प्रकरण ४ - शुद्ध पाणी
या साऱ्या गोष्टींचा विचार करूनच शुद्ध पाण्यांची व्याख्या करणे आवश्यक आहे. पिण्याच्या उपयोगासाठी 'शुद्ध पाणी' म्हणून जेव्हा आपण पाण्याचा विचार करतो तेव्हा रासायनिकदृष्ट्या शुद्ध असणारे आसुत जल हे देखील नापसंत करावे लागते. पिण्याच्या पाण्यात हैड्रोजन व ऑक्सीजन यांच्या व्यतिरिक्त इतर अनेक रसायनांची आवश्यकता असते. मात्र ही रसायने एका विवक्षित मात्रेपर्यंतच 'संकेंद्रणित' व्हावी लागतात. त्या मात्रेचे उल्लंघन झाले की, त्याचा परिणाम आरोग्यावर होण्याची शक्यता असते. पाण्यात कोणकोणती द्रव्ये असणे आवश्यक आहे आणि ती नसली किंवा कमी अधिक प्रमाणांत असली तर त्यांचे परिणाम काय' होऊ शकतात याचा उल्लेख पुढील प्रकरणात केला आहे.
शुद्ध पाण्याची सर्वमान्य व्याख्या करावयाची झाल्यास :--
“रंगहीन, गंधहीन, रूचिहीन, रोगाणूंचा व अन्य विषाक्त द्रव्यांचा अभाव असलेले; जीवनावश्यक घटकांच्या बाबतीत हितावह मात्रेने परिपूर्ण असणारे पारदर्शक पाणी” अशी' करता येंईल.
या व्याख्येत ज्या ज्या घटकांचा समावेश आहे ते सर्व घटक संध्येच्या वेळी करण्यात येणाऱ्या जलदेवतांच्या प्रार्थनेत अंतर्भूत आहेत. प्राचीन ऋषींना त्यांचे ज्ञान होते का नव्हते हे निश्चितपणे सांगता येणे कठीण आहे. परंतु पाणी हे गरिबातल्या गरिबाचे आरोग्यवर्धक पेय आहे ही' अगदी' आधुनिक कल्पनासुद्धा त्यात समाविष्ट केलेली आहे.
“आपोहिष्ठेति. . . . . . . . . .आपोजनयथाचन:। ” या प्रार्थनेत, “आम्हाला कल्याणकारक रस द्या. रोगांच्या नाशासाठी आम्ही तुमचा स्वीकार करतो. आम्हास प्रजोत्पादनास समर्थ करा. आम्हाला संपूर्ण आरोग्य द्या. जलात असलेल्या औषधीचा आम्हाला उपयोग होऊ द्या.” जल देवतेजवळ केलेल्या या मागण्या पाण्याची केवढी तरी महती सांगून जातात.
पाण्यात सामान्यत: सापडणारी द्रव्ये व त्यांचे संभाव्य परिणाम आ. ४-२ मध्ये दाखविले आहेत. त्यांची तपशीलवार चर्चा पुढील प्रकरणात करण्यात येईल. ढोबळ मानाने असे म्हणता येईल की, पाण्यातील रोगाणूंच्यामुळे विषमज्वर, जठरांत्रदाह, पटकी, आमांश, कावीळ यांच्यासारखे रोग प्रादुर्भूत होतात. शेवाळांच्या काही जाती अप्रिय वास व चव निर्माण करतात. क्षार जास्त मात्रेत राहिल्यामुळे अप्रिय चवी, दुष्फेनता, संक्षारकता यासारख्या उपद्रवांचा उद्भव होतो.