदांमुळे त्यांनी दिवाणपदाचा राजीनामा दिला. जुलै १८७५ मध्ये ते मुंबई नगरपालिकेचे सभासद म्हणून व नगरपालिकेच्या शहरपरिषदेवरही निवडून आले. १८७६ मध्ये या दोन्ही पदांचा राजीनामा देऊन ते लंडनला गेले. १८८३ मध्ये ते ‘जस्टिस ऑफ द पीस’ झाले आणि दुसऱ्यांदा मुंबई नगरपालिकेवर निवडून आले. ऑगस्ट १८८५ मध्ये गव्हर्नर लॉर्ड रे यांच्या निमंत्रणावरून दादाभाईंनी मुंबई विधानपरिषदेचे सदस्यत्व पतकरले. त्या वर्षाच्या अखेरीस, दादाभाईंनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संस्थापनेत महत्त्वाचा वाटा उचलला. काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना तीन वेळा (१८८६, १८९३, १९०६) लाभला. १९०२ साली दादाभाई लंडनच्या हाउस ऑफ कॉमन्समध्ये लिबरल पक्षातर्फे सदस्य म्हणून सेंट्रल फिन्झबरीमधून निवडून आले. ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळविणारे आणि भारताच्या स्वातंत्र्यास्तव संसदेमध्ये आवाज उठविणारे दादाभाई हे पहिले भारतीय होत.

दादाभाईंची १८९७ मध्ये ‘रॉयल कमिशन ऑन इंडियन एक्स्पेंडिचर’ ह्या सेल्बी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या आयोगावर एक सदस्य म्हणून नियुक्ती झाली. या आयोगापुढे त्यांनी साक्षही दिली. १८९८ मध्ये ‘इंडियन करन्सी कमिशन’ ला त्यांनी आपली दोन निवेदने सादर केली. ॲम्स्टरडॅम येथे १९०५ साली भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महासभेसाठी (इंटरनॅशनल सोशलिस्ट काँग्रेस) दादाभाईंनी भारताचे प्रतिनिधित्व केले. १९०६ च्या कलकत्ता काँग्रेसमध्ये भारताच्या समस्यांवर ‘स्वराज्य’ हा एकमेव उपाय असल्याचे त्यांनी घोषित केले.

इंग्लंडमधील कॉमर्स, इंडिया, कंटेंपररी रिव्ह्यू, द डेली न्यूज, द मँचेस्टर गार्डियन, पिअर्सन्स मॅगझीन ह्यांसार

X

Right Click

No right click