Designed & developed byDnyandeep Infotech

आत्माराम रावजी भट

Parent Category: मराठी उद्योग

आत्माराम रावजी भट : (१२ मे १९०५- १८ जानेवारी १९८३). महाराष्ट्रातील कृतिशील विचारवंत. जन्म रत्नागिरीच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. शिक्षण रत्नागिरी व मुंबई येथे. महाविद्यालयात असताना युवक चळवळीत त्यांनी हिरिरीने भाग घेतला. सत्याग्रहात सामील झाल्याने त्यांना तुरूंगवासही पतकरावा लागला. १९२९ मधे मुंबई विद्यापीठाची एम्‌.कॉम्‌. पदवी संपादन केल्यावर ते पुणे येथे दुसरी मराठा संस्थेत व्यवस्थापक म्हणून काम पाहू लागले.

१९५२ मध्ये मुंबई विधान परिषदेवर निवडून येईपर्यंत त्यांनी ही जबाबदारी सांभाळली. बारा वर्षे ते विधानसभेचे सदस्य होते. १९५२ मध्ये भारत सरकारने स्थापन केलेल्या पहिल्या 'वृत्तपत्र आयोगा'चे ते सदस्य होते.१९५४ मध्ये ब्राझील देशात भरलेल्या पहिल्या जागतिक वृत्तपत्र परिषदेसाठी भारतीय प्रतिनिधी मंडळात त्यांचा समावेश झाला होता. भारत सरकारच्या 'कापड उद्योग समिती'चेही ते सदस्य होते.

भट यांनी १९३४ मध्ये पुणे येथे 'मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज'ची स्थापना केली. महाराष्ट्रातील कारखानदारी फुलावी, नवे उद्योजक निर्माण व्हावेत व त्यांना सर्व त-हेचे प्रोत्साहान मिळावे, अशी चेंबर स्थापण्यामागील त्यांची भूमिका होती. स्वातंत्र्योत्तर काळात पुण्याभोवती कारखानदारीची जी झपाट्याने वाढ झाली, तीत चेंबरचा मोलाचा वाटा आहे. प्रारंभापासून चेंबरचे कार्यवाह म्हणून भट काम पहात.

पुणे येथील 'बँक ऑफ महाराष्ट्र' स्थापन करण्यामागे त्यांची प्रेरणा होती. 'बृहन्महाराष्ट्र शुगर सिंडिकेट' व कोयना प्रकल्प प्रत्यक्षात आणण्याच्या कामी चेंबरने महत्त्वाचा वाटा उचलला आहे. १९६३ साली भट यांनी भारतातील लघुउद्योगांची सोळाशे पृष्ठांची सूची तयार केली. भारतात लघुउद्योग संवर्धनाचे धोरण आखण्याच्या बाबतीत त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. १९४४ पासून चेंबरचे मुखपत्र म्हणून संपदा मासिक प्रकाशित होऊ लागले. त्याचे ते प्रारंभापासून संपादक होते. त्यांचे पुणे येथे निधन झाले.
लेखक - सुभाष भेण्डे स्त्रोत - मराठी विश्वकोश

X

Right Click

No right click