वि.स. खांडेकर
Parent Category: मराठी साहित्य
मोठी माणसे व छोटी मुले यांना जोडणारा एक पूल म्हणजे खेळकरपणा होय. |
कशात तरी रमून गेल्याशिवाय माणूस सुखी होऊ शकत नाही. |
मानवी जीवनाचे कीर्ती, पराक्रम, प्रतिभा, संपत्ती इत्यादी वस्त्रालंकार आहेत पण त्याचा आत्मा म्हणजे प्रेम, वात्सल्य, भूतदया इत्यादी भावना होय. |
कल्पकता ही शुक्राच्या चांदणीसारखी असते. |
मरणात खरोखर जग जगते । आधि मरण, अमरपण मग येते । |
आशेची मंदिरे म्हणजे वाळूतले किल्ले होत. |
पुस्तकातल्या सार्या खुणा पुस्तकातच राहतात. पण ज्यातल्या खुणा आपण कधीही विसरत नाही, असा एकच ग्रंथ आहे, आणि तो म्हणजे जीवन ! |
चाळीशीच्या अलिकडे मनुष्य शूर वीर असतो, पण ती उलटताच तो मुत्सद्दी बनतो. |
आयुष्य ही एक अकल्पित प्रसंगांची मालिकाच आहे. |
सत्य हे कित्येकदा कल्पित कथेपेक्षाही चमत्कृतिजनक असते. |
दुसर्याचे दु:ख कळायला आधी त्याच्याबरोबर जळायला हवं. |
जग ही एक मयसभा आहे. |
जगाचा अनुभव हा एक आरसा आहे. |
श्रद्धेची मुळे हृदयात असतात, जिभेच्या टोकावर नसतात. |
चेहर्याप्रमाणे माणसाच्या अक्षरावरही काळचा परिणाम होत असतो. |
कीर्ती ही पाण्यात खडा टाकल्याबरोबर उत्पन्न होणार्या बुडबुड्याप्रमाणे असते. |
कीर्तीचे फूल आज ना उद्या सुकत असेल, पण ते फुलत असताना मिळालेला उन्मादक आणि संजीवक सुगंध मात्र चिरंतन असतो. |
वस्त्रांनी मनुष्याच्या शरीराचे, फुलांनी केसांचे तर सुभाषितांनी मनाचे सौंदर्य वाढते. |
सुभाषितांची आवड ही मनाला लागलेली पूर्णत्वाची तहान होय. |
आदर व आवड ही भावंडे असली तरी त्यांच्या स्वभावात मात्र महदंतर आहे. |
चांदणे जगाला सुंदर करते पण अंधार त्याला एकजीव करतो. |
आयुष्य हे एक पारिजातकाचे झाड आहे. त्यावर चिमुकली, क्षणात कोमेजून जाणारी पण विलक्षण सुगंधी अशी अगणित फुले नेहमी फुलत असतात. |
कल्पना हे काव्याचे शरीर आहे तर कर्तृत्व हा त्याचा आत्मा आहे. |
ऎन पंचविशीत मनुष्याला आयुष्य हा फुलांच्या पायघड्यांवरचा प्रवास वाटतो. |
दिवस मनुष्याला यंत्र बनवतो तर रात्र त्याला काव्यमय करून सोडते. |
काव्य व शास्त्र यांचा मधुर संगम म्हणजेच मनुष्याचे जीवन होय. |
अहंकार हा जीवनाचा आवश्यक भाग, पण तो पावसासारखा असतो. |
अहंकाराचा अभाव हा माणसाला दगड बनवितो, तर अहंकाराचा अतिरेक हा माणसला हिंस्र पशू बनवितो. |
जसा मित्र निवडावा तसाच लेखकही निवडावा. |
आदर्शाची गती वरवर असते तर शिष्टाचाराची गती खाली असते. |
काल हाच सर्वोत्तम उपदेशक आहे, त्याच्या सल्ल्याने चाला. |
सल्लामसलतीचा विश्वास हा माणसामाणसातील सर्वात श्रेष्ठ विश्वास आहे. |
धर्म अनेक असतात, पण नीतिमत्ता एकच असते. |
देवमाणूस होण्यापेक्षा माणूस म्हणून जगण्यातच सार्थक आहे. |
जीवनाच्या वेलीला कागदी फुले चिकटविण्यापेक्षा ती आपोआप कशी फुलेले ते बघावे. |
शेरभर कल्पनेपेक्षा गुंजभर अनुभव अधिक महत्वाचा. |
धर्माचे आचरण करायला मनाचे फार मोठे सामर्थ्य लागते, ते बुद्ध, ज्ञानेश्वर, रामदासांच्या अंगी होते. |
भावनाशील मनुष्य जीवनप्रवाहात पोहत जातो,तो प्रवाहपतित कधीच होणार नाही. |
मनुष्य म्हातारा झाल्यावर त्याच्या चेहर्यावर लहान मुलाप्रमाणे वेड्यावाकड्या रेघोट्या ओढण्याची काळपुरुषाला जरी लहर येत असली तरी चेहर्याचे वैशिष्ट्य काही त्याला नाहीसे करता येत नाही. |
जगाच्या बाजारात उपदेशच अधिक स्वस्त असतो. |
जी माणसं सुदैवानं डोंगरावर चढतात ती दरीत उतरतच नाहीत. |
सत्य हे कल्पनेहूनही विचित्र असते. |
जाळावाचून नाही कड । मायेवाचून नाही रड । |
संपत्तीने अमृतत्व प्राप्त होत नाही. |
ज्याने वेळ घालविला त्याच्याजवळ घालवायला दुसरे काही उरत नाही. |
मनुष्यातला देव प्रकट होतो तो परांच्या गाद्यांवर लोळून नव्हे तर काट्याकुट्यातून धावत जाऊन |
माणसाला जे पाहण्याचे धाडस होत नाही तेच त्याच्यापुढे आणून उभे करण्यात दैवाला मौज वाटते. |
मवियोगावाचून प्रीती फुलत नाही. |