गीताई अध्याय दहावा
श्री भगवान् म्हणाले
फिर्राने सांगतो ऐक वाक्य उत्तम मी तुज ।
राखसी श्रवणी गोडी तुझे मी हित इच्छितो ॥ १ ॥
न देव जाणती माझा प्रभाव न महर्षि हि ।
सर्वथा मी चि देवांचे महर्षीचे हि मूळ की ॥२॥
ओळखे जो अ-जन्मा मी स्वयं-भू विश्व-चालक ।
निर्मोह तो मनुष्यांत सुटला पातकांतुनी ॥ 3 ॥
बुद्धि निर्मोहता ज्ञान सत्यता शम निग्रह ।
जन्म नाश सुखे दुःखे लाभालाभ भयाभय ॥ ४ ॥
तप दातृत्व संतोष अहिंसा समता क्षमा ।
माझ्या चि पासुनी भूती भाव हे वेगवेगळे ॥५ ॥
महर्षि सात पूर्वीचे चोघे मनु तसे चि ते ।
माझे संकल्पिले भाव ज्यांची लोकांत ही प्रजा ॥६ ॥
हा योग-युक्त विचार माझा जो नीट ओळखे |
त्यास निष्कंप तो योग लाभे ह्यांत न संशय ॥ ७ ॥
सर्वाचे मूळ माझ्यात प्रेरणा मजपासुनी ।
हे ओळखूनि भक्तीने जाणते भजती मज ॥ ८ ॥
चित्ते प्राणे जसे मी चि एकमेकांस बोधिती |
भरूनि कीर्तने माझ्या ते आनंदात खेळती ॥ ९ ॥
असे जे रंगले नित्य भजती प्रीती-पूर्वक ।
त्यांस मी भेटवी माते देउनी बुद्धि-योग तो ॥ १० ॥
करूनि करुणा त्यांची हृदयी राहुनी स्वये।
तेजस्वी ज्ञान-दीपाने अज्ञान-तम घालवी ॥ ११ ॥
अर्जुन म्हणाला
पवित्र तू पर-ब्रह्म थोर ते मोक्ष-धाम तू ।
आत्मा नित्य अ-जन्मा तू विभु देवादि दिव्य तू ॥ १२ ॥
क्रषि एक-मुखे गाती तसे असित देवल ।
व्यास नारद देवर्षि तू हि आपण सांगसी ॥ १३ ॥
मानितो सत्य हे सारे स्वये जे सांगसी मज ।
देव दानव कोणी हि तुझे रूप न जाणती ॥ १४ ॥
जाणसी ते तुझे तू चि प्रत्यक्ष पुरुषोत्तमा ।
देव-देवा जगन्नाथा भूतेशा भूत-भावना ॥ १५ ॥
विभूति आपुल्या दिव्य मज निःशेष सांग तू ।
ज्यांनी हे विश्व तू सारे राहिलास भरूनिया ॥ १६ ॥
योगेश्वरा कसे जाणू चिंतनी चिंतनी तुज ।
कोण्या कोण्या स्वरूपात करावे ध्यान मी तुझे ॥ १७ ॥
त्या विभूती तसा योग आपुला तो सविस्तर ।
पुन्हा सांग नव्हे तूप्ति सेविता वचनामृत ॥ १८ ॥
श्री भगवान् म्हणाले
बरे मी सांगतो दिव्य मुख्य मुख्य चि त्या तुज ।
माझा विभूति-विस्तार न संपे चि कुठे कधी ॥ १९ ॥
राहतो आत्मरूपाने सर्वाच्या हृदयात मी ।
भूत-मात्रास मी मूळ मध्य मी मी चि शेवट ॥ २० ॥
आदित्यांत महा-विष्णु ज्यातिष्मंतांत सूर्य मी ।
मरीचि मुख्य वायूंत मी नक्षत्रांत चंद्रमा ॥ २१ ॥
मी साम-वेद वेदांत असे देवांत इंद्र मी ।
चेतना मी चि भूतांत मन ते इंद्रियांत मी ॥ २२ ॥
कुबेर यक्ष-रक्षांत मी रुद्रांत सदाशिव ।
वसूंत मी असे अग्नि असे उंचांत मेरू मी ॥ २३ ॥
पुरोहितांत तू जाण मुख्य तो मी बृहस्पति ।
सेनानींत तसा स्कंद जल-राशींत सागर ॥ २४ ॥
मी एकाक्षर वाणीत महर्षीत असे भूगु ।
जप मी सर्वे यज्ञांत मी स्थिरांत हिमालय ॥ २५ ॥
सर्व वृक्षांत अश्वत्थ मी देवर्षीत नारद ।
मी चित्ररथ गंधर्वी सिद्धि कपिल मी मुनि ॥ २६ ॥
अर्श्वी उचैःश्रवा जो मी निघालो अमृतांतुनि ।
ऐरावत गर्जेद्रांत मी नरांत नराधिप ॥ २७ ॥
मी काम-धेनु गाईत आयुर्धी वग़् मी असे ।
उत्पत्ति-हेतु मी काम मी सर्पोत्तम वासुकि ॥ २८ ॥
नागांत शेष मी थोर जळी वरुण-देवता ।
पितरीं अर्यमा तो मी ओढणारांत मी यम ॥ २९ ॥
असे दैत्यांत प्रल्हाद मोजणारांत काळ मी ।
श्वापदांत असे सिंह पक्षांत खग-राज मी ॥ ३० ॥
वेगवंतांत मी वायु शस्त्र-वीरांत राम मी |
मत्स्यांत मी असे नक्र नदी गंगा नद्यांत मी ॥ ३१ ॥
सृष्टीचे मी असे मूळ मुख मी ओघ तो हि मी ।
विद्यांत आत्म-विद्या मी वक्तांचा तत्त्व-वाद मी ॥ ३२ ॥
समासांत असे दवंदव अक्षरांत अकार मी ।
मी चि अक्षय तो काळ विश्व-कर्ता विराट स्वये ॥ ३३ ॥
सर्व-नाशक मी मृत्यु होणारा जन्म मी असे ।
वाणी श्री कीर्ति नारीत क्षमा मेधा धृति स्मृति ॥ ३४ ॥
सामांत मी बृहत्-साम गायत्री मंत्र-सार मी |
मी मार्गशीर्ष मासांत क्रतूंत फुलला क्रतु ॥ 3५ ॥
दयूत मी छळणारांचे तेजस्व्यांतील तेज मी ।
सत्त्व मी सात्त्विकांतील जय मी आणि निश्चय ॥ ३६ ॥
मी वासुदेव वृष्णींत पांडवांत धनंजय ।
मुनींत मुनि मी व्यास करवीत उशना कवि ॥ 3७ ॥
दंड मी दमवंतांचा विजयेच्छूंस धर्म मी ।
गूढांत मौन मी थोर ज्ञात्यांचे ज्ञान मी असे ॥ ३८ ॥
तसे चि सर्व भूतांचे बीज जे ते हि जाण मी ॥ ३९ ॥
माझ्या विण नसे काही लेश-मात्र चराचरी ।
माझ्या दिव्य विभतींस नसे अंत कठे चि तो ॥ ४० ॥
तरी विभूति-विस्तार हा मी थोड्यांत बोलिलो ।
विभूति-युक्त जी वस्तु तक्ष्मीवंत उदात्त वा |
माझ्या चि किरणातूनि निघाली जाण ती असे ॥ ४१ ॥
अथवा काय हे फार जाणूनि करिशील तू ।
एकांशे विश्व हे सारे व्यापूनि उरलो चि मी ॥ ४२ ॥
अध्याय दहावा संपूर्ण